चित्रविषय खुलविणारी आकर्षक किनार ! हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते तसेच काम या रेखीव किनारींमुळे होते !! न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!





चित्रविषय खुलविणारी

आकर्षक किनार !


   आदिवासी वारली स्त्री - पुरुष भिंतीवर चित्र रेखाटताना सर्वप्रथम आयताकृती किनार ( बॉर्डर ) रंगवतात. नंतर त्यामधील मोकळ्या जागेत चित्र काढतात. आकर्षक अशा किनारीमुळे चित्रातील विषय अधिकच खुलतो. चित्र जास्त उठावदार दिसते. चित्राला बंदिस्त स्वरूप येऊन बघणाऱ्या रसिकांचे लक्ष मुख्य चित्रातील घटकांवर एकवटते. एखाद्या चित्राला फ्रेम केल्यावर त्याचे सौंदर्य वृद्धिंगत होते. हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते. तसेच काम या रेखीव किनारींमुळे होते.


   ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या आदिवासी वारली चित्रशैलीत मुलाकारांचा वापर केला जातो. चित्रांची किनार रेखाटताना बिंदू, रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचाच वापर करतात. आकार - घटकांची पुनरावृत्ती केली जाते.कोणत्याही चित्राला जशी आपण फ्रेम करतो त्याप्रमाणे वारली चित्र काढण्यापूर्वी किनार रेखाटली जाते. त्यामुळे चित्राला मर्यादा येते मात्र किनारीने उठाव देखिल मिळतो. किनारीत मोजकेच आकार असले तरी त्यांच्या उपयोजनात वैविध्य आढळते. वारली कला हा आदिवासींच्या काळजाचा हुंकार आहे. शेतीकामातून मिळणाऱ्या फावल्या वेळी त्यांचे हात कलानिर्मितीत गुंतलेले असतात. अतिशय कमीतकमी साधनसामग्रीतून त्यांची कला फुलते. साधं, सोपं, सरळ आयुष्य जगत असताना मिळणारं समाधान व चेहऱ्यावर पसरणारं हसू हीच त्यांची उर्जाशक्ती ! आजूबाजूला नटलेला हिरवागार निसर्ग फक्त पांढऱ्याशुभ्र रेषा, ठिपके व आकारांमधून झोपडीतील भिंतीवर विराजमान होतो. त्यातून त्यांची समृध्द परंपरा, संस्कृती जतन केली जाते. तांदळाचे पीक आल्यावर ओल्या पिठाच्या मुठी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना उमटवतात. त्यांना लक्ष्मीची पाऊले असेही म्हणतात.निसर्गाच्या ऋतूंनुसार जगण्याची व निसर्गचक्र जपण्याची जीवनशैली वारली जमातीने सोडलेली नाही. त्याचेही स्पष्ट प्रतिबिंब चित्रांमध्ये व किनारीत सहजपणे उमटलेले जाणवते.


   वारली जमातीने त्यांची चित्रशैली मर्यादांसह मनःपूर्वक स्वीकारली आहे. कलानिर्मिती हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा जवळचा कलात्मक मार्ग असतो. कलेविषयी अंतःकरणापासून ओढ असल्याशिवाय उत्तुंगतेचा स्पर्श होत नाही. त्याबरोबरच कलाकाराकडे अनिवार उत्कटता, जिज्ञासा व जिगीशा हवीच. त्यासोबत कलेविषयी शोध घेण्याची अभ्यासक वृत्तीही असावी लागते. आज अनेकजण हे काम तळमळीने करीत आहेत. ध्यास घेऊन समाजासमोर आपल्या कलाकृती मांडत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक स्त्री - पुरुष कलाकार वारली कलेवर मनापासून प्रेम करतात. या चित्रशैलीचा अभ्यास करुन त्यातील प्रतिमा, प्रतीकांचा जिव्हाळ्याने शोध घेतात.प्रयोगशील महिला व संवेदनशील युवक त्यात आघाडीवर आहेत. त्यातून काही नवीन गोष्टी सामोऱ्या येतात. किनारीमुळे चित्राला जरी बंधन आले तरी ते आवश्यकही असते. परस्पर संवादी किनारीने चित्राला नेमकेपणा येतो. त्याचे सौंदर्यमूल्य वाढते. वारली चित्रे केवळ नक्षीकाम, कारागिरीच्या पातळीवर न राहता उच्चस्तर गाठतात. म्हणुनच त्यातून परिपूर्ण कलाकृतीचा आनंद रसिकांना मिळतो. वारली चित्रशैली ही संस्कृती, परंपरा, कलाविष्कार, सर्जनशीलता व अभिरुची यांचे वर्तुळ पूर्ण करते.


                                              संजय देवधर
*********************************
ठिपके आणि लयदार रेषा...

            ठिपके आणि लयदार रेषांची ओळख प्रत्येकाला लहानपणी रांगोळीद्वारे होते. सुरुवातीला एक बिंदू असतो. अनेक बिंदू एकापुढे एक क्रमाने आले की रेषा तयार होते. तीन रेषा एकमेकींना मिळाल्या की त्रिकोण, चार रेषा एकत्र आल्या की चौकोन व एका रेषेच्या दोन टोकांनी वर्तुळाकार गतीने परस्परांना स्पर्श केला की वर्तुळ तयार होते. याच आकारांचे लयबद्ध एकत्रीकरण वारली चित्रशैलीत चित्तवेधक पद्धतीने केलेले आढळते. आदिवासी पाड्यांवर वारली जमातीच्या झोपड्यांच्या भिंती मुलाकारांतील चित्रांनी सजतात. भास्कर कुलकर्णी यांनी वारली कलेचा शोध घेऊन तिला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी योगदान दिले. भोपाळच्या भारत भवनमधील रुपंकर कलादालनाचे प्रमुख चित्रकार जे. स्वामिनाथन यांनी भारत महोत्सवात आदिवासी कलांचे वेगळेपण प्रस्थापित केले. गुजरातचे ज्योती भट यांनी घरांच्या भिंतींवरील कलाकृती, अंगणातील रांगोळ्या व पारंपरिक कलाविष्कार यांची हजारो छायाचित्रे संकलित केली. त्यांचे संशोधन करून ती रसिकांसमोर आणली. एकीकडे कलाकार व दुसरीकडे अभ्यासक, संशोधक यांचे परस्पर पूरक कार्य अखंड, अविरत सुरु आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।