नाशिक(२५)::-- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली असून हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतीचे यामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार असून याबाबतच्या सूचना गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली. यापूर्वी केंद्र शासनाकडून महानगर पालिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत होते. आता ग्रामीण भागातही सदरचे सर्वेक्षण करण्यात येणार असून “देशभरातील सर्वच 698 जिल्हे यात सहभागी आहेत. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून 10 गावे याप्रमाणे 6 हजार 980 गावांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. तसेच, देशभरातील एकूण 34 हजार 900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, आठवडी बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाण...