जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई
जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन
आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई
नाशिक : जिल्हा परिषद नाशिकमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card) पडताळणी मोहिमेला गती देण्यात आली असून बोगस, अपूर्ण अथवा नियमबाह्य दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सवलती घेतल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी कठोर भूमिका घेत कारवाई सुरू ठेवली आहे. या मोहिमेंतर्गत आज आणखी १ मुख्याध्यापक व ४ शिक्षक अशा एकूण ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बागलाण तालुक्यातील १ मुख्याध्यापक तसेच इगतपुरी, मालेगाव, सिन्नर व सुरगाणा तालुक्यातील प्रत्येकी १ शिक्षकाचा समावेश आहे.
पडताळणी प्रक्रियेदरम्यान दोन शिक्षकांनी अद्याप UDID प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले. तसेच एका मुख्याध्यापक व एका शिक्षकाने UDID प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर नवीन UDID प्रमाणपत्र सादर न केल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय एका शिक्षकाचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईसह दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागांकडून UDID कार्ड पडताळणी अहवाल प्राप्त होत असून उर्वरित प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे.
खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र व्यक्तींपर्यंतच पोहोचाव्यात, हाच या मोहिमेचा उद्देश असून दिव्यांग सवलतींचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील, असे यावेळी जिल्हा परिषद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बोलतांना स्पष्ट केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा