५ जून, जागतिक पर्यावरण दिवस, निसर्गाच्या लयतत्वाशी इमान राखणारी आदिवासी वारली जीवनशैली व कलासंस्कृती !! निसर्गाच्या वरदानाविषयी कृतज्ञभाव व्यक्त करणे काळाची गरज !!! आपणही करुया जपणूक !!!
पर्यावरणपूरक वारली कलासंस्कृती 

   दरवर्षी दि.५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. आदिवासी वारली जीवनशैली व कलासंस्कृती पर्यावरणाशी कमालीचा समतोल साधते. निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान राखते. ही जमात निसर्गस्नेही असून पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा त्यांच्या साध्यासुध्या व अत्यंत कमी गरजा असलेल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. दुर्गम भागात निसर्गाच्या सान्निध्यात रममाण झालेल्या वारली लोकांना कसलाही हव्यास नसतो. निसर्गाच्या जीवनचक्राला ते खीळ घालत नाहीत. वारली चित्रशैलीत निसर्गातील झाडे, वेली, पशुधन, पक्षिजगत,माणसाचे दैनंदिन जीवन यांना महत्त्वाचे स्थान आहे.म्हणूनच आदिवासींना जल, जमीन, जंगलांचे अधिकार मिळायला हवेत.

     वारली ही प्राचीन काळापासून दुर्गम अशा जंगल, डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहणारी प्रमुख आदिवासी जमात आहे. 'वारलं' म्हणजे जमिनीचा तुकडा ! त्यावर उदरनिर्वाह करणारे म्हणून त्यांना 'वारली' संबोधले जाते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती असणारे म्हणूनही 'वरले'- 'वारली' म्हटले जाते, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. डहाणू, गंजाड, तलासरी, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा या भागात तसेच दादरा, नगर- हवेली, दमण, सिल्व्हासा  या केंद्रशासित प्रदेशात आणि गुजरात व डांग भागात वारली जमातीचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे या जमातीचे विस्थापन झाले असल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे. मूलतः वारली संस्कृती  इ.स. पूर्व २५०० ते ३००० या काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.दहाव्या शतकापासून वारली चित्रशैलीचे  पुरावे मिळतात. वारली छोट्या छोट्या पाड्यांवर  राहतात आणि झोपडीच्या भिंतीवर तांदळाच्या पिठाने बहारदार चित्रण करतात. वारली जमातीने आपल्या प्रथा, परंपरा व जीवनाकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन यांची जपणूक केली आहे. धरती मातेशी म्हणजेच निसर्ग आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेत साधीसोपी जीवनशैली त्यांनी अंगीकारली आहे. अत्यंत कमी गरजा हे आदिवासी वारली जमातीच्या जगण्याचे सूत्र दिसते. त्यांच्या देवदेवता निसर्गातल्याच असून त्यांची पूजा ही शेती, सृष्टीतील जीवजंतू व प्राणिपक्ष्यांसाठी आवश्यक असल्याचे ते मानतात. 

    निसर्गसाखळीवर त्यांची असीम श्रद्धा आहे. त्याचेच प्रतिबिंब वारली चित्रशैलीत स्पष्टपणे उमटलेले दिसून येते. अगदी मुंग्यांपासून निसर्गातील सर्व घटकांना वारली चित्रांमध्ये स्थान देण्यात आले आहे. पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी(जमीन- माती), आप( पाणी), तेज(अग्नी), वायू, आकाश यांना आदिवासी वारली परमेश्वर मानतात.निसर्गातल्या चैतन्याला चित्ररूप देऊन त्याचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करतात. कलानिर्मितीचा हा मूलमंत्र त्यांना शाश्वत शांतीचा, समाधानाचा मार्ग दाखवतो.

पर्यावरण, निसर्ग यांची हानी होऊ न देता वारली जमात समाधानाने जगते.आजूबाजूला असणाऱ्या पर्यावरणाला पूरक अशी सुंदर घरे वारली लोक बांधतात. भोवतालच्या निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंचाच वापर करण्यात येतो. कारवी, बांबू याबरोबरच साग, ऐन या झाडांच्या लाकडाचा उपयोग करून घेतात. घराच्या भिंती कारवी, बांबू, माती व शेणाने लिंपून उभ्या राहतात. झाडांच्या पानांचा वापर छपरांसाठी होतो. कारवी या वनस्पतीच्या आतील भाग कापसासारखा मऊ व वजनाने हलका असतो. अशा झोपड्या उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उबदार असतात. वारा,  मुसळधार पाऊस यांना तोंड देत या झोपडया वर्षानुवर्षे सक्षमपणे उभ्या राहतात.वारली जमातीचे जीवन प्रामुख्याने जंगल, निसर्ग यावरच अवलंबून आहे. त्यामुळेच ते या  संसाधनांचा जपून वापर करतात. भीषण दुष्काळी परिस्थितीतही तेथील पाण्याचे स्त्रोत आटत नाहीत आणि पाण्यावाचून शेतीचे नुकसान होत नाही. वारली शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या घटना घडत नाहीत. या साऱ्याचे मर्म त्यांच्या सृष्टिकेंद्री जीवनशैलीत आहे. 
                                             - संजय देवधर
 ( लेखक ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे 
अभ्यासक आहेत.)
**********************************
निसर्गाच्या वरदानाविषयी कृतज्ञभाव!   

                वर्षाऋतूत नवीन जीवनचक्राची सुरुवात होते.वारली त्याचे स्वागत 'कोली' ही पालेभाजी समारंभपूर्वक खाऊन करतात.जंगलात उगवणारी ही पालेभाजी म्हणजे धरणी मातेने दिलेला आशीर्वाद,अशी त्यांची श्रद्धा असते. जेवणापूर्वी दिवा लावून निसर्गाची पूजा करतात व नंतरच भाजीचा प्रसाद ग्रहण केला जातो. त्यानंतर सर्वजण शेतीच्या कामात व्यस्त होतात. शेतीच्या प्रत्येक कामापूर्वी कुलदेवतेचे स्मरण करण्यात येते. निसर्गाच्या वरदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. काही दिवसांनी रोपे मोठी होऊन कणसे दिसू लागतात. हा आनंद सर्वजण तारपा नृत्य व गौरी नाच करून साजरा करतात. पिके तयार झाल्यावर कापणी करण्यापूर्वी सवरी देवीची पूजा केली जाते. ही देवता शेतीचे रक्षण करते व भरभरून अन्नधान्य देते असा वारली जमातीचा विश्वास आहे. विविधततेने नटलेल्या निसर्गालाच वारली जमात परमेश्वर मानते. कणसरी म्हणजे कणसांची देवता. शेताची - वस्तीची राखण करणारा वाघ्यादेव तसेच सूर्यदेव,चांदेसर (चंद्रदेव),धरतरी माता (धरित्री), हिरवा देव, नारनदेव, हिमाई देवी, पालघट देवी व इतर दैवतांमुळेच सृष्टी, जीवनचक्र सुरळीत चालते अशी वारली जमातीची दृढ श्रद्धा आहे. जीवनावरची ही अतूट श्रद्धाच त्यांची प्रेरणा बनते आणि कलेद्वारे नवनिर्माण घडविते.यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली त्यांना संगीत, नृत्य आणि चित्रकलेच्या रूपाने गवसली आहे. मात्र अलीकडे त्यांच्या परिसरातही सिमेंट काँक्रीटचा  वापर वाढला आहे,दर्शनी भिंतीवर चकचकीत टाइल्स लावल्या जातात. त्यामुळे पारंपरिक चित्रांनी भिंती सजत नाहीत ! असे होऊ न देता, त्यांनी आपले समृद्ध रेखावैभव जपावे असे वाटते. निसर्गाच्या सहवासात त्यांची कला भविष्यातही फुलत राहो ही सदिच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!