जनजाती गौरव दिनीअभिवादन कार्यक्रमप्रतिमापूजन आणि व्याख्यान !

जनजाती गौरव दिनी
अभिवादन कार्यक्रम
प्रतिमापूजन आणि व्याख्यान !

      नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी (दि.१५) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली. 
       

वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९ शैक्षणिक प्रकल्प कार्यरत आहेत. यात ७ वस्तीगृह, एक प्राथमिक, एक माध्यमिक शाळा आणि २० बालसंस्कार केंद्र कार्यरत आहेत. याशिवाय सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे साडेआठशे आरोग्य रक्षक दुर्गम भागातील पाड्यांवर विनामोबदला सेवा करीत आहेत. जनजाती समाजाच्या आर्थिक विकासासाठी १० बचत गटांच्या माध्यमातून सुमारे २८०० लाभार्थींना मदत करण्यात आली आहे. सात ठिकाणी ग्रामविकास प्रकल्पदेखील राबविण्यात आले आहेत. ‘खेल-कूद’ प्रकल्पांतर्गत देशी खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय श्रद्धा जागरण, लोककला संवर्धन, शिक्षण व आरोग्य विषयक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य केले जाते. श्रद्धा जागरण या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील धर्मांतरणाविरोधात लढा उभारण्यात आला आहे. जनजाती सुरक्षा मंचाचे धर्मांतरीत झालेल्याना सवलती मिळू नयेत असे म्हणणे आहे. दीड महिन्यापूर्वी घोटी येथे जनजातीय बाल मजुरांच्या शोषणाबाबतही कल्याण आश्रमाने सर्वप्रथम आवाज उठविला होता. 
           यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा व प्रसिद्ध धावपटू कविता राऊत म्हणाल्या, आदिवासी दुर्गम भागात आजही अनेक संस्था, व्यक्ती किंवा शासन जेथे पोहोचण्यास अपूर्ण पडते. त्या सर्व ठिकाणी जनजाती कल्याण आश्रम सहजतेने पोहोचतो. अंगी हुशारी आणि हुनर असणाऱ्या आदिवासी विद्यार्थी व प्रत्येक बांधवाच्या पाठीशी आश्रम समर्थपणे उभा राहून सर्व प्रकारचे सहकार्य करतो , असे सांगतानाच आपल्या स्वत:च्या क्रीडा क्षेत्रातील करिअरची सुरूवातही जनजाती कल्याण आश्रमाच्याच माध्यमातून सुरू झाल्याचे राऊत यांनी सांगितले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!