काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर !

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर !

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे. समवेत उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ऍड. संदीप गुळवे.
नमस्कार,


आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या प्रिंटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत आपणा सर्व मान्यवरांचे मी मविप्र परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो.
सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बडोदानरेश सयाजीराव गायकवाड महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, धारनरेश श्रीमंत उदाजीराव महाराज पवार आदींच्या प्रगल्भ पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेली ही संस्था आहे. या समाजसुधारक आणि राजे महाराजांच्या सेवाभावी कार्य आणि  विचारांतून प्रेरणा घेत आद्य कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर डी. आर. भोसले आदींनी या संस्थेची पायाभरणी केली. संस्थेने धार, बडोदे, ग्वाल्हेर, कोल्हापूर, इंदोर, जत, सुरगाणा आदी राजांचा आश्रय आणि लोकाश्रयाच्या बळावर ५०४ ज्ञानशाखांपर्यंत उंच भरारी घेतलेली आहे. ही एक संघर्षमय, प्रेरणादायी इतिहास आणि समृद्ध वारसा असलेली शैक्षणिक व सामाजिक संस्था आहे हे आपण सर्वजण जाणताच आहात. समाजधुरिणांनी संस्थेद्वारा ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन गेली ११० वर्षे जिल्ह्यातील अठरापगड जातीतील लाखो विद्यार्थ्यांची जीवनबाग  फुलवली. अज्ञानाचा अंधकार मिटवून प्रकाशाची वाट उजळ केली. शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शक कारभार ही त्रिसूत्री जपली. लोकशाही पद्धतीने कारभार करून शिक्षणाचा उच्चतम दर्जा आणि यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली.संस्था उपक्रमशीलता, नाविन्याचा ध्यास, सामाजिक बांधिलकी, संशोधन आणि बहुजन हित याचीच कायम वाहक बनून राहिली. म्हणूनच महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ती मानबिंदू ठरलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही.
अशा मविप्र संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ वा. मराठा हायस्कूलच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेने ११० वा वार्षिक अहवाल प्रकाशित केलेला आहे. संस्थेच्या सर्व १०,६६० सभासदांपर्यंत सदर अहवाल व मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त हे घरपोच दिलेले आहे. तसेच त्या समवेत संस्थेचे मुखपत्र असलेल्या मविप्र पत्रिकेचा कृषी विशेषांक हादेखील प्रत्येक सभासदाला पोहोच केलेला आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विशेष माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी आपणास पाचारण केलेले आहे. 

महत्त्वपूर्ण व ठळक बाबी
संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. सुनील उत्तमराव ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सन्माननीय सभासद यांच्या उपस्थितीत पुढील विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय पारित केले जाणार आहेत.
१) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२) म.वि.प्र. समाजाचा सन 2023- 24 चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे. 
३) सन 2023- 24 चे म.वि.प्र. समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे व सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च, उत्पन्न पत्रके व ताळे बंद पत्रके यांना मंजुरी देणे.
४) सन 2024- 25 साठी म.वि.प्र. समाजाचे मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांच्या एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
५) सन 2024 -25 साठी हिशोब तपासणीसांची नेमणूक करणे.
६) संस्थेच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करणे तसेच म.वि.प्र. समाजाच्या विकासासाठी आर्थिक बाबींचा विचार करणे.
७) म.वि.प्र. समाजाच्या ध्येय धोरणांनुसार पुढील कार्याची दिशा ठरवणे.
८) म.वि.प्र. समाज संस्थेच्या बोधचिन्हात संस्थेचे स्थापना वर्ष समाविष्ट करणेबाबत निर्णय घेणे.
९) माननीय अध्यक्षसाहेब यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे. 
या अनुषंगाने संस्थेचा हिशोब व इतर कागदपत्रे संस्थेच्या सभासदांना दि. २४.०८.२०२४ ते २९.०८.२०२४ या कालावधीत सुट्टीचे दिवस सोडून दुपारी बारा ते चार या वेळेत मध्यवर्ती कार्यालयात पाहण्यासाठी ठेवलेले होते.
*******************************************
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अहवालातील ठळक विशेष
१. संस्थेतील नावीन्यपूर्ण उपक्रम: संस्थेच्या आधीच्या ४२ उपक्रमांबरोबरच यावर्षी गांडूळ खत प्रकल्प, रेशीम निर्मिती उद्योग, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन, करिअर कट्टा, बांबू प्रक्रिया उद्योग, मविप्र पत्रिका, अंध विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, प्रज्ञा : बौद्धिक संपदा केंद्र, प्रतिभा संपादन कक्ष, सेंटर फॉर कोलॅबोरेशन अँड एक्सलन्स (सीसीई), माजी विद्यार्थी व कर्मचारी संघ असे १२ नवीन उपक्रम संस्थेत यशस्वीपणे राबवले जात आहेत. त्याचे उत्तम परिणाम मिळत आहे. यात भविष्यात सातत्य राखले जाणार आहे. 
शाखांची थोडक्यात माहिती : 
A. गांडूळ खत प्रकल्प : के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या माध्यमातून ५०० हून अधिक विद्यार्थी व शेतकऱ्यांना जैविक कचऱ्याचे गांडूळ खतामध्ये रूपांतर करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
B. रेशीम निर्मिती उद्योग : या अंतर्गत समाजातील १०० पेक्षा अधिक शेतकरी व विद्यार्थी यांना उद्योगासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
C. डिजिटल शिक्षण : या माध्यमातून होरायझन अकॅडमी नाशिक व लोयलोनेट एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. विद्यार्थ्यांची शिक्षण व तंत्रज्ञानाशी सांगड घालून शाळांचे आयसीटी शाळांमध्ये यशस्वी रूपांतर होण्यास मदत होणार आहे. यामुळे आय.टी. क्षेत्रातील विविध संधीसाठी तरुणांना तयार केले जाणार आहे. हा शिक्षणासाठी डिझाइन केलेला एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म आहे. 
D. बांबू प्रक्रिया उद्योग : संस्थेच्या आय.टी.आय.च्या माध्यमातून बैलगाडी, आकाश कंदील, विविध आकर्षक गृहोपयोगी वस्तू, अगरबत्ती यांचे उत्पादन करून विक्री पोटी १ लाख ७२ हजार २०५ इतकी रक्कम अहवाल काळात जमा झालेली आहे. संस्था स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे
E. प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्र : सेंटर फॉर प्रमोशन रिसर्च अँड अवेअरनेस ऑफ इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी अँड इनोव्हेशन अर्थात संस्थेत प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थी व प्राध्यापक यांनी लावलेले शोध व केलेली निर्मिती यासंदर्भात पेस्ट फायलींसाठी येणाऱ्या खर्चातील ५० टक्के वाटा म.वि.प्र. संस्था उचलणार आहे. यामुळे संशोधनाला मोठी गती मिळणार आहे.
F. अंध विद्यार्थ्यांसाठी उपक्रम : चेन्नईच्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन या संस्थेकडून के.टी.एच.एम. महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना इमेट (एम्पलोयबिलिटी, मोबिलिटी एज्युकेशन ट्रेनिंग) प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात सहभागी विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप व व्हिजन ग्लासेस देण्यात आले असून, त्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण राबविणारे के.टी.एच.एम. हे महाराष्ट्रातील पहिलेच महाविद्यालय आहे. 
G. मविप्र पत्रिका : संस्थेचे मुखपत्र असलेल्या या पत्रिकेचा पहिला अंक नवीन शैक्षणिक धोरण विशेषांक होता. दुसरा अंक हा आरोग्य विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला होता. नुकताच प्रकाशित झालेला कृषी विशेषांक हा लक्षणीय असून, कृषी क्षेत्रातील बदलते आयाम, शेती : काल ,आज आणि उद्या, शेती क्षेत्र व रोजगार निर्मिती, भारतातील सहकार चळवळ यांना व्यापणारा आहे. संस्था उपक्रमांची माहिती व नामवंत तज्ञांचे लेख यामुळे या अंकांना संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. ३० हजार प्रती इतका त्याचा खप आहे.
H. प्रतिभा संपादन कक्ष : या अंतर्गत तंत्रज्ञान रोजगाराच्या संधी व कौशल्य यांचा शोध घेतला जातो. सर्वोत्कृष्ट प्रतिभा ओळखून त्याला दिशा देण्याचे काम या कक्षामार्फत केले जाते. गरजू उमेदवारांना नोकऱ्या शोधण्यात कक्षाद्वारे सहकार्य केले जाते व संधींची जाणीव करून दिली जाते.
I. सेंटर फॉर कोलॅबोरेशन ॲण्ड एक्सलन्स : या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे केंद्र सक्रिय शिक्षण, विद्यार्थी व शिक्षक यांचा व्यावसायिक विकास साध्य करते. या केंद्रामार्फत आतापर्यंत इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आयुका, पुणे (IUCAA), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, आयसर, पुणे (IISER), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स, मुंबई (NISM), महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट ॲकॅडमी, पुणे (MSFDA) आणि विंजित टेक्नॉलॉजीस, नाशिक (Winjit) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
MSFDA मार्फत आतापर्यंत १० कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. यात  तज्ज्ञांनी मविप्रच्या प्रोफेशनल कॉलेजच्या ४४० हून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले. संस्थेने IISER पुणे सोबत मिळून (STEM) विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांवरील कार्यशाळा आयोजित केल्या. या कार्यशाळांमध्ये संस्थेच्या माध्यमिक विभागातील १५० हून अधिक विज्ञान व गणित विषयातील शिक्षकांना Hands On Training देण्यात आले. यासाठी आयसरमार्फत ॲक्टिव्हिटी किट्स वाटप करण्यात आले.आयुका (IUCAA)  मार्फत २५ माध्यमिक शाळांसाठी टेलिस्कोप मेकिंग वर्कशॉप घेण्यात आले. प्रत्येक शाळेसाठी एक टेलिस्कोप उपलब्ध करून देण्यात आला.NISM द्वारे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत सर्टिफिकेट कोर्सेस आणि सर्टिफिकेशन दिली जातील. विंजित टेक्नॉलॉजीस (Winjit) च्या सहकार्याने के. बी. टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सेंटर फॉर एक्सलन्स (Centre for Excellence) लॅबची स्थापना केली. या लॅबमध्ये ॲपल कंपनीचे १६ संगणक उपलब्ध आहेत. सीसीईमार्फत केंद्रीय विद्यालय अहमदाबाद यांच्या सहकार्याने प्राथमिक शिक्षकांना गॅमीफिकेशनचा वापर करून इंग्रजी व्याकरण शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
J. माजी विद्यार्थी व कर्मचारी संघ : म.वि.प्र. संस्थेतर्फे संस्थास्तरावर माजी विद्यार्थी व कर्मचारी संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्याबरोबरच संस्था मजबुतीकरण, ज्ञानाचे आदान प्रदान, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, नोकरीच्या संधी या बाबींसाठी ती कार्यरत आहे. या संघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माजी कर्मचारी, विद्यार्थी, विविध उद्योग समूह, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून शाखांसाठी पुस्तके, संगणक संच भेट, ग्रंथालये व प्रयोगशाळा उभारणी करून दिली जात आहे. तसेच काही नामांकित कंपन्यांकडील सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. यामुळे संस्थेला भौतिक सुविधा प्राप्त होत आहे, पर्यायाने शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे.
*******************************************
२). नवीन शाखा : या वर्षात संस्थेने सात नवीन शाखा सुरू केल्या असून, त्यात एक इंग्रजी माध्यम होरायझन पूर्व प्राथमिक शाळा (पिंपळगाव ब.), दोन आरोग्य केंद्र (मालेगाव व नांदगाव), एक तेरा मजली अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह, प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्र, प्रतिभा संपादन कक्ष (टॅलेंट ॲक्क्विझीशन सेल), सेंटर फॉर कोलॅबोरेशन अँड एक्सलन्स यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संशोधनाला गती, शिक्षकांचे प्रशिक्षण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राची सांगड, तंत्रज्ञान, रोजगार संधी आणि कौशल्यांचा शोध या उद्देशांच्या पूर्तीसाठी या शाखा सुरू करण्यात आलेल्या आहेत. 
३). नोकरीसाठी निवड अर्थात प्लेसमेंट : वर्षभरात संस्थेच्या २७ वरिष्ठ महाविद्यालयांतील २११७ विद्यार्थ्यांना आम्ही विविध उद्योगसमूहांच्या माध्यमातून  परमनंट नोकऱ्या दिलेल्या आहेत. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन या उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज पॉलिटेक्निक मध्ये ७० ते १०० उद्योजक आणि विद्यार्थी यांच्यात ६० मीटिंग झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यामुळे मार्गदर्शन व नोकऱ्या मिळालेल्या आहेत. १५० कोटींपेक्षा अधिक रकमेचा व्यवसाय व्यावसायिकांना मिळालेला आहे.
 ४). शैक्षणिक गुणवत्ता वाढ, संशोधन व पेटंट : अहवाल काळात संस्थेतील ३८ प्राध्यापकांनी विविध नामवंत विद्यापीठांतून पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली आहे. इतर पदव्या मिळवणाऱ्या सेवकांची संख्या विपुल आहे. तसेच विविध महाविद्यालयातील २८ प्राध्यापकांनी पेटंट प्राप्त केलेले आहे.याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, आदर्श शिक्षक पुरस्कार, संशोधन पर लेखन, ग्रंथ लेखन करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांची संख्या दीडशेहून अधिक आहे. त्यातील प्रातिनिधिक २५ प्राध्यापकांचा  निर्देश अहवालात केलेला आहे.
५). विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी : अहवाल काळात संस्थेच्या विविध शाखांतील विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रकार स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा, बोटक्लब, एन. एस. एस., एन.सी.सी.नेव्हल एनसीसी  यातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके व अन्य मानांकने प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा अहवालात आवर्जून समावेश केलेला आहे. ही संख्या ३३८ इतकी आहे.तालुका व जिल्हा विभागीय स्तरावरील गुणवंतांचा आकडा फार मोठा आहे. याशिवाय विविध शाखेतील टॉपच्या सोळा विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अहवालात नमूद केलेली आहे.
६). शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक योजना : मध्यवर्ती कार्यालयासह संस्थेच्या २४८ शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवून त्यातील व्याजातून के.जी. टू पी.जी. च्या वर्गांसाठी  गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके ठेवलेली आहेत. देणगीदारांची नावे, ठेव रकमा, स्मरणार्थ नोंदींचा  आढावा अहवालात घेतलेला आहे. याशिवाय २०२३-२४ शैक्षणिक वर्षात २०९ देणगीदारांनी ७५ शाखांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिकांसाठी किमान रुपये ५००० ते कमाल १,७५,००० पर्यंत ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यांचा स्वतंत्र निर्देश अहवालात केलेला आहे. ही योजना विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, अभ्यासात चढाओढ निर्माण करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी खूपच फायदेशीर ठरलेली आहे. 
७). मध्यवर्ती कार्यालय व अन्य शाखांना प्राप्त देणग्या : अहवाल वर्ष २०२३-२४ या काळात मध्यवर्ती कार्यालयास सेवक, सेवाभावी संस्था, उद्योगसमूह असे सर्व मिळून ७९ देणगीदारांनी विविध निमित्ताने किमान ५००० ते कमाल पंचवीस लाख रुपये इतक्या देणग्या दिलेल्या आहेत तसेच सेवक, सभासद, ग्रामपंचायती, बँका, विविध फाउंडेशन्स, रोटरी क्लब, पतसंस्था, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ, उद्योग कंपन्या, सार्वजनिक मंडळे आदींच्या माध्यमातून संस्थेच्या ६७ शाखांना रोख रक्कम व वस्तुरूप स्वरूपात देणग्या प्राप्त झालेल्या आहेत. तसेच खासदार व आमदार निधीतून पाच शाखांना वस्तू रूपात देणग्या मिळालेल्या आहेत. या देणग्यामुळे शाळांमधील भौतिक सुविधांमध्ये चांगली भर पडलेली आहे. यामुळे लोकसहभागातून संस्था विकासाला मोठा हातभार लागलेला आहे. या सर्वांप्रति संस्था कृतज्ञ आहे. 
८). सेवानिवृत्त सेवक : संस्थेच्या विविध शाखांतून या शैक्षणिक वर्षात १७४ सेवक सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या सर्वांचा संस्था ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून यथोचित सन्मान करणार आहे. त्यांचे ऋण व्यक्त करणार आहे. तसेच अहवाल काळात संस्थेतील २२ सेवकांचे दुःखद निधन झालेले असून संस्था पदाधिकारी, संचालक, सभासद त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. 
९). जमीन खरेदी तपशील : अहवाल काळात संस्थेने मौजे टाकेघोटी ता. इगतपुरी व मौजे कोकणगाव ता. दिंडोरी ७ एकर १५ आर नवीन क्षेत्र खरेदी केलेले आहे. संस्थेचे आजवर एकूण १०४४ एकर २६ आर एवढे क्षेत्र आहे.
१०). बांधकाम आढावा :  अहवाल काळात संस्थेच्या ७७ शाखांमध्ये नूतन इमारती, विस्तारित इमारती, फॅब्रिकेशन वर्क, स्वच्छतागृहे, प्रवेशद्वार, पार्किंग, वॉल कंपाऊंड, विद्युतीकरण, पेव्हर ब्लॉक, मेंटेनन्स आदी कामे मंजूर करण्यात आली होती. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झालेली असून काही कामे सुरू आहेत. तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
११). कर्ज तपशील : ३१ मार्च २०२३ रोजी संस्थेच्या सर्व शाखांचे व मध्यवर्ती कार्यालयाचे कर्ज ३५ कोटी ७४ लाख ४४ हजार १७४ रुपये इतके बाकी होते. अहवाल काळात संस्थेने ९ कोटी ७३ लाख १० हजार ३६६ रुपये इतक्या कर्जाची परतफेड केलेली असून, दिनांक ३१.०३.२०२४ रोजी संस्थेवर २६ कोटी ७५ लाख १२ हजार ७०० रुपये कर्ज बाकी होते. २०२४-२५ साठी संस्थेचे सुमारे १०८७ कोटी ५८ लाख अंदाजपत्रक आहे.
१२). व्यावसायिक व प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्सेस: संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ७१ व्यावसायिक व प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्सेस सुरू आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व महाविद्यालयांना  NAAC Grade साठी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक महाविद्यालयातील संशोधन पर लेख प्रकाशित करणाऱ्या प्राध्यापक संशोधक विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. 
१३). करिअर कट्टा : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी व समान पातळीवर शिक्षणासाठी 'करिअर कट्टा' हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत 'आय.ए.एस. व उद्योजक आपल्या भेटीला’ या उपक्रमांत तज्ज्ञांच्या ऑनलाइन मार्गदर्शनातून नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी निर्माण करणारे हात समोर यावेत यावर भर दिला जातो. ऑनलाइन मार्गदर्शन, श्रेयांक प्राप्ती व व्यवसाय संधी या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे विद्यार्थांसाठी विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महाविद्यालयात 'मॉडेल कौशल्य विकास केंद्र निर्मिती, इन्क्युबेशन सेंटर, सामंजस्य करार, विद्यार्थी संसद, रोजगार मेळावे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आवाज कार्यशाळा आदी उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयास 'सेंटर ऑफ एक्सलंस’ (अ श्रेणी) मानांकन व अन्य तीन पुरस्कार मिळाले आहेत. या महाविद्यालयास शासनाकडून विविध उपक्रमांसाठी १५ लाखांचे अनुदान मंजूर झालेले आहे. तर सायखेडा महाविद्यालयास जिल्ह्यातील पाचवे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरविले गेलेले आहे.
१४). NAAC मानांकने : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात संस्थेच्या १० महाविद्यालयांचे NAAC अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद व एन.बी.ए .(राष्ट्रीय मान्यता मंडळ) यांचे कडून मूल्यांकन झाले. त्यात एका महाविद्यालयास A ग्रेड ,तीन महाविद्यालयांना B ++ग्रेड चार महाविद्यालयांना B +ग्रेड आणि दोन महाविद्यालयांना B अशी मानांकने मिळाली. ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची व प्रतिष्ठेची बाब आहे. उर्वरित १७ महाविद्यालयांना यापूर्वीच B ते A++ मानांकने मिळालेली आहेत. काही महाविद्यालये पुढील सायकलला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत.
 १५). भावी योजना : संस्थेद्वारा पुढील काळात आयुर्वेद महाविद्यालय, दंत वैद्यक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय, पशुवैद्यक महाविद्यालय, हॉर्टिकल्चर महाविद्यालय, मिल्ट्री प्रिपेटरी स्कूल, बी होक ॲव्हिएशन, टिशू कल्चर लॅब,स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्याचा मानस आहे.
१६). संस्था दृष्टिक्षेपात : संस्थेचे १०१९७ जनरल सभासद व ४६३ आजीव सेवक सभासद आहेत. सर्व ज्ञानशाखांमध्ये २,१३,५७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेत १११६१ सेवक असून, संस्थेच्या ५०४ शाखांमधून ते उत्तम सेवा देत आहेत.

संस्थेचे सन्माननीय सभासद, आश्रयदाते, हितचिंतक, राज्यकर्ते, नेतेगण, आजी माजी सेवक व विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक या सर्वांच्या सहकार्याने संस्था यशस्वीपणे उत्कर्षाकडे वाटचाल करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. यानिमित्ताने एवढेच...
बाकी सभेच्या नियमानुसार इतर सर्व बाबींची चर्चा ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाईल.
आपणा सर्वांचे मनस्वी आभार. Thanks.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !