पत्रकारितेचा बदलता प्रवाह,,,,,,दर्पण दिनानिमित्त. ६ जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस आहे. तोच स्मृती दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!पत्रकारितेचा बदलता प्रवाह....||
       दर्पण दिनानिमित्त

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारातून जवळपास १८३ वर्षापूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. मराठीतील पहिले संपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात "दर्पण दिन" साजरा करतो. त्याकाळी  समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपला देश असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळ शास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ ची सुरूवात मुंबई येथे केली. त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा  त्यांनी समाज प्रबोधनासाठी उपयोग करुन घेतला. २५ जून १८४० साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, मनोरंजन, आणि समाजप्रबोधनाचा हेतू साध्य केला. 'दर्पण' मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू आणि तळमळ स्पष्ट होते. त्यावेळी गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.
वडील गंगाधरशास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक. त्यांचाच वारसा बाळशास्त्रींना मिळाला. कोकणांतील पोंभुर्ले या गावी जन्म आणि तद्नंतर मुंबईतील वास्तव्य, शिक्षण, शिक्षणातील अडीअडचणीवर मात केली.. बराच खडतर प्रवास बाळशास्त्री यांनी केला. १८२४ च्या सुमारास पोंभुर्ले सोडून बाळशास्त्री मुंबईत आले. इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. अगदी वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केले. तत्कालीन प्रमुख ८ भाषा व अनेक शास्त्रात ते पारंगत होते. त्यांची ग्रंथसंपदा पुष्कळ होती तसेच त्यांना अनेक सन्मान मिळाले होते. १८३४ साली भारतातील पहिले  प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि १८४५ साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर यांनी म्हटले आहे की, "बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते.
आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते. बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे.
समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडले.  समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत, याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांचे आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली.
एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या जांभेकरांना आपण दर्पणकार म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकीय सत्तेला उलथून टाकायचे असेल तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही, हे त्यांना फार पूर्वीच समजले होते.
वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.
आचार्य जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लेखन केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले.
ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते.
सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. यातूनच पुढे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. १८४० मध्येच त्यांनी "दिग्दर्शन" या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी, व्यतिरिक्त आठ ते दहा भाषा त्यांना येत होत्या.
या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व होते.  मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, आदी ग्रंथांची निर्मिती केली.
साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान देशाला दिले. या काळात समाज बहुसंख्येने निरक्षर, अंधश्रद्धाळू व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रात त्यांनी केलेले प्रचंड कार्य मोलाचे ठरते. ६ जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस आहे. तोच स्मृती  दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख "आद्य समाजसुधारक" असा केला जातो. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले येथे १८१२ च्या उत्तरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी १८४६ मध्ये निधन झाले.
मागील काळाचा विचार केला तर, त्यावेळी पत्रकारिता, वृत्तपत्र, हे व्रत होते. परंतु आता बदलत्या काळात त्याने व्यवसायाचे स्वरूप घेतले आहे. आता प्रिंट मीडिया- वृत्तपत्रे, आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया म्हणजे दूरसंचार सारखी माध्यमे प्रगत झालेली आहेत. पण त्या प्रगती बरोबरच त्यांच्या वर अनेक बंधने आली आहेत. कारण बहुतेक मोठी वृत्तपत्रे आणि दूरसंचार वाहिन्या हे कोणाच्यातरी अधिपत्याखाली आहेत. त्यांची वेगवेगळे मालक आहेत. अर्थातच ही भांडवलदार मंडळी आहेत. आणि आज ही सर्व भांडवलदार मंडळी राजकीय अर्थात सत्ताधारी पक्ष्यांच्या अंकित आहेत. म्हणजेच वृत्तपत्र वाहिन्या यांचे मालकांवर विचाराचा नाही म्हटलं तरी प्रभाव येतोच आणि त्यांच्यावर सरकारची दृष्टी ही असतेच. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन काही गोष्टी सत्य असल्या तरी दबावामुळे त्या बऱ्याच वेळा समोर येत नाही हे सत्य नाकारून चालणार नाही. मग त्या त्या वेळी जो पक्ष सत्तेवर असतो तो, पक्ष कुठलाही असो. त्यांच्याविरोधात लिहिल्या बातम्यांची नोंद घेतली जाते आणि मग आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या जाहिरातींना फटका बसतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत प्रबोधनाचं साधन ते मार्केटिंग असं काही स्वरूप आले आहे.
आताच्या काळात चर्चेमध्ये नेहमीच प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडिया यांच्यावर आरोप केला जातो कि ते प्रवाहाच्या दिशेने जात असतात किंवा आपल्या मालकांच्या विचाराच्या दिशेने जात असतात, त्यांना त्यांच्याशी जुळवून घ्यावेच लागते. आता वृत्तपत्र व्यवसाय म्हणजे मोठ्या भांडवली गुंतवणूक हे समीकरण झाले आहे. त्यामुळे त्यासाठी जाहिराती हेच मोठं माध्यम आहे. त्यामुळे वृत्तपत्राच्या संपादकाला स्वतःचा म्हणून वेगळा विचार करून वृत्तपत्र चालवता येत नाही. वेगळा विचार मांडता येत नाही.
आजच्या काळात जसे संपादकांच्या अग्रलेखातून परिवर्तन होत आहे असे आता राहिले नाही किंवा त्याला थोडे फारच वृत्तपत्र अपवाद ठरतील कारण फारच कमी म्हणजे  पाच-दहा टक्के लोकच अग्रलेख, विशेष लेख वाचतात हा निष्कर्ष आहे. आजच्या काळात पत्रकारितेच्या उद्देशात बदल झालेला आहे पहिल्या पानातच  बातम्यांनी त्यांची भूक भागते असेच काहीतरी झाले आहे.
लोकशाहीच्या चार स्तंभा पैकी माध्यम हा एक महत्त्वाचा चौथा स्तंभ मानला जात आहे. वृत्तपत्रांना समाजमनाचा आरसाही म्हणतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत तो स्तंभ डळमळीत झाला आहे काय ? त्या आरशात स्पष्ट असे काही दिसत नाही का ?अशी शंका निर्माण होत आहे. अर्थातच वृत्त माध्यमांचे मनोरंजनीकरण झाले आहे, असा  सूर अनेकदा होणाऱ्या चर्चांमधून वाचायला ऐकायला मिळतो. अनेकदा अनेक सत्य  समोर आणतांना पत्रकारांवर हल्ले होतात. त्यादृष्टीने अशा पत्रकारांसाठी सुरक्षितता ही आवश्यक आहे. आपले विचार निर्भीडपणे मांडणे आणि आपली विवेकबुद्धी जागृत ठेवणे हे पत्रकारांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी प्रवाहाच्याच दिशेने वाहत न जाता विरुद्ध दिशेलाही जाण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. अर्थात केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नाही. विचार करायची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि तो झाला तरच अशी समाजमनाचं प्रबोधन करणारी पत्रकारिता, शोधपत्रकारिता, टिकणार आहे. आज महाराष्ट्रात दर्पणकार बाळशास्त्रीं च्या स्मृतिप्रीत्यर्थ "दर्पणदिन" साजरा करतो. या दिवशी आपण या सर्व गोष्टींचा विचार एकूणच सामाजिक, राजकीय, आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया या सर्व पातळीवर करण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते. ती होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने दर्पणदिन साजरा केला असे म्हणता येईल.

दिलीप देशपांडे
जामनेर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!