कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.
नाशिक : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची खरिप हंगाम पूर्व प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना सुनिल बोरकर यांनी बियाणे, खते आणि किटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाईन प्रक्रिया आत्मसात करुन कायद्यातील तरतुदींप्रमाणे कृषी निविष्ठांचे उत्पादन व विक्री करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कृषी उत्पादन घेता येईल. याबाबत बोलताना, त्यांनी बियाणे विक्रीसाठी बनविलेल्या ‘साथी’ या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन केले. बियाण्याचे उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळू शकते. आणि शेतकऱ्याला दर्जेदार बियाणे पुरवठा शक्य होतो. तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई-पॉस प्रणालीचा वापर करावा. तसेच ई-पॉस ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा याची दररोज पडताळणी करावी. केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई-पॉस वरील खत शासनाच्या माहिती आधारेच खतांचे जिल्ह्यात वितरण केले जाते. तसेच खतांचे लिंकिंग करुन शेतकरयांना अनावश्यक कृषी निविष्ठांची सक्ती करु नये, याबाबत कृषीमंत्री यांनी सक्त आदेशित केले आहे. याबाबत कृषी मंत्री यांचा व्हिडीओ संदेश उपस्थितांना दाखविण्यात आला. पुढे बोलताना सुनिल बोरकर यांनी किटकनाशक विक्री करताना लेबल क्लेम तपासूनच आणि किटकनाशक कायद्यातील अधिसूचनेप्रमाणे पक्के बिल शेतकऱ्यांना अदा करावे. बिलावरील संपूर्ण माहिती भरुन स्वयंस्वाक्षरीत बिल देण्यात यावे. म्हणजे शेतकऱ्यांना योग्य शिफारशीप्रमाणे किटकनाशकांचा वापर करता येईल. आणि भविष्यात चुकिच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्ष रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी नाशिक हा कृषी प्रगत जिल्हा असून कृषी निविष्ठा विक्री करताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. तसेच आपला व्यवसाय करताना केवळ नफा न बघता एकूण उलाढाल लक्षात घ्यावी. शेतकरी हा आपला मौल्यवान ग्राहक आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा. फक्त आवश्यक असेल तशाच निविष्ठांची विक्री/शिफारस करावी. म्हणजेच शेतकरी पुन्हा आपल्या माध्यमातून दर्जेदार कृषी निविष्ठांचा वापर हा खर्च कमी करुन उत्पादनात वाढ होईल. तसेच बाजारात उपलब्ध अनावश्यक होणाऱ्या ‘पीजीआर’ची विक्री अल्प प्रमाणात करावी, असे आवाहन केले.
नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशनचे (नाडा) अध्यक्ष अरुण मुळाणे यांनी उपस्थित विक्रेत्यांना संबोधित करताना आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी दर्जेदार खते, बियाणे व किटकनाशकांच्या विक्री बरोबर तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच आपले ध्येय असले पाहिजे, असे ते म्हणाले. कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, जिल्ह्यात पेरणी होणारे क्षेत्र त्यासाठी आवश्यक खते, बियाणे आणि किटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होऊन खरिप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांना सहजपणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुरवठा करावा आणि याबाबत प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रशिक्षण वर्गात फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कृषी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या घडीपत्रिका व पोस्टर्स यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर. डी. वाघ, मोहिम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ.जगन सूर्यवंशी, तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) उल्हास ठाकूर, कृषी अधिकारी राहुल आहेर, सुनिल विटनोर, संतोष राठोड, किशोर आहिरे, नंदकुमार अहिरे, बाळासाहेब खेडकर, भिष्मा पाटील, महेश नागपूरकर, कैलास भदाणे, प्रणय हिरे, विजय केदार यांच्यासह ‘नाडा’चे प्रतिनिधी, माफदा, ओमा या संघटनेचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते उपस्थित होते. विजय धात्रक यांनी सूत्रसंचालन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा