वाढवण बंदरामुळे पाच वर्षांत बेरोजगारी शून्यावर‘जेएनपीए’चे चेअरमन उन्मेष वाघ : केबीटी कॅफे, पॉलिटेक्निकच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन !
वाढवण बंदरामुळे पाच वर्षांत बेरोजगारी शून्यावर
‘जेएनपीए’चे चेअरमन उन्मेष वाघ :
केबीटी कॅफे, पॉलिटेक्निकच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन !
नाशिक(प्रतिनिधी )::- साडे चार वर्षांत सखोल अभ्यास करून सर्व विरोधाचे वातावरण शांत करून वाढवण बंदराचा आराखडा तयार केला. स्थानिकांच्या सर्व शंकांचे समाधान केले आणि समुद्र किनाऱ्यापासून सहा किलोमीटर आतमध्ये वाढवण बंदर हा प्रकल्प उभा करण्याचे निश्चित केले. या बंदरामुळे देशाच्या जीडीपीमध्ये १ टक्क्याने वाढ होणार असून, विकसित भारताचे स्वप्नही साकार होणार आहे. १० वर्षांत एक कोटी रोजगार तयार होणार आहे. पाच वर्षांत बेरोजगारी शून्य करण्याची ताकद या प्रकल्पात आहे, असा दावा जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे (जेएनपीए) चेअरमन उन्मेष वाघ (आयआरएस) यांनी केला.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘वाढवण बंदर-एक व्यावसायिक संधी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. तत्पूर्वी उन्मेष वाघ यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे आणि कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅफेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. व्यासपीठावर मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेव क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, प्राचार्य प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. सतिष देवणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वाघ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.३०) पार पडलेला वाढवण बंदर प्रकल्प तब्बल ७६ हजार कोटींचा आहे. या प्रकल्पासाठी एक इंचही जागा कोणाची घेतलेली नाही. सर्व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीदेखील काळजी घेतलेली आहे. त्यासाठी वाळूदेखील समुद्रातीलच वापरली आहे. या प्रकल्पासाठी जगातील सर्व कंपन्यांनी करार केला आहे. यावेळी वाघ यांनी केबीटी कॅफेच्या बांधकामाचे कौतुक केले. भविष्यात अशाच प्रकारच्या सुख सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी संस्थेची पार्श्वभूमी सांगितली. उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. निमंत्रक तथा शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांनी आभार मानले. यावेळी उन्मेष वाघ यांच्या मातोश्री अपर्णा वाघ आणि पिताश्री डॉ. शरद वाघ यांचाही सत्कार करण्यात आला.
******************************************
नाशिकचे द्राक्षे तीन तासांत जहाजावर !
शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी हे बंदर फायदेशीर ठरणार आहे. डिसेंबर २०२९ पर्यंत या बंदरावर पहिले जहाज पोहोचणार आहे. नाशिकपासून १५० किमीवर असलेल्या वाढवण बंदरावर नाशिकचे द्राक्ष अवघ्या तीन तासांत जहाजावर पोहोचतील. सायंकाळी तोडलेली द्राक्षे सकाळी जहाजावर पोहोचतील, अशी माहिती उन्मेष वाघ यांनी दिली.
*******************************************
मविप्रसाठी आवश्यक मदत निधी देणार
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे संस्थेसाठी आवश्यक ती मदत माझ्याकडून केली जाईल. माजी विद्यार्थी म्हणून सटाणा महाविद्यालयासाठी निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी विवेक कापडणीस यांनी पुढाकार घ्यावा, सर्वप्रथम आवश्यक निधी माझ्याकडून घ्यावा, असे आश्वासन उन्मेष वाघ यांनी दिले. फ्लेम युनिव्हर्सिटी पाहण्यासाठी मविप्रच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
********************************************
निफाड आयटीआयची जागा वाचली : अॅड. नितीन ठाकरे
यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, मविप्र संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात ज्यांनी शिक्षण घेतले त्या उन्मेष वाघ यांचा एक माजी विद्यार्थी म्हणून सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांना आज प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित केले. ४० वर्षांपासून निफाड कारखान्याकडून भाडे तत्वावर घेतलेल्या निफाड आयटीआयच्या जागेवर ड्रायपोर्ट होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने ती जागा खाली करण्यास सांगितले होते. प्रशासनाने याबाबत जेएनपीएशी पत्र व्यवहार केला. परंतु सुदैवाने उन्मेष वाघ जेएनपीएचे चेअरमन असल्याने त्यांच्यामुळे विस्थापित होण्यापासून संस्थेला वाचविले. तसेच त्यांनी ही इमारत नवीन बांधून देण्याचे आश्वासनही दिले. तसेच त्यांनी याआधी संस्थेला ३८ लाख रुपये सीएसआर फंडमधून दिलेले आहे.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा