भारताच्या ‘जीडीपी’ मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा 

मोठा वाटा असेल

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंटक्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे  यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

     


      वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वेमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकरमाहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेअजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

        भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीततर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शनडिजिटल कंटेंटगेमिंगफॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.

      मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे - नरेंद्र मोदी

          आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेव्हज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून ही महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले.

           आज डिजिटल आशय, संगीत, अ‍ॅनिमेशन, गेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

         मुंबईत साकारणार आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

        भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

         अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

            यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !