पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! जी.पी.खैरनारांच्या लेखनीतून न्यूज मसालाचा खास रिपोर्ट !! न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी नितीन पवारांचा सत्कार केला त्याप्रसंगी चर्चेदरम्यान "मतदारसंघाबाबत वडीलांचा वारसा पुढे चालवत राहणार" !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार !
******************************
       नाशिक::- जिल्ह्यातील आदिवासींचे नेते म्हणुन ज्यांनी साठ वर्षे राजकारण केले असे स्वर्गीय ए. टी. पवार साहेब यांचे वारसदार म्हणुन कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातून आमदार नितीन पवार निवडुन आले आहेत.
           नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी बहुल क्षेत्र असे आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्रिंबकेश्वर, दिंडोरी हे तालुके पुर्णतः आदिवासी बहुल व डोंगराळ, दुर्गम - अतिदुर्गम अशी भौगोलिक स्थिती. बागलाण, देवळा, नाशिक हे तालुके अंशतः आदिवासी क्षेत्र अशी भौगोलिक स्थिती नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाची आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजातील जनतेस मुलभूत  आरोग्य सुविधा, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हा दूर दृष्टिकोन स्वर्गवासी अर्जुन तुळशीराम पवार साहेब तथा ए. टी. पवार साहेब यांनी ठेवला होता. हा दूर दृष्टिकोन ठेऊनच कळवण तालुक्यातील सर्व आदिवासी जनतेच्या जिरायती क्षेत्र हे बागायती क्षेत्र करण्याचे काम आदरणीय ए. टी. पवार साहेब यांनी केले. कळवण तालुक्यातील दळवट सारख्या दुर्गम भागातील गावातुन आपले इंग्रजी विषयात एम.ए. पर्यंत शिक्षण घेऊन आदिवासी जनतेचे नेतृत्व करणारे ए.टी. पवार हे कळवण, सटाणा व देवळा तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. म्हणुनच ए. टी. पवार साहेब यांनी जनहितासाठी व राजकीय पटलावर काही काळ, भारतीय जनता पार्टी तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा राजकीय प्रवास करत कळवण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. आपल्या नेतृत्व शैलीतून कळवण तालुक्यातील "अर्जुनसागर" धरणाचे मोठे काम आपल्या कार्यकाळात उभे केले. या धरणामुळे कळवण तालुक्यातील आदिवासी बहुल पन्नास टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आले. त्यामुळे कळवण तालुक्यातील दुर्गम आदिवासी जिरायती क्षेत्र हे ए. टी. पवार साहेब यांच्या दुरदृष्टीमुळे बागायती झाले.
        महाराष्ट्र राज्यात अनेक शैक्षणिक संस्था असलेले संस्थानिक आपल्या शैक्षणिक व सहकारी पतसंस्था, बँका यांच्यामुळे संस्थानिक राजकीय नेते झाले व कार्यरत आहेत. परंतु याला अपवाद म्हणून ए. टी. पवार साहेब यांनी कुठलेही संस्थांचे संस्थानिक न होता फक्त आदिवासी तथा कळवण तालुकावासीयांचे पाणदेव तथा पाणीदार विकास पुरुष म्हणून त्यांनी आपल्या कामांचा  ठसा उमटविला होता. त्यामुळेच कळवण विधानसभा मतदार संघात ए. टी. पवार साहेब हाच राजकीय पक्ष अशी परिस्थिती ए. टी. पवार साहेब यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर निर्माण केली होती. त्यामुळेच सन २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कळवण तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांपैकी दोन जिल्हा परिषद गटात ए. टी. पवार साहेब यांच्या स्नुषा सौ. जयश्री पवार  व थोरले चिरंजीव नितीन पवार हे नाशिक जिल्हा परिषदेत नेतृत्व करत होते तर दुसऱ्या स्नुषा डॉ. भारती पवार या देवळा तालुक्यातील उमराणे जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करत होत्या. सन २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीतही नवनिर्वाचित आमदार नितीन पवार, त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पवार व विद्यमान दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. सौ. भारती पवार या जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत होत्या. ए. टी. पवार साहेब यांनी जनतेच्या केलेल्या सेवेमुळे त्यांच्या जेष्ठ स्नुषा सौ. जयश्री पवार या सन २०१२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणुन विराजमान झाल्या होत्या. सौ.जयश्री नितीन पवार यांनी नाशिक जिल्हा परिषद स्थापनेपासून आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून जिल्ह्यातील राजकारणावर वेगळी छाप पाडून जिल्हा परिषद प्रशासनावर वचक ठेऊन नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेच्या विकासासाठी कामकाज केले हे सर्वश्रुत आहे.
        नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवण सुरगाणा विधानसभा निवडणुकीत नितीन पवार यांनी स्वर्गवासी ए.टी. पवार साहेब यांचा कौटुंबिक राजकीय वारसदार म्हणून यश संपादन केले आहे. निश्चितच नितीन पवार यांच्या या आमदार म्हणून निवडीच्या यशात स्वर्गवसी ए.टी. पवार साहेब यांची विकास कामे तथा यशस्वीपणे पुर्ण केलेले सिंचन प्रकल्प यारूपीचे आशीर्वाद, आई शकुंतला यांचे आशीर्वाद व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री पवार व कुटुंबातील घटक यांनी जनतेच्या मुलभूत गरजांची जपलेली बांधिलकी, प्रेम या बाबी प्रकर्षांने नमुद कराव्या लागतील.
       नवनिर्वाचित आमदार नितीन पवार यांचेकडून सुरगाणा व कळवण तालुक्यातील जनतेने खुप मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवलेल्या असणार. त्यात प्राधान्याने सुरगाणा तालुक्याचे विस्तारलेले भौगोलिक क्षेत्र, त्यानुसार अपेक्षित असलेले सिंचन प्रकल्प राबविणे. सुरगाणा तालुक्यातील डोंगर उतारावरील गुजरात राज्याकडे वाहून जाणारे व पुढे समुद्रास मिळणारे पाणी साठवण बंधारे तथा सिंचन प्रकल्प राबवून तेथील आदिवासी जनतेच्या जिरायती जमिनी बागायती करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी तरुण युवकांना शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देतांना त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे यासारखी आव्हाने असणार आहेत. नितीनभाऊ पवार हे आमदार म्हणुन निवडून आल्यानंतर विजयी मिरवणूक बघुन नितीन पवार यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला अर्जुन पवार यांना आदरणीय स्वर्गवासी ए. टी. पवार साहेब यांची आठवण होऊन डोळे पाणावल्यानंतर उपस्थित सर्व कुटुंबातील घटक व जनता यांचेही डोळे पाणावले होते. एका आईला आपला मुलगा आमदार झाल्याचा आनंद व लोकनायक ए. टी.तथा आपल्या पतीची आठवण श्रीमती शकुंतलाताई यांच्या पाणावलेल्या डोळ्यात दिसत होते. निश्चितच एका ध्येय वेडया पाणीदार नेत्याचा वारसदार म्हणुन अप्रत्यक्ष उपस्थितांनी नवनिर्वाचित आमदार नितीनभाऊ पवार यांचेकडून स्वर्गवासी ए. टी. पवार साहेब यांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याची आठवण करुन दिल्याचे ज्ञात होत होते.
         नवनिर्वाचित आमदार  नितीनभाऊ पवार  यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद यासारख्या पंचायतराज व्यवस्थेत केलेल्या कामांचा अनुभव पाठीशी आहेच. याव्यतिरिक्त राजकारणा पलीकडे जाऊन विविध पक्षातील असलेले राजकीय मित्र व त्यांच्याशी जपलेले आपुलकीचे नाते ही मोठी शिदोरी नितीनभाऊ पवार यांचेकडे आहे. आमदार नितीनभाऊ पवार हे आपल्या राजकीय वारशाच्या जोरावर व राजकीय अनुभवाच्या जोरावर कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातील शेवटच्या मतदाराला केंद्रबिंदू मानुन भविष्यातील जनसेवेची दिशा निश्चित करुन कामकाज करतील, व स्वर्गवासी ए. टी. पवार साहेब यांचे वारसदार म्हणुन मतदार संघातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा करूया !
                           लेखन:- जी.पी.खैरनार, नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित