रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल तर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये रचना विद्यालयाची बाजी.
रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल तर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये रचना विद्यालयाची बाजी... नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या जवळपास ५७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेद पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे आणि महाकाव्यानी समृद्ध असलेल्या भारतीय संस्कृतीची परंपरा महान आहे. तसेच आपल्या मराठी मनासाठी मारुती स्तोत्र आणि रामरक्षा ही स्तोत्रे लहानपणापासूनच संस्कार करणारी आहे. शारीरिक व्यायामाबरोबरच मनाचा व्यायाम होण्यासाठी पुरातन काळापासून अशी स्तोत्रे प्रत्येक घरामध्ये म्हटली जात होती. कालौघामध्ये याचे प्रमाण कमी कमी होत गेले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेने हे संस्कार दृढ व्हावे म्हणून रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते. मराठी इंग्रजी माध्यमातील विविध प्राथमिक शाळांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी अतिशय तन्मयतेने हि स्तोत्रे सादर करीत होती.