बालदिन- बालकांना ज्ञानदानाबरोबर वारली चित्रशैली ची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या संपत यांची कला हीच संपत्ती !! लेखाचा पूर्वार्ध सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
कला हीच संपत यांची संपत्ती !

           ( पूर्वार्ध )


  "वारली चित्रकला हा आम्हा आदिवासींच्या जीवनमूल्यांचा गाभा आहे. आदिवासींचे लोकजीवन व कलासंस्कृती वेगळ्या करता येणार नाहीत. वारली चित्रशैली सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. 'वरलाट' या प्रदेशात राहणारे म्हणून 'वारली' हे नाव आमच्या जमातीला मिळाले. मी आमच्या संस्कृतीला, परंपरेला, वारली चित्रकलेला संपत्ती मानतो", असे उद्गार आहेत आदिवासी कलाकार संपत ठाणकर यांचे. ते सातत्याने ध्यासपूर्वक लेखन, चित्रांकनातून साहित्यसेवा करतात.आज (दि.१४) बालदिन आहे. संपत यांनी बालकांना ज्ञानदान केलेच त्याचबरोबरीने वारली चित्रशैली त्यांच्यात रुजवण्यासाठी पुस्तके लिहिली.

            तलासरीच्या ज्ञानमाता सदन शाळेतील शिक्षक संपत देवजी ठाणकर अलीकडेच सेवानिवृत्त झाले. ते डहाणू तालुक्यातील जीतगाव येथे रहातात. अभ्यासू वृत्तीच्या संपत यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. २००८ साली त्यांचे वारली चित्रकलेवरील पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्याची दुसरी आवृत्ती २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आली. नंतर त्यांनी भाग २ व ३ प्रकाशित केले. या सर्व पुस्तकांमधील  वारली चित्रे मधुकर वाडू यांची आहेत. याच दरम्यान 'वारली हृदय' हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यात वारली गाणी तसेच मानवी जीवनाची वाटचाल, संस्कृतीतून समृद्ध जीवनाकडे... असे लेख समाविष्ट आहेत. त्यामागे त्यांची आदिवासी वारली समाजाची अस्मिता टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड, तळमळ जाणवते. संपत यांचे आजोबा कोंडया हे प्रसिध्द भगत होते. त्यांना सर्व प्रकारचे पारंपरिक ज्ञान अवगत होते. ते हयात असताना छोट्या व तरुण संपतला त्यांच्याकडून अनेक वारली कथा, गाणी यांचा वारसा मिळाला. त्यावर सखोल अभ्यास, चिंतन, मनन करून हा ठेवा त्यांनी पुस्तकरूपाने सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अजूनही त्यांची ही धडपड सुरुच आहे. 

         २००५ साली संपत ठाणकर यांनी लिहिलेल्या  'पंकज ' या काव्यसंग्रहाची दखल थोर समाजसेवक, महामानव बाबा आमटे यांनी घेतली होती. या पुस्तकात त्यांचा स्वाक्षरीसह संदेश बघायला मिळतो. त्यात ते म्हणतात,"या कविता आदिवासी जीवनाचे अनेक पैलू उलगडतात. काव्यातील निसर्गचित्रण मनमोहक आहे. त्याचबरोबर आदिवासींच्या व्यथा, त्यांचे शोषण व होणारा अन्याय मनाला अस्वस्थ करतात. आदिवासी अस्मितेचा हा अनमोल नजराणा आहे." संपत यांचे वडील देवजी हे घरोऱ्या म्हणजे घरजावई होते. त्यामुळे बालपणापासून संपत यांनी गरिबी, अवहेलना जवळून अनुभवली. मात्र पुढे जिद्दीने व कष्टाने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतले. डी.एड., बी.ए. झाले. आता आदिवासींच्या अनेक आश्रमशाळा आहेत. पण ४० वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. तेव्हा त्यांनी ध्यासपूर्वक शिक्षण घेतले. पुढे शाळेत नोकरी करतांनाच लोप पावणाऱ्या आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन करण्यासाठी त्यांनी तळमळीने लेखन सुरू केले. दुसऱ्या बाजूला वारली चित्र रेखाटन, पारंपरिक बोलीभाषेतील गाणी, म्हणी, कथा यांचे संकलन सुरूच होते. या सर्वांत सातत्य ठेऊन त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

            ( उत्तरार्ध पुढील अंकात )


                                       -संजय देवधर

( वरिष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ज्ञ )

********************************
 चित्रलिपी ही व्यवहाराची भाषा... 


   हजारो वर्षांपासून वारली चित्रलिपी हे आदिवासींच्या परस्पर संवादाचे माध्यम आहे. चित्रांद्वारे मनातील भावना, विचार व्यक्त केले जातात. वारली समाजातील व्यवहाराचे चित्रलिपी हेच प्रामुख्याने साधन होते. त्यामुळेच ते आजही प्रभावीपणे टिकून राहिलेले दिसते. वारली चित्रे 'काढली' जात नाहीत तर ती 'लिहिली' जातात. तो शुद्ध अंतःकरणाने केलेला आविष्कार असतो, असे मत संपत ठाणकर मांडतात. पूर्वीची वारली जीवनशैली व आजच्या मोबाईल काळातल्या जीवनशैलीत खूप तफावत आहे. वारल्यांची नवी पिढी आपली संस्कृती, परंपरा, चालीरीती विसरत चालली आहे. वारली मुलांना कलेचे महत्त्व समजावे, त्यांच्यात कलेची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने संपत यांनी 'वारली चित्रकला' या पुस्तकाचे तीन भाग लिहून प्रकाशित केले आहेत. त्याशिवाय त्यांची सुमारे १५ पुस्तके वाचकांसमोर आली आहेत. यापुढेही येतील. त्यांच्या या साहित्यिक कार्याला शुभेच्छा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !