कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील !

न्यूज मसाला वृत्तसेवा 7387333801

नाशिक ( प्रतिनिधी )  प्रा. सुनिल देवधर मितभाषी पण मिश्किल व्यक्तिमत्व होते. वृत्तीने ते कुटुंबवत्सल होते. उत्स्फूर्त काव्यातून ते सातत्याने व्यक्त व्हायचे. त्यांचे निर्मळ मन त्यात कायमच प्रतिबिंबित झाले. ते शरीराने आपल्यात नसले तरी निर्झर काव्य संग्रहातून हा काव्यनिर्झर कायम झुळझुळत राहील असे प्रतिपादन प्रा. अनंत येवलेकर यांनी केले.

      कै. प्रा. सुनिल देवधर यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने काल ' निर्झर ' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात हा समारंभ मोजक्या ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार संजय देवधर, प्रा. संजय चपळगावकर, शरद वर्तक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती शुभांगी देवधर यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यावर सुनिल यांचे कविता संग्रह पूर्ण व्हावा हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व निर्मळ झऱ्याप्रमाणे होते. म्हणून तेच शीर्षक काव्यसंग्रहाला समर्पक ठरेल. संजय देवधर म्हणाले, सुनिलजी प्रतिभावान कवी, उत्स्फूर्त विडंबनकार, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, तळमळीचा कार्यकर्ता , आदर्श पती, प्रेमळ पिता अश्या विविध रुपात नेहमी भेटत राहिले. त्यांच्या कविता नेहमीच मन प्रसन्न करीत. त्यांच्यात नेतृत्वगुण होते आणि सर्वांना बरोबर घेऊन ते विविध उपक्रम यशस्वी करत असे त्यांनी सांगितले. प्रा. संजय चपळगावकर यांनी बिटको महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. प्रा. दिलीप फडके, शरद वर्तक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

         प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी ऑनलाइन अध्यक्षस्थान भूषविले. ते म्हणाले, सुनिलजी यांच्या समवेत काम करणे हा आनंददायी अनुभव होता. ते शिस्तप्रिय, प्रसंगावधानी व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कविता मनाला भावतात व विचार करायला लावतात. त्यांच्या स्मृती काव्यसंग्रहाच्या रूपाने आपल्यामध्ये कायम रहातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रागिणी कुलकर्णी यांनी सुनिल देवधर यांच्या काही कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश वाडेकर यांनी केले तर डॉ. दीप देवधर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गिरीश जोशी, शुभांगी महाजन यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते. यश, अपर्णा देवधर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी परिश्रम घेतले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।