पुस्तक परीक्षण. भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध ! सविस्तर परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





पुस्तक परीक्षण
भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध

     "वृत्तपत्रविद्या हे सतत गतिमान होत जाणारे  निरंतर  परिवर्तनशील शास्त्र आहे. सध्याच्या वेगवान युगात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण याप्रमाणेच भौगोलिक पत्रकारितेचे शास्त्रीय कौशल्य विकसित होत आहे. त्यात प्रगत वार्तांकन आणि लेखन कौशल्याचा समावेश होतो. मानवाने निसर्गाशी साधलेल्या सुसंवादातून व संघर्षातून निर्माण झालेल्या या क्षेत्राचे सोपे वर्णन 'भू - पत्रकारिता' असे करता येईल. भूगोल व पत्रकारिता हे दोन विषय शिकविणाऱ्या प्रा. डॉ. एम. जी. कुलकर्णी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संशोधनपर प्रबंध सादर केला. त्याचेच 'भू- पत्रकारिता' हे पुस्तक ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या हस्ते प्रकाशित झाले, हा मी माझा बहुमान समजतो. अभ्यासप्रवृत्त करणारे हे पुस्तक तरुण पत्रकारांना नवी दिशा, नेमका दृष्टिकोन देईल.                    प्रा.डॉ. एम.जी. कुलकर्णी हे अतिशय अभ्यासू व संशोधक वृत्ती असणारे व्यक्तिमत्त्व आहे. एच.पी. टी. महाविद्यालयात भूगोल विषयाचे त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. नंतरच्या काळात ते पत्रकारिता हा विषय शिकवू लागले. महाविद्यालयाचा पत्रकारिता विभाग त्यांनी कल्पकता, तळमळ व अभ्यास यांच्या जोरावर नावारूपाला आणला. मला देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियमितपणे अनेक वर्षे पाचारण केले. या सर्व  व्यापात धकाधकीमुळे त्यांचे पीएच.डी.चे संशोधन मात्र लांबतच गेले. निवृत्तीच्या काठावर त्यांनी ते जिद्दीने पूर्ण केले. त्यासाठी त्यांच्या अभ्यासाच्या दोन्ही विषयांचा समन्वय साधत एकत्रीकरण केले व भू- पत्रकारिता हा वेगळा विषय चिकित्सकपणे सामोरा आला. त्यांचे हे पुस्तक पत्रकारिता व भूगोल अभ्यासक विद्यार्थ्यांना उपयुक्त, नवी दिशा दाखवणारे व प्रेरणादायी ठरेल", असे एच. पी. टी. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भास्कर गिरिधारी यांनी पुस्तकाच्या मनोगतात लिहिले आहे. महाराष्ट्र भूगोल समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश गरसोळे शुभेच्छा संदेशात म्हणतात, "हे पुस्तक संशोधकांना मार्गदर्शक ठरेल. अलक्षित विषयावर कष्टपूर्वक संदर्भ साहित्य गोळा करून सोदाहरण मांडणी डॉ.एम.जी.कुलकर्णी  यांनी केली. त्यातील निष्कर्ष, नवे पैलू युवकांना या क्षेत्राकडे आकर्षित करतील. आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३६ मध्ये सर्वप्रथम भूगोलविद्या हे छोटेखानी पुस्तक नकाशांसह प्रकाशित केले. त्यातून भूगोल व वृत्तपत्रसृष्टी यांचे अतूट नाते सिद्ध झाले. ते आजतागायत तसेच किंबहुना अधिक व्यापक बनले आहे हे नव्या पुस्तकातून नक्कीच लक्षात येते."
            "अभ्यासप्रवृत्त करणारा ग्रंथ", असे या पुस्तकाचे वर्णन प्रस्तावनेत प्रबंधाचे मार्गदर्शक डॉ. वि.ल. धारूरकर यांनी केले आहे. ते म्हणतात, "वृत्तपत्रविद्या सातत्याने गतिमान होत आहे. जागतिक पर्यावरण बदलामुळे निसर्गचित्र बदलत आहे. अशावेळी आधुनिक पत्रकारितेच्या संदर्भात हा ग्रंथ विशेष महत्वाचा ठरतो. वादळे, अतिवृष्टी, अवर्षण, भूकंप यांसारख्या संकटांची तीव्रता वाढली आहे. भौगोलिक पत्रकारितेची क्षितिजेही व्यापक होत आहेत. महानगरापासून ते ग्रामीण भागात रहाणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पर्यावरण बदलांच्या परिणामांविषयी जागरूकता वाढत आहे. अर्थातच त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटतात. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये जागृती घडवली जाते. आधुनिक परिपूर्ण वृत्तपत्राचा भौगोलिक पत्रकारिता हा अविभाज्य घटक म्हणून विकसित होत आहे. एकेकाळी केवळ सांस्कृतिक पर्यटन, कृषी, औद्योगिकता या भौगोलिक क्षेत्रात मर्यादित असलेली भू - पत्रकारिता समग्र मानवी जीवनाला व्यापून उरली आहे." पर्यावरणतज्ज्ञ व पत्रकार अभिजित घोरपडे म्हणतात, "एकूणच मराठी पत्रकारितेत भूगोलाचे स्थान किती महत्त्वाचे आहे याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर येते. डॉ. कुलकर्णी यांचा  पीएच.डी.चा प्रबंध पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाल्याने त्याची रचनाही शिस्तबद्ध झाली आहे. या पुस्तकात भूगोलाबाबत मूलभूत माहिती, विविध संकल्पना, भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा, त्यांचे उपयोजन व तांत्रिक माहिती, संदर्भ साहित्य, मराठी पत्रकारितेतील भूगोलाचा आढावा यांचा समावेश मोलाचा असून विद्यार्थ्यांना व प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना नक्कीच आहे."
                  या साऱ्या मान्यवरांचे प्रस्तुत पुस्तकाबद्दलचे अभिप्राय त्याचे वेगळेपण आणि महत्त्व निश्चितच अधोरेखित करतात.

 ◆भू -पत्रकारिता
(Geo - Journalism)
लेखक:डॉ.एम.जी. कुलकर्णी
प्रकाशक: शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
मूल्य: ₹२००/
                      ◆संजय देवधर
                 वरिष्ठ पत्रकार, नाशिक.                 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।