वारली चित्रकलेच्या सार्वत्रिक प्रसारासाठी... ( भाग तिसरा). लेखमाला लवकरच ग्रंथरूपाने येणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!वारली चित्रकलेच्या सार्वत्रिक प्रसारासाठी...


( भाग तिसरा)

 कलावंतांचे दोन प्रकार प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे पारंपरिक ज्ञानाच्या माध्यमातून वारसा जसाच्या तसा पुढे नेणारे; कलेविषयी आदर, श्रद्धा बाळगून तिच्यासाठी अथक कष्ट करणारे. दुसरे आपल्या परंपरागत कलेत स्वतःच्या प्रतिभेने नवनिर्मितीची भर घालणारे; नवनवीन प्रयोग करीत वेगवेगळ्या शक्यता तपासून बघणारे. असे कलावंत कलेमध्ये कालानुरूप परिवर्तन घडवतात. मात्र हे करताना मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही याचीही दक्षता घेतात. गेल्या १६ वर्षांत अभ्यास, संशोधन करताना मला दोन्ही प्रकारचे अनेक आदिवासी कलाकार भेटले. त्यांच्याकडून वारली कलेचे विविध पैलू जाणून घेतले. ते तपासून, चिंतन करून त्यातूनच वारली चित्रशैलीचा प्रचार, प्रसार करता आला. या दीर्घ लेखमालेत ज्येष्ठ तसंच युवा वारली कलाकारांची आणि मी रेखाटलेली चित्रे वापरल्याने लेखांची वाचनीयता व आकर्षकता वाढली.ही लेखमाला ११ शतके वारली कलेची जपणूक करणाऱ्या सर्व कलाकारांना, ही कला प्रकाशात आणणारे भास्कर कुलकर्णी, पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित ! 

  चित्रकार व पत्रकार या नात्याने गेल्या ४० वर्षांत विविध ललित कलांचा परामर्श मला घेता आला. वास्तववादी चित्रणशैलीपासून आजच्या डिजिटल पेंटिंगपर्यंतची अनेक स्थित्यंतरे मी अनुभवली. या वाटचालीत निरागस, कलाप्रेमी आदिवासींच्या वारली चित्रशैलीने मोहून टाकले. नंतर जाणीवपूर्वक याच कलेवर लक्ष केंद्रित करून संशोधनात्मक अभ्यास केला. ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. प्रयत्नपूर्वक मिळविलेले समृद्ध संचित रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 'वारली चित्रसृष्टी' व इंग्रजीत 'वारली आर्ट वर्ल्ड' या पुस्तकांच्या आवृत्या  माझ्याच 'कल्पक प्रकाशना'तर्फे प्रकाशित केल्या. शब्द-चित्रांचा सुरेख समन्वय त्यातून साधता आला. ११०० वर्षांची परंपरा लाभलेल्या वारली कलेत आदिवासींच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. चित्रांतून ते मुक्त संवाद साधतात. वरवर बघताना निसर्गचित्र वाटले तरी त्या चित्रांमागे समृद्ध कथाविश्व असते. त्या कथा जाणून त्यातील संदर्भ लक्षात घेतले, तर चित्रांचा आनंद मनाला अधिकच भिडतो. म्हणून आस्वादक वृत्तीने ही कला समजून घेतली पाहिजे. वारली कलाकारांनी अनेक पारंपरिक लोककथांना चित्ररुप दिले आहे. साध्यासोप्या रेषांच्या माध्यमातून संकेत व्यक्त करणे, हा आदिवासी वारली कलेचा गाभा आहे. अल्पशिक्षित वारली जमातीचे भौमितिक ज्ञान कौतुकास्पद म्हटले पाहिजे. काही बिंदू, रेषा तसंच त्रिकोण, वर्तुळ,चौकोन या मूलभूत आकारांवर वारली कला आधारित आहे. गणिती ज्ञानाचे सामूहिक उपयोजन त्यांनी कल्पकतेने केलेले दिसते. म्हणूनच या कलेचे मूळ स्वरूप बिघडू न देता तिचा विकास व्हायला हवा, हे माझे आग्रही मत मी वेळोवेळी मांडले आहे.

    पावसाळ्याच्या प्रारंभी वारली चित्रकार पावसाची, शेतीची, नाचणाऱ्या मोरांची चित्रे आपल्या झोपडीच्या भिंतीवर रंगविताना दिसतात. निसर्गावर त्यांची अपार श्रद्धा असते. अशी चित्रे रंगवली की भरपूर पाऊस पडून अन्नधान्याची समृद्धी येईल असे त्यांना वाटते. केवळ पांढऱ्या रंगात निसर्ग, इंद्रधनुष्य रंगवलेले असूनही त्यात रंगांची उणीव भासत नाही हे विशेष ! आदिवासी वारली स्त्रीपुरुष भिंतीवर चित्र रेखाटताना सर्वप्रथम आयताकृती किनार (बॉर्डर) काढतात. नंतर मधल्या मोकळ्या जागेत ठरविलेला विषय चित्रित करतात. आकर्षक किनारीमुळे आशय अधिकच खुलतो. चित्राला उठावदारपणा येतो. काळाच्या ओघात अनेक कलाप्रकार निर्माण होतात. तेवढ्यापुरत्या त्या कला लोकप्रिय होतात. पण जशा फॅशन्स येतात व काही दिवसांत मागे पडतात, तशाच त्या कलाही तात्कालिक ठरतात व लुप्त होतात. काळाच्या कसोटीवर ज्या थोडया कला उतरतात त्याच चिरंतन आनंद, समाधान देतात. विश्वव्यापी ठरतात. याच श्रेणीतील वारली चित्रशैली शाश्वत कला म्हणून जगभरात पोहोचली आहे. ती  पर्यावरणाला हानी न पोहचवता सर्वांनी निसर्गस्नेही जीवनशैली अंगिकारण्याचा जणु मूक संदेशच देते. कलेचा समृद्ध वारसा व शाश्वत कला असूनही तरुण वारल्यांना कामधंद्यासाठी शहराची वाट धरावी लागते. त्याला त्यांच्यात 'जगायला जातो', असे म्हटले जाते. आत्मनिर्भर आदिवासींना जगण्यासाठी त्यांचा पाडा सोडण्याची वेळ यायला नको असेल तर तेथेच रोजगार निर्मिती झाली पाहिजे.आता नवी पिढी शैक्षणिक प्रगती करीत आहे. त्यातील काहीजण डोळसपणे आपली कलापरंपरा नेटाने जपतानाही दिसतात. पांढऱ्या व्यतिरिक्त इतर रंगांचाही ते वापर करतात. जलरंग, तैलरंग, एक्रीलिक कलर्सच्या विविध रंगछटा पार्श्वभूमीवर वापरतात.असे काम जव्हार, डहाणूसारख्या विकसित भागात दिसते. दुर्गम पाडे मात्र अजूनही ५० वर्षे मागे आहेत!

   वारल्यांंचे वैशिष्ट्यपूर्ण तारपानृत्य व इतर नृत्यप्रकार लोकप्रिय आहेत.वारली कला जगभरात पोहोचण्यामध्ये तारपानृत्याच्या चित्रणाचाही मोठा वाटा आहे. वारली जमात उत्सवप्रिय आहे. वर्षभर विविध सण, उत्सव उत्स्फूर्तपणे  साजरे होतात. होळीचा सण आदिवासी बांधवांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा असतो. पंचतत्त्वांपैकी एक असलेल्या अग्निपूजनाची परंपरा होळीच्या सणात त्यांनी जपली आहे. धुळवड, रंगपंचमी सणांचे बहारदार चित्रण ते नेहमीच करतात. पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र आणि कलासंग्रहालय आहे. यंदा या संग्रहालयाने हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. एका लेखात त्याचाही आढावा घेतला. व्यासंगी लेखक, जिज्ञासू संशोधक, विचारवंत, उत्तम प्रशासक व माझे मार्गदर्शक असणारे डॉ.गोविंद गारे यांनी येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची निर्मिती केली आहे. त्यांचे बोट धरूनच मी प्रथमतः जिव्या सोमा मशे यांच्या कलमीपाड्यावर गेलो. त्यांच्याकडून वारली कलेतील बारकावे, तंत्र जाणून घेतले. हे दोघेही मला गुरुस्थानी आहेत. हे संग्रहालय जिज्ञासू रसिकांनी जरूर जाऊन बघितले पाहिजे. यंदा जानेवारीत जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत एकाही वारली कलाकाराचा समावेश नाही. २०११ साली वारली कला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या जिव्या सोमा मशे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र प्रामुख्याने महिलांनी जोपासलेल्या या कलेतील एकाही महिलेचा अद्याप असा राष्ट्रीय गौरव झालेला नाही. तलासरीची रीना उंबरसाडा - वळवी अकरा शतकांच्या समृद्ध परंपरेचे सर्जक प्रतिनिधित्व करते. तिला असा सन्मान मिळायला हवा असे मी माझ्या लेखात नमूद केले होते. ५० लेख पुरे करताना, वारली चित्रशैली प्रकाशात आली, त्यासही ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माझ्या परीने केलेले हे सिंहावलोकन म्हणता येईल. लेखमाला संपत आली असली तरी नव्याने जे समोर येईल त्याविषयी अवश्य लिहीत राहीन.(पुढील भागात लेखमालेवरील प्रतिक्रिया.)

                                          -संजय देवधर

 (ज्येष्ठ पत्रकार,वारली चित्रशैलीतज्ञ)
*********************************

"मी वारली चित्रशैली बोलतेय"

   साधीसोपी कला व आकारांचे सुलभीकरण हे माझे वैशिष्ट्य ! माझ्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करते आहे हे बघून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. चित्रकार आणि पत्रकार संजय देवधर यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वसामान्य रसिकांपासून अभ्यासकांपर्यंत माझे विविध पैलू पोहोचविले त्याबद्दल त्यांना धन्यवाद.तशी मी नेहमीच मूकपणे रसिकांशी संवाद साधते;मात्र देवधरांनी मला त्यांच्या लेखणीतून बोलते केले.भास्कर कुलकर्णी, जिव्या मशे यांच्यासह अनेकांनी माझी महती जगासमोर नेली. माझा इतिहास प्रेरक आहे, वर्तमानही सकारात्मक असून आगामी काळ देखील उज्वल असेल असा मला विश्वास वाटतो.आजचे तरुण वारली कलाकार हेच माझे आश्वासक भवितव्य आहेत. जोपर्यंत या पृथ्वीतलावर माणूस आहे तोपर्यंत मी त्याला आनंद देत राहीन.
********************************

लेखमाला लवकरच येईल ग्रंथरूपात !

   ही लेखमाला लिहिताना अनेकांचे सहकार्य मिळाले. माझे मित्र व ज्येष्ठ कवी, पत्रकार पराग वाड यांनी लेख तपासून दिले. अनेक वारली कलाकारांनी तपशील पुरवले. दैनिक गांवकरीचे संपादक वंदन पोतनीस, दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलासराव मराठे, न्यूज मसाला साप्ताहिकाचे संपादक नरेंद्र पाटील तसेच अन्य संपादकांनी आपुलकीने लेख प्रकाशित केले; म्हणूनच महाराष्ट्रातील असंख्य वाचकांपर्यंत पोहोचता आले. या सर्वांचा मी आभारी आहे. ही लेखमाला लवकरच पुस्तक स्वरूपात प्रकाशित होईल. वारली कलेचा परिचय शहरातील लोकांना जवळून व्हावा,आपल्या सुरक्षित 'कम्फर्ट झोन' मधून बाहेर पडून त्यांना आदिवासींची जीवनशैली अनुभवता यावी, या उद्देशाने मी अनोखा 'वारली चित्रसहल' हा उपक्रम राबवितो.(सध्या मात्र कोरोनामुळे त्याला काहीसा ब्रेक लागला आहे!) आतापर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक कलाप्रेमींना जव्हार, रामखिंड,पाथर्डी,गंजाड, कलमीपाडा,तलासरी या भागात एक दिवसाच्या अंतर्मुख करणाऱ्या सहलीला नेले. वाचणे, ऐकणे यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर वारली कला अधिक भावल्याचे माझ्याबरोबर येणारे सांगतात. अलीकडे आदिवासी वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श झालेलाही प्रकर्षाने जाणवतो. शहरात जाणाऱ्या युवकांच्या चित्रात त्यांनी बघितलेल्या उंच इमारती, फ्लायओव्हर्स बस, रेल्वे जहाजे, विमाने यांच्या प्रतिमा सहजपणे उमटतात. त्यांचे विस्तारलेले क्षितिज त्यात डोकावते. कलेच्या नव्या प्रयोगांमधून त्यांना नवनवीन रोजगार मिळत आहेत. मात्र हे सर्व करताना वारली कलेचे पावित्र्य जपले पाहिजे. विशुद्ध कलेचे मूळ स्वरूपाला धक्का न लागता योग्य ब्रँडिंग होणे देखिल आवश्यक आहे.

टिप्पण्या

  1. वारली चित्रकलेबद्दल खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. सर,आपण काढलेले वारली चित्र खूपच छान असतात.आपले लेखही वाचनीय आणि अभ्यास पूर्ण असतात आणि आपण वारली चित्रकला शिकवता देखील खु छान.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !