डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)
डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने....
(प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)
रसायनशास्त्राच्या अनेक शब्दांमध्ये अतिशय उत्तम शब्द आहेत.. त्यामध्ये उत्प्रेरक असा शब्द देखील आहे. प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर यांची भूमिका नेहमीच विद्यार्थ्यांसाठी एक चांगला शिक्षक म्हणून कॅटलिस्ट सारखी राहिलेली आहे. समाजात काही विशिष्ट लोकांचा ओरा Aura काही वेगळाच असतो त्यामध्ये बागलाण तालुक्यातील द्याने येथील भूमिपुत्र असलेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जसं पावसात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि पेरते व्हा असा सल्ला देणारा चातक पक्षी प्रमाणेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम कमी वयात प्राध्यापक म्हणून निवड झालेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर हे नाव सर्वांना सुपरिचित आहे. अभ्यास केंद्रित व्यक्तिमत्व असलेले प्रा. डॉ. कापडणीस सर यांचा नावलौकिक संपूर्ण विद्यापीठ आणि विद्यापीठ अंतर्गत असलेले नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये यांना सुपरिचित आहे. एखाद्या गोष्टीचा संपूर्ण पाठपुरावा कसा करावा आणि प्रत्येक ठरवलेल्या गोष्टीचा सांगोपांग निर्णय कसा लावावा हे सर्व गुण प्रा. डॉ. कापडणीस सरांकडून घेण्यासारखे आहेत. एखादी अवघड गोष्ट खलबत्त्यात घालायची आणि ती प्रयत्नपूर्वक कुटून काढायची हा त्यांचा सल्ला मी माझी त्यांच्याकडे पीएचडी करत असताना ऐकलेला आहे आणि अमलात देखील आणलेला आहे. त्यांनी मला पीएच डी च्या काळात मार्गदर्शन केले आहे आणि त्याबद्दल मी सरांचा आभारी देखील आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक पदे भूषवले आहेत. त्यामध्ये बोर्ड ऑफ स्टडीज आणि अकॅडमी कौन्सिल समाविष्ट झालेली आहेत. नाशिकच्या महात्मा गांधी संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवत परिश्रमाची विद्यावाचस्पती म्हणजेच रसायनशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळविली. पुढे पीएच डी मार्गदर्शक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ११ जुलै १९८८ रोजी बागलाण तालुक्यातील नामपुर महाविद्यालय पासून त्यांचा प्रवास चालू झाला. त्यानंतर १४ जुलै १९९७ मध्ये ते नाशिक मधील पंचवटी महाविद्यालयात रुजू झाले. तेव्हापासून ते आज ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत शिक्षण क्षेत्रात एकूण ३७ वर्ष सेवा प्रा. डॉ. कापडणीस सरांनी दिली. आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेच्या कालावधीत ते पंचवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य झालेत. अनेक वर्षांपासून ते रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सोबत कार्यरत असलेल्या आपल्या विभागातील आणि महाविद्यालयातील सहकाऱ्यांची आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी जागतिक संशोधन पत्रांमध्ये अनेक शोधनिबंध देखील लिहिलेत आणि आपल्या उत्तम शैक्षणिक दर्जाचा उपयोग करून अनेक देशांचा यशस्वी दौरा देखील रसायनशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेंच्या माध्यमातून त्यांनी केला आहे. सरांचे सर्व संशोधन लेखन हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी आहेत. संशोधन क्षेत्रात कापडणीस सरांचे मार्गदर्शक डॉ. पी. एस. निकम यांचे नाव जसे मोठे आहे तसेच कापडणीस सरांनी देखील आपल्या कर्तुत्वाने स्वतःचे नाव मोठे केले आहे. आपल्या बोलण्यामध्ये आपले पीएचडी मार्गदर्शक डॉ. पी एस निकम सर यांचे नाव मोठ्या अभिमानाने कापडणीस सर घेत असतात. कुटुंब वत्सल असलेल्या प्रा. डॉ. कैलास कापडणीस सरांना एक मुलगा आणि मुलगी असून मुलगा हितेश कापडणीस (M.S Mechanic) दुबई येथे नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे, तसेच स्नुषा सलोनी हितेश कापडणीस यांचे M.Sc संख्याशास्त्र शिक्षण पूर्ण झाले आहे. कन्या मानसी चैतन्य बच्छाव वैद्यक शास्त्रातील डॉक्टरेट (B.A.M.S) आहेत आणि सरांचे जावई श्री. चैतन्य दिलीप बच्छाव हे इंजिनीयर (M.E M.B.A) झालेले आहेत. त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. अनिता पाटील या पंचवटी महाविद्यालयात प्राणीशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. सरांना विविध पुरस्कार मिळालेले असून त्यामध्ये पंचवटी सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, म. गांधी विद्यामंदिर संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार समाविष्ट आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे ब्रीद वाक्य असून ते प्रा. डॉ. कैलास कापडणीस सरांनी तंतोतंत आपल्या वागण्यातून, वृत्तीतून, आत्मविश्वासातून आणि संस्थेच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत अमलात आणले आहे. चार भिंतीतील शिक्षण हे चार भिंतीतच न राहता ते समाज उपयोगी हिताचे कसे राहील याचा परिपूर्ण अभ्यास आणि त्याचे उपयोजन सरांनी आयुष्यभर आपल्या अखंड पेटवलेल्या ज्ञानयज्ञातून केले आहे आणि समाजाला दिशा दिलेली आहे. त्याचाच परिपाक म्हणून माझ्यासारखा सामान्य विद्यार्थी करंजाळी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा करतो आहे आणि त्याच प्रमाणे सरांचे विविध विद्यार्थी हे भारत आणि भारताबाहेर वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत. बी बोल्ड इन व्हॉट यू स्टँड फॉर म्हणजेच तुम्ही जी चांगली भूमिका घेतली आहे त्यासाठी नेहमी धैर्यशील रहा हे सरांचे आवडते वाक्य आहे. सेवा पूर्ण झाली तरी सुद्धा सर शांत राहणारे नाहीच.. ते स्वतःला कोणत्या ना कोणत्यातरी माध्यमांमध्ये गुंतवून कार्यमग्न ठेवतील आणि आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींना तसेच समाजाला मार्गदर्शन करतील. असे आजच्या कार्यक्रमाचे सेवापूर्ती स्थान असलेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर यांना दीर्घायुष्य, आरोग्यदायी भविष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!!
तुमचा लाडका विद्यार्थी
डॉ. रोहित मधुकर निकम
करंजाळी महाविद्यालय पेठ नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा