हमारे बाद हाल-ए-गम सुनाने कौन आएगा…?हंसाने तो सब आएंगे मगर हाल-ए-दर्द सुनानेवाला कौन आएगा ? खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…. रणजित राजपूत.

खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…

आदरणीय…
         गेल्या ३२ महिन्यांपासून मी नाशिक चा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आपल्या सोबत होतो. आज मी या पदाची सूत्रे माझ्या ज्युनियर सहकारी श्रीमती अर्चना देशमुख मॅडम यांच्याकडे सोपवून नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू होणार आहे.
           ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ मार्च २०२० रोजी मी जिल्हा माहिती अधिकारी, नाशिकची सुत्र स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ २४ तास सोबत राहिलो. माझ्या नाशिकच्या पोस्टींगची २ वर्षे कोरोनासोबत गेली. विशेष म्हणजे कोरोना काळातील सर्व बातम्यांना आम्ही *C* ने क्रमांकाने सुरूवात केली. भविष्यात या बातम्यांच्या C क्रमांकाने आपण कधीही कोरोना काळातील संदर्भ म्हणून उपयोगात आणू शकाल. विशेष म्हणजे या सर्व काळातील वृत्तपत्रीय बातम्यांच्या कात्रणांचे डिजिटल संकलन ही एक मोठी उपलब्धी जिल्हा माहिती कार्यालयात भविष्यात सर्वांसाठी असेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा काळ आश्वासकपणे पार पाडू शकलो. असेच सहकार्य आपण भविष्यात श्रीमती देशमुख मॅडम व माझ्या सहकाऱ्यांना देत रहावे, विनंती. 
          जिल्हा माहिती कार्यालयासह विभागीय माहिती माहिती कार्यालयाचे  आधुनिक तंत्रज्ञानदृष्ट्या बळकटीकरण करण्याबरोबरच विभागीय माहिती कार्यालयाचे मीडिया सेंटर मधील स्थलांतर, मालेगाव उपमाहिती कार्यालयाचे तहसील कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतर. 


            कोरोनाकाळातील घडामोडी, कार्यक्रामांच्या प्रसिद्धीचे व्यवस्थापन. विभागीय माहिती कार्यालयासह जिल्हा माहिती कार्यालयाच्या समाज माध्यमांच्या व्यासपीठांचे सशक्तीकरण यासारख्या कामांमधून तसेच ऐन कोरोना काळात सुरू केलेले ‘संकट सोबती’ व्हिडिओ बुलेटीन, डिजिटल वार्तापत्र ‘यशार्थ’, विविध योजनांचे मल्टीमीडिया इन्फोग्राफ्स् यासारख्या प्रयोगांमधून शासकीय माहितीचा प्रवाह जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
       विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना पाच जिल्ह्यांच्या शासकीय बातम्यांवर सुरू केलेले दैनंदिन उत्तर महाराष्ट्र या डिजिटल वार्तापत्राचे कोरोनाकाळात समस्त माध्यमजगताने स्वागत केले. 
       कोरोना काळातील सटाणा शहरातील सॅनिटायझर फवारणी यंत्राच्या विशेष वृत्ताची ‘मन की बात’ मध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी विशेष दखल घेतली. 
         अतिमहत्वाच्या व्यक्तिंच्या दौऱ्यात खऱ्या पत्रकारितेचा आदर/ सन्मान प्रतिष्ठा, प्रतिमा जपण्यासाठी प्रसंगी काही कटू प्रसंगांचाही सामना करावा लागला. ही  क्षणीक कटुता विसरून आपण नेहमी चांगल्या निर्णयांचे स्वागत केले, त्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल मी आपल्या सदैव ऋणात असेल.
       मी रूजू झालो तेव्हा कार्यालय प्रमुखच बातमी करत होता. आज मी कार्यमुक्त होत असताना माझ्या कार्यालयातील प्रत्येक अधिकारी/ कर्मचारी बातमी करतो. माझे सहकारी मोबाईल पत्रकारितेच्या नव्या आयामांना आत्मसात करत पुढे येत आहेत, हे मात्र खरे !
        नाशिकमध्ये अनेक चांगली माणसं भेटली. त्यांच्याकडून खूप चांगले शिकायलाही मिळाले, जे शब्दात मांडणे कठीण आहे. 
       कोरोना काळातील दूरदर्शनचे प्रतिनिधी स्व. अजय पाटील, माझे सहकारी स्व.राजेंद्र येवले, स्व.मनोहर पाटील (मालेगाव) यांची अकाली एक्झिट खूप खोलवर घाव करून गेली.
       २०१५ साली मी धुळ्याचा जिल्हा माहिती अधिकारी असताना जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील पहिल्या ‘माहिती जनसंपर्क भवन’ ची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. माझ्या नाशिकच्या कालखंडात ती संकल्पना शासनाने संपूर्ण राज्यासाठी स्वीकारली. कोरोनाच्या दर्दभऱ्या वातावरणात शासनाने जनसंपर्क जगताला दिलेली ही एक दिलासादायक अन्  आगळावेगळी भेट आहे.
        विकासप्रक्रिया ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. एखाद्या वळणावर थांबून मागे पाहावे तर अनेक संदर्भ बदललेले, अनेक गोष्टी कालबाह्य झालेल्या आढळून येतात. भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा तर तेथेही बदलाचे वारे कोणत्या दिशेने वाहतील याची खात्री नसते. नियमात होणारे बदल, कायद्यातील सुधारणा, योजनांतील फेरबदल, आकडेवारीतील चढउतार, अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्या-निवृत्त होणे, पदे रिक्त रहाणे, नव्या योजना सुरू होणे या साऱ्या वातावरणात सुसंवाद मात्र सदैव श्रेष्ठ असतो. शाश्वत असतो…
       खरे नसलेले खोटे जेव्हा चर्चेत येते तेव्हा ‘खुलासा’ हे शासकीय जनसंपर्काचे सशक्त माध्यम आहे, पण कधी कधी…
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते;
दिसणार नाही इतके पुसट डोळ्यांमध्ये दंव तरळते.
        आजपर्यंत मी अखंडपणे ३२ महिने आपल्याला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवारांच्या सहकार्याने कोरोना चे अपडेट्स देत होतो, ते आज मध्यरात्रीनंतर थांबतील…
थोडक्यात कोरोनाच्या वेदनेचे माझ्याकडून सुरू असलेले रडगाणं थांबेल…
कदाचित नवे गीत गात कुणीतरी  नव्या स्वप्नांच्या अनोख्या जगात आपल्याला घेवूनही जातील…
पण…
हमारे बाद हाल-ए-गम सुनाने कौन आएगा…?
हंसाने तो सब आएंगे मगर हाल-ए-दर्द सुनानेवाला कौन आएगा ?
        लोकांना माहिती देणे ही संकल्पना तर इतकी व्यापक आणि अमर्याद आहे की सर्व शक्तीनिशी सर्व माध्यमांमार्फत पराकोटीचे प्रयत्न केले तरी त्याबाबतीत पूर्णत्वाचे समाधान मिळणे अवघडच ! 
        कितीही चालत राहिले तरी क्षितिज जसे नेहमी पुढेपुढेच सरकत रहाते त्याप्रमाणे कितीही काम केले तरी त्याला पूर्णविराम नाहीच, अशी स्थिती ! या साऱ्या गदारोळात एक लक्षात आले ते हे की आपण आपले काम यथाशक्ती पण अविश्रांतपणे करत राहण्याची गरज आहे. 
       या साक्षात्कारामुळे नव्या क्षितिजाला मी यापुढेही समोरा जात राहीन, हे भविष्य मला स्पष्टपणे दिसत आहे. मोठमोठ्या बढाया मारण्यापेक्षा छोटी छोटी कामं करत राहणं हे अधिक महत्त्वाचं असतं.
अनेक मोठ्या घटनांचा प्रारंभ हा छोट्याशा घटनांमधूनच होत असतो.
सर्वांचे आभार !
मी एक माणूस आहे. काही चुकले असल्यास तुमच्या हृदयाच्या ठायी असलेले औदार्य सदैव माझ्यासाठी राखून ठेवा…

आपला 
🙏
रणजितसिंह राजपूत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।