भास्कर यांच्यामुळेच  आमचा, कलेचा भाग्योदय - सदाशिव. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

भास्कर यांच्यामुळेच 

आमचा, कलेचा भाग्योदय ! 


  "१९७३ साली भास्कर कुलकर्णी गंजाडला आमच्याकडे प्रथम आले आणि त्यांच्या येण्याने माझे वडील जिव्या सोमा मशे लोकांसमोर आले ! आमची वारली कला उजेडात आली. वारल्यांचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. त्यांच्या येण्याने आमच्या वारली जमातीचा व पारंपरिक कलेचा भाग्योदय झाला. ते वारली आणि मधुबनी या लोककलांचे तारणहार ठरले. त्यांच्या रुपात देवच भेटला. नाहीतर वारली जमात आयुष्यभर वेठबिगारी करीत राहिली असती. वारली कला जनमानसात पोहोचली त्याला लवकरच ५० वर्षे होतील."  -हे उदगार आहेत पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सदाशिव यांचे...


   वारली चित्रशैलीवरील लेखमालेतील ५० लेखांचा माझा संकल्प गेल्या आठवड्यात पूर्ण झाला. त्यानंतर प्रतिभावान वारली कलाकारांवर नवी लेखमाला लिहिण्याचे ठरवले. अर्थातच पहिले नाव समोर आले ते वारली कलेचे पितामह पद्मश्री मशे यांचे चिरंजीव सदाशिव यांचे. त्यांचा जन्म डहाणू तालुक्यातील गंजाड या गावात १ जून १९५८ रोजी झाला. वाडा येथील आश्रमशाळेत नववीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वारली चित्रे रेखाटायला प्रारंभ केला. १९८० साली ते वडिलांबरोबर प्रथम दिल्लीला गेले. ते म्हणतात, "आधी मला चित्रे रेखाटण्यात रुची नव्हती. दिल्लीतल्या मुक्कामी मला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद बघून वारली कलेचे महत्त्व व मोल जाणवले. १९९४ साली वडील आणि मी जपानच्या मिथिला म्युझियममध्ये गेलो. ७ महिने तेथे राहून कलानिर्मिती केली. १९९५ पासून आता जवळपास दरवर्षी तेथे जात आहे. माझ्याबरोबर शांताराम घोरखना हा माझा सहकारी देखिल असतो. आम्ही ओसाका, नागासाकी, हिरोशिमा, योकोहामा, साईतमा या गावांमध्ये तसेच जवळच्या आकातामारी व इतर बेटांवरही वारली चित्रांची प्रदर्शने भरवली.१९९९ साली सिंगापूरला एका महिन्यासाठी एकटाच गेलो. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. भारतात मुंबई, नागपूर, भुवनेश्वर, चंदीगड, भोपाळ, गोवा या शहरांमध्ये प्रदर्शने, प्रात्यक्षिके, कार्यशाळा घेतल्या तसंच चित्रांची भरपूर विक्रीही केली. मी प्रामुख्याने आमच्या परंपरा, चालीरीती, देवदेवता, भातशेती, तारपानृत्य व कांबडीनाच यावर आधारित चित्रे रंगवतो."


   सदाशिव यांनी त्यांचे वडील जिव्या, आई पवनीबाई व गावातील वृद्ध व्यक्तींकडून पारंपरिक लोककथा, कहाण्या ऐकल्या. त्यातील महादेव, नारनदेव यांच्या तसेच इतर कहाण्यांंवर आधारित असंख्य चित्रे त्यांनी रंगवली आहेत. त्यांची १४ एकर सामायिक शेती आहे. जूनपासून दिवाळीपर्यंत मशे परिवार शेतीकामात व्यग्र असतो. मुख्यत्वे भात त्याबरोबर नागली, ज्वारी, तूर, उडीद, चवळी आणि भाजीपाला ते पिकवतात. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे परदेशातच काय, त्यांचं  गंजाड हे गाव सोडून त्यांना कुठेच जाता आलेले नाही.चित्रांच्या ऑर्डर्सचे प्रमाणही कमी झाले आहे. पण हा सारा मशे परिवार वारली कलेला समर्पित आहे. सदाशिव मांजरपाट कापड, कागद, कॅनव्हासवर चित्रे रंगवतात. त्यासाठी पांढरा जलरंग व बांबूची काडी, खजरीचा काटा ब्रश म्हणून वापरतात. त्यामुळे चित्र आकर्षक, उठावदार दिसतं, असं ते सांगतात. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे मे २०१८ मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या हयातीतच वारली चित्रदालनाचे त्यांचे स्वप्न सदाशिव व मशे परिवाराने पूर्ण केले. त्यात मशे यांनी भिंतींवर व भव्य आकारातील मांजरपाटावर रंगवलेली वारली चित्रे जतन केली असून कलारसिकांना ती बघायला मिळतात. त्यातील एका चित्रात त्यांनी आपली जीवनकहाणी चित्रित केली आहे. कलादालनाच्या जवळच मशे यांच्या स्मृती अर्धपुतळ्याच्या रूपाने जपल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधून वारली चित्रसाधनेत मग्न असणारे सदाशिव सविस्तर माहिती देतात. त्यांचा लहान भाऊ बाळू, पुढील पिढीतील विजय, किशोर, प्रवीण, जयश्री, अनिता असे सारे वारली कलेच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान देत आहेत.


                                           -संजय देवधर

(ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ञ )
***********************************
वारली कलेची भ्रष्ट नक्कल नको!


   वारली चित्रे आता हॉटेल्स, घरांचे दिवाणखाने अशा विविध ठिकाणी रंगवलेली दिसतात. लोकांना वाटतं एखाद्या कापडावर चित्र रंगवले की झाले वारली पेंटिंग ! पण शहरी नागरिकांना आमच्या आदिम परंपरा, संस्कृती, देव याविषयी काहीच माहिती नसते. त्यामुळे वारली कलेच्या भ्रष्ट नकला साड्या, ओढण्यांपासून भांड्यांवर देखील केल्या जातात. हे टाळले पाहिजे. तरच कलेची शुद्धता राखली जाईल. परदेशी कलासंग्राहकांना वारली कलेबद्दल खूप आस्था, जाणकारी आहे. सुरुवातीला माझे वडील माझ्या चित्रातील माणसांच्या आकृत्यांमध्ये सुधारणा करून द्यायचे. मात्र परदेशातील जाणकारांच्या चुकीचे तपशील, रेखाटन बरोबर लक्षात यायचे.अशा प्रकारचे अस्थानी चित्रांकन करू नका, असे ते आग्रहाने सांगायचे. ही जाणीव, कलासाक्षरता आपल्याकडे नसल्याची खंत वाटते, असे सदाशिव मशे नमूद करतात.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!