आदिवासी वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
आदिवासी वारली चित्रांना

आधुनिकतेचा स्पर्श !

   महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून थेट गुजरातच्या सीमारेषेपर्यंत आदिवासी वारली जमात पसरलेली आहे. छोट्या छोट्या दुर्गम पाड्यांवर राहून वारली जमातीतील स्त्री पुरुष झोपडीच्या भिंतीवर चित्रे रेखाटतात. दहाव्या शतकात ही कला अस्तित्वात आली. ११०० वर्षे जीवंत असणारी वारली चित्रशैली मानवी जीवनाला सचित्र रूप देते. चित्तवेधकता हा वारली कलेचा विशेष गुण आहे. साध्यासुध्या घटनांना, प्रसंगांना कलात्मक आकार दिल्याने त्यांचे उत्कट, चैतन्यमय स्वरूप प्रकट होते. रचनेचे, मांडणीचे सौंदर्य वारली कलाकारांचे रेषेवरचे प्रभुत्व अधोरेखित करते. अकराशे वर्षांच्या वाटचालीत महिलांनी निर्माण केलेली व जोपासलेली वारली चित्रकला आता देशोदेशी पोहोचली आहे. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी क्रांती केल्यावर पुरुषांनीही ही कला आत्मसात केली. आताच्या पिढीतील युवक- युवतींनी या कलेला आधुनिकतेचा स्पर्श बहाल करून नवा आयाम दिला आहे.
    विकास, प्रगती यामुळे संधी वाढल्या आहेत. त्यामुळे रोजगारासाठी दुर्गम पाड्यावरचा युवक शहरात येतो. शिक्षणाच्या संस्कारांनी नवी पिढी सजग झाली आहे. शहरी बदल व वातावरणाचा साहजिकच परिणाम होतो. अवतीभवतीचे जीवन त्यांच्या चित्रात उमटते. कारण वारली चित्रशैलीचे तेच वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच अलीकडच्या वारली चित्रांमध्ये उंच इमारती, बसेस, रेल्वे, फ्लायओव्हर्स, जहाजे, विमाने अशी आधुनिकता दिसायला लागली आहे. वारली चित्रशैली ही आदिवासींची चित्रभाषा आहे. त्याद्वारे ते सर्वांशी सहजपणे संवाद साधतात. जीवनसन्मुख कला असल्याने जीवनातील बदलांचे प्रतिबिंब कलेत उमटते. अबोल अशा वारली कलाकारांचे मन चित्रात व्यक्त होते. साध्यासोप्या रेषा आकारातून ते आधुनिक जगाचा वेध घेतांना दिसतात. सिम्प्लिसिटी हा वारली चित्रशैलीचा पाया आहे. त्यावरच ही आधुनिक कलेची उत्तुंग इमारत उभी रहात आहे.
    सभोवतालातून वारली चित्रकारांना प्रेरणा मिळते. एकेकाळी दुर्गम पाड्यावर मर्यादित विश्व असणारा युवक  मोठ्या शहरात आल्यावर त्याचे क्षितिज विस्तारते. निरीक्षणातून तो नव्या प्रतिमा निर्माण करतो. कलेचा परिघ त्यामुळे व्यापक बनतो. आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीशी, संकटांशी सामना करतच वारली कलाकार तरल चित्रनिर्मिती करतात. ते पाहून मन थक्क होतं. तरुण वारली चित्रकार केवळ आशयापुरते प्रयोग न करता निराळी कथानके, वेगळे कल्पनाविश्व, नवनव्या प्रतिमा वापरून आगळीवेगळी चित्रसृष्टी साकारताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञान, साहित्याचाही वापर करतात. कासा गावाजवळचा संदीप भोईर, विक्रमगड येथील कृष्णा भुसारे, जव्हारचा राजेंद्र महाले, पांडुरंग चौधरी, रवि सापटे, रामखिंड येथील राहूल कडू, पाथर्डीचा सीताराम बुजड, तलासरीची रीना उंबरसाडा, किरण गोरवाला, रहेजा स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिकवणारी चित्रगंधा  हे व असे अनेक युवक युवती वारली कलेला वेगळे परिमाण मिळवून देत आहेत.
   पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी वारली चित्रशैलीला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. अनेक देशात ही कला पोहोचवली. त्यामुळेच या कलेला व कलाकारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. मशे यांचे पूत्र सदाशिव, नातू विजय हे देखील जपानच्या मिथिला आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरवतात, कार्यशाळा घेतात. गंजाड गावाजवळच्या कलमी पाड्यावरचा अनिल वांगड थेट  चित्रकलेची पंढरी असणाऱ्या पॅरिस येथे वारली चित्रकला घेऊन पोहोचला. मधुकर वाडू या तरुणाने जर्मन भाषेत वारली चित्रशैलीवर पुस्तक लिहून ही कला जर्मनीत पोहोचवली. आयुष ही आदिवासी युवक संघटना वारली कलेचे धार्मिक, पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्व जपण्यासाठी हिरीरीने कार्यरत आहे. संघटनेचे अध्यक्ष सचिन सातवी तसेच संजय पराड, राजेश मोर व इतर कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करून वारली कलेचे सत्व आणि स्वत्व जपण्यासाठी आग्रही असतात. मध्यंतरी गेल्या वर्षी बाटा कंपनीने काही पादत्राणांवर वारली चित्रांचा वापर केल्याचे आढळून आले. तेव्हा आयुष संघटनेने तीव्र आक्षेप घेतला. पूर्वी कोकाकोला कंपनीने जाहिरातींमध्ये वारली चित्रशैलीचा गैरवापर केला असता मी देखील लेख लिहून त्याला विरोध केला होता. प्रकाश भोईर या आदिवासी तरुणाने वारली कलेचे पावित्र्य जपावे या हेतूने स्वदेशी हा व्हिडिओ तयार केला आहे. ही कृष्णधवल चित्रफीत अतिशय परिणामकारक झालेली दिसते. वारली कलेच्या संदर्भात असे वेगवेगळ्या स्तरावर कार्य सुरू आहे.

                                   संजय देवधर
(जेष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक)
**********************************
    वारली युवकांना कलेद्वारे रोजगार !

    रोजगाराच्या समस्या, कमी शिक्षण, व्यसनाधीनता कुपोषण अश्या चर्चा आदिवासी समाजाबद्दल आपण नेहमीच ऐकतो. आदिवासी युवकांना नाईलाजाने रोजीरोटी मिळविण्यासाठी स्थलांतर करावे लागते. त्यावर युवकांनीच उपाय शोधले आहेत. जव्हार, मोखाडा येथील सुमारे ७० युवक गोव्यात जाऊन टॅटू काढण्याचे प्रशिक्षण घेऊन आले. त्यांनी आपल्या मित्रांना हे तंत्र शिकवले. आता १०० पेक्षा जास्त युवक टॅटूद्वारे शरीरावर सुंदर वारली चित्रे रेखाटतात. त्यांना रोजगार निर्मितीचे नवे साधन गवसले आहे. याशिवाय अनेक युवक- युवती वारली चित्रे असणारे वॉलपीस,  वॉलहँगिंग,लाकडी वस्तू तयार करतात.त्यात
टीकोस्टर, झोपडीबॉक्स, ज्वेलरी बॉक्स, वेगवेगळ्या आकाराचे ट्रे,  घड्याळे, नेम्प्लेट व इतर आकर्षक वस्तुंना मागणी असते. बेडशीट, टीशर्ट, ओढण्या, पंजाबी ड्रेस, साड्या, पर्सेस, कापडी व ज्यूटच्या पिशव्या, बॅग्स यावरती वारली चित्रे सजतात.शहरी कलाप्रेमींकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!