न्यूज मसाला प्रकाशनाच्या "कळी उमलली" कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार ! नरेंद्र पाटील, संपादकीय-राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल काळजी करू नका !! जगायला जातो- प्रसिद्ध वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांचा लेख !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संपादकीय
नरेंद्र पाटील
राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल फार काळजी करू नका !!
एका कुटुंबात कमावणारा एक आणि खाणारे चार धष्टपुष्ट पोरं असतात. बाप कमावतो म्हणून ते निश्चिंत असतात‌. एका अपघातात कुटुंब प्रमुखाला आपला हात गमवावा लागतो. कुटुंबप्रमुख त्याच्या कामाशी संबंधित आस्थापनेत प्रामाणिकपणे काम करत असतो. म्हणूनच संबंधित आस्थापना अर्ध्या पगारावर कुटुंब प्रमुखाला नोकरीवर कायम ठेवते. पण अर्ध्या पगारात त्याच्या कुटुंबाचे अर्थचक्र प्रभावित होते. शुद्ध बिजापोटी रसाळ फळे उपजतात, हे प्रमाणभूत सत्य. त्यान्वये, बापाची झालेली आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी हे चार पोरं पुढे येतात. मिळेल ते काम करतात. पैसे कमवत आपल्या कुटुंबाला तारतात. कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा वर्धिष्णू करतात. 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय संस्कृतीचे हे उदाहरण एक उत्तम निदर्शक.
      उपरोक्त उल्लेखित उदाहरण आज घराघरांत पाहावयास मिळेल. कारण आहे कोरोना नावाची वैश्विक महामारी आणि त्यामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था. घसरलेला जीडीपी हा या महामारीचा दृश्य परिणाम आहे. हवं तर सुरुवातही म्हणूयात.
      अर्थव्यवस्था डबघाईला आली ! जीडीपी - २३.९ आला म्हणजे सर्व काही संपले अशी आवई उठवून काय साध्य होणार ? खरेतर परिस्थिती चिंताजनक असल्याचे द्योतकच समजायला हवे, मात्र परिस्थिती निर्माण का झाली याचे विश्लेषण योग्य रितीने केल्यास हिंदूस्थानात सोन्याचा धूर निघणे कठीण नाही, तरुणांचा देश म्हणून जगात भारताचे नांव आहे, हाच धागा पकडून भारतात राजकारण होत आहे, जीडीपी खाली येणे जितके धोकादायक आहे तितकेच त्याहूनही जास्त राजकारण करणे धोकादायक वाटते.
    
       जीडीपी २०१८ च्या मध्यापासून खाली येत आहे याचा विचार अर्थतज्ञांनी केला असेल असे गृहीत धरले तर आज त्याबद्दल चिंता करणे व्यर्थ समजायला काहीच हरकत नाही. जीडीपीची काळजी प्रशासनाने करावी त्यावर अंकुश सरकारचा असावा, सरकार वर लक्ष विरोधकांनी ठेवावे व शेवटी निर्णय जनतेच्या दरबारात येतो, जेव्हा जनतेच्या दरबारात विषय निघतो आहे तेव्हा कलम ३७०, बालाकोट, म्यानमार, राममंदिर, आणि विदेश नीती वर भर दिला जातो, खाजगीकरणाची मुहूर्त मेढ कधी रोवली गेली हे ज्यांना ज्ञात आहे तिथे आजच्या सरकारचे धोरण जीडीपीसाठी जोडले जात असल्यास थोडं विनोदी ठरते. कोरोना जागतिक महामारी आल्यानंतर जीडीपी घसणार हे लहान मुलाला समजणार नाही पण तेच मुल आकांडतांडव करून चाॅकलेट मिळवते तद्वतच उलट छोटे-मोठे काम वडीलधाऱ्यांचे ऐकले तरीही चाॅकलेट मिळतं हे साधं गणित त्याला कळते तसेच -२३.९ च नाही का ?
        भारतीय अर्थव्यवस्थेचा जून २०२० चां जीडीपी दर आणि इतर देशांच्या तुलनेत वरकरणी दिसतो तसा समजून घेणे कितपत योग्य आहे ? जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या बाळगून असलेला देश कधी काळी नव्हे तर अनेक आक्रमणांनंतरही "सोने की चिडीया" ठरला आहे.
            कोरोनामुळे १३५ कोटी लोकसंख्येच्या देशाचा जीडीपी खाली येणार हे सरकारला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्षात आले असेल त्याशिवाय त्यांनी "आत्मनिर्भर" चा इशारा दिला नसता हे आज जनतेला पटायला लागले आहे. हे पटले नसते पण विरोधकांनी ज्या पद्धतीने जीडीपी ची मीमांसा करण्याचे अवलंबले आहे त्यातूनच समजते आहे की "कृषी क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे भविष्यात खूप मोठ्या खाईत देश ढकलला जाऊ शकतो". याच वाक्यांमुळे जनतेला जीडीपी चांगल्या प्रकारे समजला !  विरोधी राजकारणी व त्यांचे बगलबच्चे यांना ही सर्वात मोठी संधी विद्यमान सरकारला घेरण्याची मिळाली होती मात्र तीचं चीज करता आले नाही. जगात घडत असलेल्या घटनेचा नेमका अर्थ व त्याचा परिणाम जोपर्यंत सर्वसामान्यांसाठी एक कुतुहल असते तोपर्यंत संधी उपलब्ध होते आणि संधीचं सोनं करण्याआधीच स्पष्टीकरणासहीत स्वातंत्र्य मिळाल्यापासून चे विश्लेषण मांडले म्हणजे जनतेचे मतपरीवर्तन होईल  हे समजण्याचे दिवस नाहीत, फक्त "मी" हुशार राजकारणी किंवा हुशार विश्लेषक आहे हा भ्रम आहे याचा विचार "पुण्यवान" समजणाऱ्यांनी करायला हवा.
       
       सर्वसामान्य जनतेला भविष्यात डोकावण्याची गरज ही वैयक्तिक पातळीवर आहे मात्र तिच्या अंगी थोडेफार देशप्रेम जागृत असेल तर पाकीस्थानच्या कुरापती, चीनची विस्तारवादी नीती, कर्जाच्या ओझ्यात दबलेला नेपाळ हे विषय चघळले जातात व त्या संदर्भातील भविष्याची चिंता सर्वसामान्य माणूस करतो. जीडीपी घसरला इतकाच मर्यादित विषय असता तर विरोधकांनी अर्थमंत्रीच काय पंतप्रधांसह संपूर्ण सरकारला "सळो की पळो" करून सोडले असते, मात्र इतिहासाची साक्ष देऊन जनतेला "अभ्यासू डोस" पाजायचा प्रयत्न म्हणजे अतिआत्मविश्वासाचा बळी गेला असे ठरल्यास दोष कुणाला देणार ? जीडीपी घसरण्याचे खरे कारण काय आहे हे देशहीत सांभाळत जनतेच्या दरबारात मांडले असते तर ? काॅग्रेसकडून ना गरीबी हटली, किंवा मोदींनी पंधरा लाख खात्यावर वळते केले नाही, मग जीडीपी कशाशी खातात याचे सर्वसामान्यांना कसले कौतुक ?
       
       सत्तेत कुणीही आले तरी देशप्रेम अंगी बाळगून राजकारण केले तर त्याला प्रगल्भता प्राप्त होईल, प्रौढ लोकशाहीचे खंदे समर्थक समजले जातील. व्यक्ती पेक्षा संस्था (अर्थात देश) मोठी असते हे जोपर्यंत समजून घेतले जात नाही तोपर्यंत मोदी, गांधी, वा इतरांबाबत वैयक्तिकरित्या गुणदोष दाखवत फिरलो तर देशाला भविष्यात खाईत लोटल्याच्या पापाचे वाटेकरी आपणच. आपल्याला संकटात सापडलेले कुटुंब सावरायचे आहे की या कुटुंबाचे खुलेआम वाभाडे काढत कुटुंबालाच बदनाम करायचे, याचा विचार ज्याने त्याने आपल्या बौद्धिक पातळीवर करावा.
       ए.पी‌.जे. अब्दुल कलाम म्हणतात,' देशाने तुमच्यासाठी काय केले, याअगोदर तुम्ही देशासाठी काय केले हे स्वतःला विचारा.'
       राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल फार काळजी करू नका. आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, हेच सध्यातरी प्रत्येकाचे सध्य कर्म आणि धर्म आहे. आणि यातच व्यक्तीगत व यथावकाश राष्ट्रीय विकास दडला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।