"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास.". निशा डांगे यांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मविश्वास बाबत सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


आत्मविश्वास हे यशाचे गमक

         आत्मविश्वास हे तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या यशाचे गमक आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमची अर्धी लढाई आधीच जिंकलेली असते. आत्मविश्वास म्हणजे काय? तर सध्या सरळ असे म्हणता येईल, "आत्मविश्वास म्हणजेच स्वतःवर असलेला विश्वास." स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही तुमचे मन वांच्छिल ध्येय मिळवू शकता. आत्मविश्वासाला आता व्याख्येत बसवू या,

"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास."

         आत्मविश्वास असणारी व्यक्ती जग जिंकू शकते. प्रबळ आत्मविश्वास अर्थात स्वतःकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी होय.  तुम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून स्वतःकडे पहाल तर तुम्हाला तुमच्यात अनेक क्षमता दिसतील. स्वतःचे सामर्थ्य जाणून घेतले तरच आपण आपले वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतो.

"जीवनाच्या लढाईत यशस्वी बनण्याचे ब्रह्मास्त्र म्हणजे आत्मविश्वास"

             आत्मविश्वास ही एक मानसिक तसेच अध्यात्मिक शक्ती आहे. आत्मविश्वासाने माणसात वैचारिक स्वातंत्र्य निर्माण होते. व्यक्ती कुठल्याही कठीण समयी जराही न डगमगता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो.

आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करावे-

    सर्वात आधी तुम्ही स्वतःकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघा. स्वतःमधील क्षमता शोधून त्या विकसित करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम रहावे. मनात कुठलीही शंका न ठेवता कार्यसिद्ध व्हावे. एकदा तुमची ध्येय निश्चिती झाली की त्याचा एक कृती आराखडा डोक्यात तयार करून घ्यावा. योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी. प्रामाणिकपणे मनात ध्येयपूर्तीचा मनध्यास घेऊन ध्येयमार्गी चालावे. जी गोष्ट करण्याची मनाला भीती वाटते तीच करून पाहिल्यावर आत्मविश्वास नक्कीच वाढतो. ह्याचा अर्थ हा नाही की कुठल्याही वाईट गोष्टी सुद्धा कराव्यात. आपण जे कार्य करणार आहोत ते योग्य की अयोग्य ह्याचा आधी पडताळा करून घ्यावा.  ध्येयपूर्तीसाठी कुठल्याही वाममार्गाचा वापर करू नका. तुमचे स्वच्छ व निर्मळ चारित्र्य तुमचा आत्मविश्वास नेहमी वाढवत असतो. सखोल माहिती व भरपूर ज्ञान ह्या आत्मविश्वास वाढीस पूरक असलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. आपण जे कार्य करणार आहोत त्याबद्दल सखोल माहिती व योग्य ज्ञान आत्मसात करावे. निर्णयाची अंमलबजावणी करत असतांना यशाची खात्री तसेच अपयश पचवण्यास मनाची तयारी ह्या दोन्ही बाजूंनी स्वतःला आधीच तयार करून घ्यावे.  एखादा प्रयत्न अपयशी झाला तर अपयशाने खचून न जाता आपण निवडलेला मार्ग, प्रयत्नांची कमतरता पुन्हा एकदा तपासून बघावी. झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप न करता चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करता येईल ते बघावे. पुन्हा नवीन जोमाने कार्यरत व्हावे. स्वतःबद्दल  कुठल्याही प्रकारच्या तक्रारी मनात ठेवू नये.

       बहुतांश लोकांना स्वतःबद्दल तक्रारी असतात. ते सतत स्वतःमधील उणिवा शोधत राहतात. आत्मविश्वास, एकाग्रता, संवादकौशल्य ह्या तिन्ही गोष्टी सतत एकमेकांवर परिणाम करणाऱ्या आहेत. आपण जर सतत स्वतःमधील उणिवाच बघत राहिलो तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होत असतो. प्रत्येक माणसात काही उणिवा असतात तशाच काही क्षमताही असतात. आपण आपल्यातील उणिवा शोधण्यापेक्षा क्षमता शोधण्याचा प्रयत्न करावा. स्वतःकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न करायला हवा.

"To be comfortable with your own self."

       आत्मविश्वास ही मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. सतत स्वतःच्या कमतरता शोधत राहिलो तर आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो व आपसूकच आपले पाऊले अधःपतनाच्या मार्गावर वळतात. निराशेच्या गर्तेत माणूस स्वतःला हरवून बसतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

"आपण स्वतःच्या नजरेत स्वतःचा आदर करणे अत्यावश्यक आहे."

        आधी तुम्ही स्वतःचा आदर करा मग जग तुमचा करेल. तुम्ही स्वतःला जगासमोर सिद्ध करा मग जग तुमची योग्यता ओळखेल.

        आपण असे का आहोत याचा विचार करण्यापेक्षा हे बदलण्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करा. आपण आज इथपर्यंत पोहचलो ह्याचा अर्थ आपल्यात निश्चितच काहीतर क्षमता उर्मी आहेत. ह्या क्षमतांचा, उर्मीचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करा. स्वतःची शक्तीस्थाने ओळखा. स्वतःमधील चांगले गुण, कलाकौशल्य विकसित करा. स्वतःच्या कामाचा दर्जा सुधारा. नवनवीन आव्हाने पेलावी. किंचितही न घाबरता समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून थेट संवाद साधा. तुमची करारी नजरच लोकांना तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची ओळख करून देईन.

इथे मला वि. दा. करंदीकर यांच्या गाजलेल्या कवितेच्या ओळी स्मरतात.

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

       नकारात्मक विचार संपूर्णपणे त्यागून सकारात्मक दृष्टीकोन जोपासा. जगात अनेक यशस्वी व्यक्ती आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अवलोकन केले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी नकारात्मक विचारांना काबूत ठेवले आहे. त्यांच्या आयुष्यात अपयश आलेच नसेल का? अडचणी आल्याचं नसतील का? निश्चितच आल्या असतील. त्यांनी त्या अडचणींवर मात केली. मनातील भीती, निराशा दूर केली. ध्येयप्राप्तीचा पक्का निर्धार करून इच्छित ध्येय गाठले. जेव्हा आपला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यावेळी निश्चितच आपल्याला स्वातंबाबत आत्मविश्वास वाटेल. अगदी दृढ आत्मविश्वास ज्याची प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलागणिक गरज असते.

       स्वतःचे सामर्थ्य ओळखून स्वतःमधील निद्रिस्त आत्मविश्वासाला जागे करा. सुरुवातीस तुमच्या कुवतीनुसार छोटी छोटी ध्येये गाठा. डोळ्यासमोर अशी उद्दिष्टे ठेवा की जी सहजतेने पूर्ण होऊ शकतील. असे छोटे छोटे यश तुमच्या आत्मविश्वाला उत्साहवर्धक ठरेल. स्वतःच्या मानसिक अवस्था बदला. सर्वात आधी तुम्ही तुमचे मन तुमच्या ताब्यात घ्या. त्याला निराशेच्या गर्तेत जाऊ देऊ नका.

स्वामी विवेकानंद म्हणतात-

"मनाच्या ताब्यात आपण जाण्यापेक्षा मनालाच आपल्या ताब्यात ठेवणे यापेक्षा मोठी कोणतीही सिद्धी नाही."

              मनावर विजय प्राप्त करणे ही आत्मविश्वास मिळवण्यासाठी सर्वात उपयोगी मनसिद्धी आहे. मनसिद्धी प्राप्त केल्यावर तुमच्यातील निद्रिस्त आत्मविश्वास खळबळून जागा होईल. त्यानंतर तुमच्यासाठी जगात काहीच असाध्य राहणार नाही. आत्मविश्वासाच्या बळावर यशाची उंच शिखरे तुम्ही सहज काबीज करू शकाल.

"दृढ आत्मविश्वासे
पूर्ण होतील ध्येये
ध्येयपूर्ती असावे
जीवनाचे उद्दिष्टे"

लेखिका
निशा संजय डांगे
पुसद, यवतमाळ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!