एका प्रेमवीराचे "मसाला युक्त" मनोगत ! (शुभेच्छूक अनामिक शासकीय अधिकारी आहेत, न्यूज मसाला परिवार त्यांचा ऋणी आहे.)

एका प्रेमवीराचे "मसाला युक्त" मनोगत !

     गोदामाई म्हणजे भूतलावरील संस्कृती आणि सभ्यतेचा एक व्यापक व वैभवशाली प्रवाह. या प्रवाहात शब्द-साहित्याचे, प्रथा-परंपरांचे आणि भक्तीशक्तीच्या अतूट संगमाचे सहस्त्रकोटी तरंग नित्य उमटत आले आहेत. बालमनाचे भरणपोषण व मानवी मनाच्या सकारात्मक परिवर्तनाच्या कक्षा या तरंगांतूनच व्यापक झाल्या. प्रकाशगामी अभ्यंकराशी व ज्ञानाच्या दीपत्काराशी नाशिककरांचे ऊर्जस्वल नाते तयार करणाऱ्या या गोदाप्रवाहात शब्दतरंगांची सुमधूर निर्मिती करण्याचा प्रयत्न आमचे सन्मित्र आणि मार्गदर्शक श्री. नरेंद्र पाटील यांनी आजवर केला आहे. या प्रयत्नांचीच दशकपूर्ती म्हणजे साप्ताहिक 'न्यूज मसाला' या मराठी नियतकालिकाचा १० वा वर्धापन दिन होय. 

        या लेखाच्या प्रारंभी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती अशी की 'न्यूज मसाला' या साप्ताहिकाच्या प्रारंभाचे आम्ही साक्षीदार आहोत. खरंतर नाशिकमध्ये साप्ताहिकांची कमी नाही. व्यावसायिक उद्देशाने स्थापित नियतकालिकांच्या गर्दीत कितीतरी साप्ताहिक जन्मतात आणि रांगत रांगत नामशेष होतात. न्यूज मसाला या साप्ताहिकाबाबतही आमचे यापेक्षा वेगळे मत असू शकत नव्हते. परंतु, पत्रकारितेची वेगळी वहिवाट निवडून ती प्रशस्त करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या संपादक नरेंद्र पाटील यांनी आमचा हा कयास खोटा ठरवला. घेतला वसा टाकणार नाही, या जिद्दीने आणि त्यासाठी कठोर परिश्रमाचा यज्ञ धगधगत ठेवत साप्ताहिक न्यूज मसाला अविरत-अविश्रांत सुरू ठेवण्याचा यशस्वी यत्न श्री. नरेंद्र पाटील यांनी आजवर केला. 
        साप्ताहिक 'न्यूज मसाला' हे टायटल सहज कुणाच्याही लक्षात राहण्यासारखे आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाचा प्रारंभबिंदूच 'मसाला' हा शब्द आहे. 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले', या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील ओळीतच मसाला दडलेला आहे. दक्षिण भारताचा भूभाग विविध मसाला पिकांनी बहरलेला असल्याने पोर्तुगीज आणि इंग्रजांना या रानमेव्याची भुरळ पडली. पाश्चात्य देशात या निसर्गधनाची विक्री करून इंग्रज गब्बर झाले. पुढे या देशाचे कारभारी झाले. नंतरच्या घटनांचा आढावा येथे घेणे संयुक्तीक नसले तरी खंडप्राय भारत देशातले समाजकारण व राजकारण हा एक कालानुरूप वेगवेगळ्या चवींचा मसाला आहे. श्री. नरेंद्र पाटील यांनी हाच शब्द मराठी पत्रकारितेत रूजविण्याचा धाडसी प्रयत्न दहा वर्षांपूर्वी केला आणि यशस्वी करून दाखविला. 
           प्रगतशील समाजमाध्यमांनी व्यापलेल्या या टेक्नोसॅव्ही युगात खरंतर मुद्रित माध्यमांचा आवाज काहिसा दबला गेला आहे. आणखी १० वर्षांनंतर मुद्रित माध्यमांची काय अवस्था असेल, या शक्यता आज चर्चिल्या जात आहे. त्यातून काही नकारात्मक विश्लेषणं पुढे येत असली तरी मुद्रित माध्यमातून माहिती अवगत करून घेणे वाचकांसाठी सहजसाध्य आहे. त्यामुळे येणारा काळ हा मुद्रित माध्यमांसाठी आव्हानात्मक असला तरी तो संपविणारा नसेल. उलट मुद्रित माध्यमाकडे वाचकांचा ओघ पुन्हा सुरू होईल. समाजमाध्यमांतील बातम्यांच्या आडून अफवाईची उडणारी राळ वाचकाला दिशाहिन व अस्वस्थ करेल, तेव्हा स्वतःची खात्री आणि ठोस मत तयार करण्यासाठी विश्वासार्ह माध्यमाची गरज भासेल. आणि ही गरज पूर्ण करण्याची क्षमता केवळ मुद्रित माध्यमात आहे. त्यामुळे येणारा काळ हा मुद्रित माध्यमांसाठी सुकाळ ठरणार आहे. गरज आहे ती फक्त टिकून राहण्याची. 
        न्यूज मसाला साप्ताहिकाने बदलत्या पत्रकारितेचा अतिशय साळसूदपणे कानोसा घेत कालानुरूप बदलण्याचा प्रयत्न केला आहे. न्यूजपोर्टलच्या माध्यमातून माहितीचा प्रवाह वाचकांपर्यंत पोहचविण्यात न्यूज मसाला यशस्वी ठरला आहे. अनेक नवोदित पत्रकारांना या पोर्टलचा फार मोठा आधार असल्याचे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात दिसून येते. साप्ताहिकं म्हणजे कासवगतीने मार्गस्थ होणारा वृत्तस्त्रोत अशी उपहासात्मक होणारी मांडणी न्यूज मसालाने खोडून काढली आहे. वेगवान व विश्वासार्ह माहिती  देण्यात न्यूज मसाला परिवार यशस्वी झाला आहे. 
        आधुनिकतेच्या झगमगाटात न्हावून निघालेल्या या जमान्यात वृत्तपत्राचा व्यवसाय म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी भल्याभल्या दैनिकाची दमछाक होत आहे. यादरम्यान पत्रकारितेच्या चिरंतन शाश्वत मुल्यांचं स्खलन सातत्याने होत असल्याची टिका वाचक / तथा समीक्षकांकडून होत आहे. काही दैनिक तर जाहिरात पत्राची सकाळ घेऊन अवतरतात. या जाहिरातींच्या फंदात मजकुराचा दर्जा सदोदित घसरत चालला आहे. त्यामुळे वाचकही पाचव्या मिनिटाला दैनिकावर केवळ एक कटाक्ष टाकून रद्दी करतो. हे अतिशय भयंकर आहे. अशा भयंकरात मात्र एक गोष्ट आश्वस्त करून जाते, ती म्हणजे न्यूज मसाला. जाहिराती नसतील तरीही या साप्ताहिकाचा अंक नित्य प्रकाशित होत असतो. प्रसंगी पदरमोड करू परंतु छटाकभर जाहिरातींसाठी पत्रकारितेचा धर्म आणि मुल्य अबाधित ठेवू, हा संपादकीय बाणाच न्यूज मसालाच्या यशाचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच या साप्ताहिकास वाचकमनाचे भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळत आहे. 
        नाशिक शहर व जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासाला पूरक व सहाय्यक माहितीचे सादरीकरण करणारा न्यूज मसाला परिवार आज दशकपूर्ती सोहळा कुठलाही अवास्तव झगमगाट न करता अतिशय संयतपणे आपले यश वाचकांसोबत वाटून घेत आहे, ही बाब व कृती इतर नियतकालिकांसाठी पथदर्शी म्हणावी लागेल. कारण, हा साधेपणा टिकवणारी माध्यमच उद्या वाचकमनाचा मानबिंदू ठरणार आहेत. दिव्यत्वाची प्रचिती देण्यासाठी जाहिरातीचा मार्ग प्रारंभी सुखकर असला तरी तो ध्येयापर्यंत पोहचविणारा नाही. भांडवलदारांचे मांडलिकत्व स्विकारून देशाचे दूत असल्याचा कांगावा करण्याचा हा जमाना नाही, कारण वाचक सुजाण झाल्याने पत्रकारितेच्या आडून होणारे नियतकालिकाचे पुढारपण वाचकांना अमान्य आहे. महाराष्ट्र मुलखात जनमताचा कानोसा घेऊन वाचकाला जे जे हवे ते ते देण्याचा हा टाइम आहे. लोकमताचा अनादर करत भांडवलशाहीचा उदोउदो करणारे नियतकालिकं लोक नाकारू लागले आहेत, त्यामुळेच वाचकमनाची सकाळ सुंदर करण्याचे पुण्यकर्म नियतकालिकांना एक वाचकाभिमुख धोरण ठरवून करावे लागणार आहे. न्यूज मसाला या दिशेने मार्गस्थ होत असल्याची बाब समाधानकारक आहे, त्यामुळेच या नियतकालिकाच्या वर्धापनदिनी व्यक्त होण्याची इच्छा झाली. या संधीबद्दल साप्ताहिक न्यूज मसाला परिवाराचे आभार. मराठी वाचक प्रबोधन यज्ञाला आपण प्रज्वलित ठेवण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढेही असेच महत्कार्य आपणाकडून नित्य होईल, याची खात्री आहे. आपल्यातील स्नेह व मधूरसंवादाची वीण उत्तरोत्तर घट्ट होवो, या सदिच्छांसह वर्धापनदिनानिमित्त अनंतकोटी शुभेच्छा !
(शुभेच्छूक अनामिक शासकीय अधिकारी आहेत, न्यूज मसाला परिवार त्यांचा ऋणी आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।