जिवा भावाचे मनोगत ! सालगडी ते पद्मश्री पुरस्कार !! न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801,. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!





 न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801
***********************************

'जिवा' भावाचे मनोगत !


   दि.१५ मे हा वारली चित्रशैलीचे उद्गाते, पितामह, पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचा स्मृतिदिन. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांमधून त्यांनी कायमच रसिकांशी संवाद साधला. एका ८ फूट उंच व ५ फूट रुंद चित्रात त्यांनी आपले आत्मचरित्रच रंगवले आहे. तृतीय स्मृतिदिनाच्या औचित्याने हा प्रथमच थेट सुसंवाद ! त्यांच्या मी घेतलेल्या मुलाखती, वेळोवेळी त्यांनी मांडलेले विचार यांच्या आधारे हे 'जिवा' भावाचे मनोगत व्यक्त करतो आहे...

   १९७० च्या दशकात भास्कर कुलकर्णी हा अवलिया कलाकार माझ्या कलमीपाड्यावर आला. पुपुल जयकर यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या अलौकिक क्षणाने वारल्यांचे जीवन उजळून गेले. १९७२- ७३ च्या सुमारास ही कलाप्रेमी मंडळी जर संपर्कात आली नसती, तर चार भिंतीत लपलेली आमची पारंपरिक आदिवासी वारली चित्रशैली प्रकाशात आलीच नसती. भास्करने भिंतीवरील चित्रे आमच्याकडून कागदांवर रंगवून घेतली. तो मला व चार वारली महिला कलाकारांना दिल्लीला घेऊन गेला. तेथील कलामेळ्यात आमची कला प्रथमच लोकांसमोर मांडण्याची संधी मिळाली. तेथेच या कलेला आमच्या जमातीचे  'वारली ' हे नाव मिळाले. नंतर मुंबईतील पंडोल कलादालनात माझ्या चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले. पुढे मी परदेशात गेलो व वारली कला जागतिक कॅनव्हासवर झळकली.लवकरच भारतासह जगभरात रसिकांनी वारली कलेचे स्वागत केले. जग बघितल्याने माझाही आत्मविश्वास वाढला. या कलेमुळे मला थेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचा दोनवेळा पाहुणचार घेता आला. रूढ पुस्तकी शिक्षण, जगरहाटी, शिष्टाचार, विविध भाषा या कशाचीच जाण नसतांना मी अनेक देशांमध्ये पोहोचलो. भारताचे कलाप्रतिनिधित्व मला करायला मिळाले याचा अभिमान वाटतो. कलेविषयी माझी आस्था, कौशल्य, प्रामाणिकपणा यांनी प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७६ साली मला साडेतीन एकर जमीन देण्याचे आश्वासन दिले.मात्र त्याला सरकारी लालफितीच्या कारभाराचा फटका बसला ! परंतु त्यानंतर मला २०११ साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर चक्रे फिरली व २०१२ साली त्यापैकी दोन - अडीच एकर जमीन मिळाली. तब्बल ३६ वर्षांनी पूर्तता झाल्यावर गंजाडजवळच्या या जागेवर मी व माझ्या परिवाराने वारली चित्रसंग्रहालय उभारले आहे.

   यापूर्वी चित्रांमधून मूकपणे मी अनेकदा बोललो पण आज तुमच्याशी मनमोकळा संवाद साधताना खूप समाधान वाटते आहे. आदिवासी नृत्यातील ताल, संगीतातली लय व्यक्त करणारी वारली चित्रकला ही भारताने जगाला दिलेली मोठी सांस्कृतिक देणगी आहे. कलाप्रेमी रसिकांनी या कलेचे तंत्र शिकून आत्मसात करावे. या कलेची जपणूक व संवर्धन अनेकजण करीत आहेत. मात्र प्रयोगांच्या नावाखाली स्वैर आविष्कार करणे टाळले पाहिजे. वारली कलेची मोडतोड होऊन मूळ गाभ्याला धक्का लागता कामा नये. या कलेचे विकृतीकरण होऊ नये याची दक्षता घ्यावी.भिंतीवर, कापडावर किंवा कागदावर वारली चित्र रंगवताना ब्रशचा वापर केला तर चित्र उठावदार न होता सपाट दिसते. मी कायमच बांबूची काडी, खजरीचा टोकदार काटा यांचाच वापर ब्रश म्हणून चित्र रंगविण्यासाठी केला. त्यामुळे चित्राला एक प्रकारचा 'एम्बॉस' केल्याप्रमाणे उठाव मिळतो. चित्र अधिक आकर्षक व जिवंत भासते. हे मी अनुभवाने सांगतो. माझा जन्म २५ डिसेंबर १९३४ रोजी तलासरी तालुक्यातील धामणगावी झाला. बालपणात आईवडिलांचे छत्र हरपले. मी पोरका झालो. त्या धक्याने माझी वाचा गेली. घरातील व आजूबाजूच्या महिलांनी माझा सांभाळ केला. सण-उत्सवाच्या प्रसंगी सुवासिनी कुडाच्या भिंती चित्रांनी सजवत. मला ते आवडायचं. बघून बघून मलाही तांदळाच्या पिठाने चित्र काढणे जमायला लागलं. मी तासनतास त्यात रमायचो. माझे कौतुक व्हायचे. मला लग्नघरी चौक लिहायला बोलवायचे. मात्र जसा मी तारुण्यात प्रवेश केला तेव्हा स्त्रियांचे परंपरागत काम एक पुरुष करतोय हे जमातीला रुचले नाही. मला अक्षरशः वाळीत टाकण्यात आले. पण न डगमगता मी डाव्या हाताने चित्र रंगवीतच राहिलो. माझी बालपणात गेलेली वाचा मला  तारुण्यात परत मिळाली. या कलेमुळे सर्व जग फिरलो. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत मला आपल्या मातीचाच अभिमान होता.

          (उत्तरार्ध पुढील अंकात)

                                          -संजय देवधर
**********************************
सालगडी ते पद्मश्री...

    वारली चित्रकलेत पारंगत होण्यापूर्वी मी एका सावकाराच्या शेतात सालगडी म्हणून ६० रुपये महिना पगारात राबलो. वारली कलेतील अखंड योगदानाबद्दल मला १९७६ साली प्रथमच राष्ट्रपती सन्मान मिळाला. त्यानंतर शिल्पगुरु पुरस्कार, बिरसा मुंडा पुरस्कार, तुलसी पुरस्कार, आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर गौरव, आदिवासी सेवक सन्मान यांनी मला व माझ्या कलेला गौरविण्यात आले. २०११ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान करून वारली कलेच्या लोकप्रियतेवर राजमान्यतेची मोहोर उमटवली. माझी फ्रान्समध्ये पॅरिस तसेच जर्मनी, इटली, अमेरिका येथील चित्रप्रदर्शने गाजली. १९९९ साली जपानमध्ये मिथिला संग्रहालयाने मला मानपत्र दिले व माझ्या २२ कलाकृती खरेदी करून संग्रहालयात मांडल्या. तेथेच मी वारली कलेचे कलाप्रेमींना प्रशिक्षण दिले. हा उपक्रम पुढे अनेक वर्षे सुरू राहिला. आयुष्यभर मी वारली कलेची मनःपूर्वक सेवा केली. 

माझ्यानंतर माझी मुले सदाशिव, बाळू तसंच नातू विजय, किशोर, प्रवीण यांनी ही परंपरा सुरु ठेवली आहे. देशविदेशात त्यांनी वारली कलेचा झेंडा फडकत ठेवला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।