‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार ! गौरव२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण !


मुंबई, पुणे, नाशिक, दि. २५ नोव्हेंबर :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ.यशवंत मनोहर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

        या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
          अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. तात्याराव लहाने, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.
        यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवी समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.यशवंत मनोहर यांचे नाव मराठी साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक चळवळीत अग्रक्रमाने घेतल जात. त्यांनी अनेक समाज प्रबोधनपर व्याख्याने देऊन, लेखनाद्वारे आणि लोकांमध्ये कार्यकरून समाजप्रबोधन केले आहे. त्यांनी एक गाव एक पाण वठा, सामाजिक समता समिती, संविधान बचाव समिती अशा अनेक संघटनांच्या द्वारा प्रत्यक्ष सामाजिक कार्य केलेलं आहे. हे मान्यवर कवी, समीक्षक, विचारवंत आणि प्रभावी वक्ता म्हणून महाराष्ट्र आणि देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांच्या विषयी अनेक वैचारिक साहित्य लिहिले. दलित कवितेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२२ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.
             या समता पुरस्कार सोहळ्यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व फुले प्रेमी, समता सैनिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव  यांनी केले आहे.
********************************
कवी डॉ.यशवंत मनोहर यांचा परिचय

अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले डॉ. यशवंत राजाराम मनोहर यांचा जन्म येरला, ता. काटोल, जि. नागपूर येथे झाला. तेथील जनपद सभा प्राथमिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९६१ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर औरंगाबादच्या मिलिंद महा-विद्यालयातून ते बी.ए. (१९६५) व मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. परीक्षा (१९६७) उत्तीर्ण झाले. साहित्यविषयक विशेष अभिरुची असल्याने त्यांनी काव्यलेखनास व समीक्षालेखनास १९६० मध्ये प्रारंभ केला. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांच्या विषयी अनेक वैचारिक साहित्य लिहिले. दलित कवितेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी १९८४ मध्ये संपादन करून त्यांनी नागपूर विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाचे प्रमुख म्हणून तसेच संचालक अॅकेडमी स्टाफ कॉलेज नागपुर खैरागड, अमरावती विद्यापीठात पद भूषविले आहे.
             डॉ. यशवंत मनोहर यांचा पहिला कवितासंग्रह ‘उत्थानगुंफा’  प्रसिद्ध झाल्यानंतर ते कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. आजवर त्यांचे १३ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या दलित कवितेने शोषणाचा तीव्र निषेध केला. समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर त्यांच्या क्रांतिकारी कवितेने प्रहार केला. कवितेबरोबरच सुमारे २९ काव्यसमीक्षाविषयक ग्रंथही त्यांनी लिहिले. विशेष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सर्वाधिक साहित्य त्यांनी लिहिले. एक चिंतन काव्य, ‘दलित साहित्य: सिद्धांत आणि स्वरूप’, ‘स्वाद आणि चिकित्सा’, ‘बा.सी.मर्ढेकर’ ‘निबंधकार डॉ.आंबेडकर’, ‘समाज आणि साहित्य समीक्षा’,  ‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये’ यासह अनेक समीक्षात्मक पुस्तके त्यांची गाजलेली आहेत. यांशिवाय त्यांची ‘रमाई’ (१९८७) ही कादंबरी आणि ‘स्मरणांची कारंजी’  हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी अनेक ललित लेखनही केले आहे. त्यांच्या कवितेवर आंबेडकरी विचारांचा अधिक प्रभाव आहे. समीक्षेवर मात्र त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीचा ठसा उमटलेला जाणवतो.
          डॉ.यशवंत मनोहर यांनी लिहिलेलं साहित्याचा उच्च शिक्षण अभ्यास क्रमात देखील समावेश करण्यात आलेला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक चळवळीत अग्रक्रमाने त्यांचे नाव घेतल जात. त्यांनी अनेक समाज प्रबोधनपर व्याख्याने देऊन, लेखनाद्वारे आणि लोकांमध्ये कार्यकरून समाजप्रबोधन केले आहे. त्यांनी एक गाव एक पाण वठा, सामाजिक समता समिती, संविधान बचाव समिती अशा अनेक संघटनांच्या द्वारा प्रत्यक्ष सामाजिक कार्य केलेलं आहे. हे मान्यवर कवी, समीक्षक, विचारवंत आणि प्रभावी वक्ता म्हणून महाराष्ट्र आणि देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या या कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!