राजस्थान रॉयल्सचा दिमाखदार विजय !
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 राजस्थान रॉयल्सचा दिमाखदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा पाचवा सामना एकतर्फी झाला. हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान कडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल उतरले. दोघांनीही आवश्यक सरासरी राखत डाव फुलवला. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर यशस्वी जयस्वाल रोमारीओ शेफर्डच्या गोलंदाजीवर ऐडन मार्करामकडे झेल देऊन परतला. त्याने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने १६ चेंडूंत २० धावा काढल्या. धावफलक ५८/१ दर्शवत होता. त्याच्या जागी कर्णधार संजू सॅमसन आला. ह्यांची जोडी चांगली धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच जोस बटलर उमरान मलिकच्या जाळ्यात फसला. त्याचा झेल निकोलस पुरनने टिपला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ३५ धावा काढल्या. राजस्थानकडून देवदत्त पडीक्कल फलंदाजीसाठी उतरला. सॅमसन आणि पडीक्कल डावाला आकार देण्यास सुरूवात केली. ७० पेक...