निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !
निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !
लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घ्यावी लागते शपथ
नाशिक::- लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भारताच्या संविधानावर माझा खरा विश्वास आणि निष्ठा असेल आणि आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेल अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ आयोगाने निर्देशित केलेल्या व्यक्तींपुढेच घ्यावी लागते, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सर्वसाधारणपणे निवडणूक होणा-या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घेता येते. तसेच आयोगाचे निर्देशानुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे देखील उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक लढविणारा उमेदवार जर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत असेल तर अशा ठिकाणी संबंधित तुरूंगाधिकारी / तुरूंग अधिक्षक तसेच उमेदवार जर आजारी असेल तर अशा वेळी त्या रूग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक यांच्यासमोर उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी जर उमेदवार परदेशात असेल तर त्या ठिकाणी भारतीय वकिलातीचे अधिकारी यांच्यापुढे उमेदवारांना अशी शपथ घेता येते. उमेदवारांनी शपथ नामनिर्देशनपत्र छाननीचे किमान एक दिवस आधीच घेणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे नामनिर्देशनपत्र दाखल करतांनाच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घ्यावयाची असते. शपथ घेतल्यावर या संबंधीचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जारी करतात. उमेदवार जर दोन मतदारसंघाचे ठिकाणी उमेदवारी करीत असेल तर एका मतदारसंघात अर्ज दाखल करतांना शपथ घेतली असेल तर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नवीन शपथ घेता येते किंवा आधीचे मतदारसंघाचे ठिकाणी अर्ज दाखल करतांना शपथ घेतल्याचे विहित प्रमाणपत्र दुस-या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर केल्यास परत शपथ घेण्याची आवश्यकता नसते. मात्र अशा वेळी दुस-या मतदारसंघात अर्ज दाखल करतांना पहिल्या मतदारसंघाचे ठिकाणी शपथ घेतल्याचे विहित प्रमाणपत्र सादर करणेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची आहे. उमेदवारांनी शपथेच्या विहित नमुन्यावर स्वाक्षरी केली म्हणजे शपथ घेतली असे मानण्यात येत नाही. यासाठी उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकृत व्यक्ती / अधिकारी यांचेपुढे शपथ मोठ्याने वाचून दाखवायची असते आणि त्यानंतरच या नमुन्यावर संबंधित अधिकारी यांचेपुढे स्वाक्षरी करावयाची असते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असेही पत्रकात म्हटले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा