अभिमानास्पद - मविप्र केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्त दर्जा प्राप्त : ॲड. नितीन ठाकरे. शैक्षणिक, प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी

मविप्र केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्त दर्जा प्राप्त : ॲड. नितीन ठाकरे
शैक्षणिक, प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी

          नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य शासनाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून, संस्थेसाठी ही एक अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयाच्या भविष्यासाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण वाटचाल आहे. स्वायत्ततेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाला शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबतीत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी (दि.८) पार पडलेल्या पत्रकार परिषदेस मविप्रचे पदाधिकारी, संचालक व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.

महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळावा, यासाठी संस्थेकडून विद्यापीठ व शासनाकडे पत्रव्यवहार सुरु होता. अखेर गुरुवारी (दि.८) दुपारी मविप्र संस्थेकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याचे पत्र मिळाल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
           यावेळी ते म्हणाले, महाविद्यालयाला आता स्वतंत्रपणे नवीन अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि शैक्षणिक पद्धती विकसित करण्याची मुभा मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तयार होण्याची संधी मिळेल. स्वायत्ततेमुळे कॉलेजला संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याची संधी मिळणार आहे. तसेच, विद्यार्थी आणि प्राध्यापक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करण्यास सक्षम होतील. महाविद्यालयाला आता उद्योगांशी अधिक प्रभावीपणे सहकार्य करण्याची संधी मिळाली आहे. नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रांची निकड विचारात घेऊन रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम आता महाविद्यालया मार्फत सुरु करता येणार आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरातील, गावातील विद्यार्थ्याचे या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 
        विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट आणि नोकऱ्या मिळवण्यास मदत होईल. स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविण्याची संधी मिळेल. यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक जगभरातील शैक्षणिक संस्थांशी जोडले जातील. महाविद्यालयाला आता प्रशासकीय बाबतीत अधिक लवचिकता मिळाली आहे. यामुळे महाविद्यालय अधिक प्रभावीपणे काम करू शकते. स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास अधिक मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
स्वायत्ततेच्या प्राप्तीमुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महाविद्यालय आता विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर यासाठी मविप्रचे कार्यकारी मंडळ, प्राध्यापकवृंद यांनीदेखील प्रयत्न केल्याचे सांगत या सर्वांचे त्यांनी कौतुक केले. प्राचार्य डॉ. सतीश देवणे यांनी शुक्रवार (दि.९) पासून अभियांत्रिकी पदवीसाठी सुरु होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेची माहिती दिली. तसेच, स्वायत्ततेच्या दर्जामुळे यापुढे ‘बीई; ऐवजी ‘बीटेक’ आणि ‘एमई’ ऐवजी ‘एमटेक’ अशी पदवी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. विजय बिरारी यांनी आभार मानले.
महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे आदींनी स्वागत केले.
*****************************
   नाशिकमधील तिसरे महाविद्यालय
कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी हे स्वायत्त दर्जा मिळविणारे नाशिकमधील तिसरे महाविद्यालय ठरले आहे. तसेच नॅककडून ए++ मानांकन (A++) मिळविणारे उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
*****************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !