संकल्प नंदिनी च्या शुद्धिकरणाचा... नमामी गोदावरी अभियानाची नांदी ! सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





न्यूज मसाला सर्विसेस,   ७३८७३३३८०१

संकल्प 'नंदिनी'च्या शुद्धिकरणाचा...

         नाशिकच्या नंदिनी नदीला प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काही सुजाण नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, मानवी साखळी करून नाशिककरांचे लक्ष वेधण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या सिडको मंडलाने त्यासाठी पुढाकार घेतला.भाजपाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची ही संकल्पना होती. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली. नंदिनी नदीचे सौन्दर्य- संवर्धन तर व्हायला हवेच, त्याबरोबरच गोदावरी व तिच्या सर्व उपनद्यांंकडेही असेच लक्ष देण्याची गरज आहे. अरुणा- वरुणा (वाघाडी), गायत्री, सावित्री व मेघा या पाच उपनद्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या असून सरस्वती नदीचे रूपांतर तर नाल्यात होऊन बराचसा काळ लोटला आहे! महत्त्वाचे म्हणजे गोदावरी नदी बारमाही वाहणे आवश्यक आहे. तिच्यावरील पाणवेलींचे आक्रमण दूर होऊन पुन्हा निर्मळ स्वरूप यायला हवे. 

            पाच जूनला 'जागतिक पर्यावरण दिना'च्या औचित्याने झालेल्या या उपक्रमात भाजप मंडलातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अंजनेरी ते टाकळी दरम्यान १० टप्यात हा उपक्रम राबविण्यात आला. उंटवाडी पुलापासून शाहूनगर, यमुनानगर व पुढे आयटीआय पुलापर्यंत आणि सातपूर हद्दीत थेट अंबड लिंकरोडपर्यंत; नदीकाठच्या तीरावर १०-१० फूट अंतर राखून कार्यकर्ते साखळीने उभे राहिले. या संदर्भातील प्रबोधनाचा वैशिष्ट्यपूर्ण मजकूर लिहिलेले फलक प्रत्येकाच्या हातात होते.  विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागरिकांचे लक्ष त्यामुळे वेधले गेले व संदेश प्रभावीपणे पोहोचला. कोरोनाच्या काळातही पुरेशी दक्षता घेऊन एखादा उपक्रम योग्य पध्दतीने कसा राबविता येतो, याचा आदर्श वस्तुपाठच यातून नाशिकरांना मिळाला, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. या उपक्रमासाठी अतिशय  नियोजनबद्ध पूर्वतयारी करण्यात आली होती. सर्व कार्यकर्त्यांनी पांढऱ्याशुभ्र टोप्या परिधान केल्या होत्या त्यामुळे स्वच्छता, पावित्र्य अधोरेखित झाले. नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरात पत्रके वाटून त्यांनाही या अभियानात सामील करून घेण्यात आले. नंदिनी नदीतीरी ठिकठिकाणी अक्षरशः कचराकुंडीची  बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अनेक गटारे खुलेआम नदीपात्रात सोडलेली आहेत. मात्र या संदर्भातली जनजागृती हा केवळ एक दिवसाचा जल्लोष न राहता, काम पुढे नेण्याची जबाबदारी संयोजक व महापालिकेने घेतली पाहिजे. दरम्यान महापालिका प्रशासनाने नंदिनी तीरावर संरक्षक भिंत उभारण्याचे ठरवले आहे. महापौर सतिश कुळकर्णी व मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दखल घेत संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. नदीपात्राची तातडीने साफसफाई सुरु करण्यात आली असून ती नियमितपणे करण्याचे निर्देश दिले आहेत. नदीत केरकचरा व डेब्रिस टाकणाऱ्यांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.                   

              अंजनेरीजवळ सुप्याच्या डोंगरातून  उगम पावणाऱ्या व १५ किलोमीटर लांबी असणाऱ्या नंदिनी नदीच्या दुतर्फा ३०  कि.मी. परिसरात सातत्याने स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी रुफ टॉप हार्वेस्टिंग केले पाहिजे. दुतर्फा वृक्षारोपण करण्यात यावे. पुण्यात जसे नाल्यावर सुंदर उद्यान झाले आहे, त्याप्रमाणे दोन्ही तीरांवर सुंदर घाट व छोटी उद्याने केली तर नागरिक निश्चितच दुवा देतील. उपक्रमाच्या अखेरीस टाकळी येथे संत रामदास स्वामी मठासमोर नंदिनी तीरावर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महापौर सतीशनाना कुलकर्णी, प्रदेश भाजपा सरचिटणीस आ.देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्षा खा.भारती पवार, बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, उपमहापौर भिकूबाई बागूल, महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पर्यावरण मंच संयोजक उदय थोरात यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नंदिनी पुनरुज्जीवन अभियान नेटाने राबविण्याचा निर्धार केला. लक्ष्मण सावजी यांनी पुढील चार टप्प्यांचे सूक्ष्म नियोजन करून अधिक सक्षमपणे अभियान राबविण्याची ग्वाही दिली. त्यांना सर्व प्रकारचे बळ व सहकार्य पक्षाने तसेच महापालिकेने द्यायला हवे, हीच समस्त नाशिककरांच्या वतीने अपेक्षा.

                                            -संजय देवधर      
                            ( वरिष्ठ पत्रकार, नाशिक )
***********************************

          डॉ.राजेंद्रसिंह यांचं  मार्गदर्शन


नमामी गोदावरी अभियानाची नांदी


    लक्ष्मण सावजी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ख्यातनाम जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह नाशिकला आले असताना आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याशी या विषयावर विस्तृत चर्चाही झाली. तो क्षण नमामी गोदावरी अभियानाची नांदीच म्हणावा लागेल.नंतरच्या गंगा दशहरा कार्यक्रमात नदीच्या  शुद्धिकरणाचा संकल्प केला. ब्रह्मगिरी  पर्वतावरून तीर्थकलश आणला. गोदावरी खोरे विस्तृत असून त्याचा अभ्यास करण्यापूर्वी पायलट प्रोजेक्ट म्हणून नंदिनी (नासर्डी ) नदी संवर्धनाचे काम आधी हाती घेतले. गोदावरी शुद्धिकरण मंचाचे राजेश पंडित, भाजपा पर्यावरण मंचाचे उदय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला मूर्त स्वरुप द्यायचे निश्चित झाले. नंदिनीच्या उगमाजवळ धरण किंवा बंधारा बांधला तर ती बारमाही वाहती राहील. १५ किलोमीटरच्या प्रवासात तिच्यात गटारी, सांडपाणी सोडले जाते. टाकळी येथे  नंदिनी गोदावरीला मिळते. त्या संगमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आरती करण्यात आली. नंदिनीच्या उगम ते संगमादरम्यान लाखो नागरिकांची वस्ती आहे. त्यांनाही या चळवळीत सहभागी करून घेण्यात आले. याचाच पुढचा भाग म्हणून दि.२३ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला 


नंदिनीच्या दोन्ही तीरांवर स्थानिक प्रजातींचे वृक्ष लावून नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. 'नमामी गंगे', 'नमामी चंद्रभागा' या उपक्रमांप्रमाणे 'नमामी गोदावरी' हे पुढील ध्येय साध्य करण्याचे स्वप्न आहे. ६ राज्यांमधून वाहणाऱ्या गोदावरीचे खोरे १५ हजार किलोमीटर पसरलेले आहे. आंध्र - तेलंगाणा येथील विद्यापीठात 'गोदावरी गीत' गायले जाते.तसेच ते नाशिकमध्ये व्हावे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार गोदावरीतून जलवाहतूक शक्य आहे. मात्र त्यासाठी आधी नदी स्वच्छतेची चळवळ यशस्वी व्हायला हवी असा विश्वास सावजी यांनी व्यक्त केला.                                        


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !