अनोखी गुरुवंदना, सदाबहार गाने सुहाने !

अनोखी गुरुवंदना, सदाबहार गाने सुहाने !
 
       नाशिक (प्रतिनिधी)::- प्रख्यात गायिका रागिणी कामतीकर संचलित स्वराजित संगीत अकॅदमीतर्फे नुकतीच 'गाने सुहाने' ही सदाबहार गाण्यांची मैफिल संपन्न झाली. स्वराजितमध्ये संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या गुरूप्रती कृतार्थ भावना व्यक्त करत ही अनोखी गुरुवंदना दिली.

२८ जुलै रोजी सरत्या आषाढातल्या संध्याकाळी आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला रावसाहेब थोरात सभागृह येथे संपन्न झालेली ही संगीत पर्वणी रसिकांना मनापासून आवडली. स्वरांचा लखलखाट, दीप अमावस्येच्या संध्याकाळी नाशिककरांना आनंद देऊन गेला. संगीत म्हणजे तुम्हा आम्हा रसिकांच्या हृदयातील स्पंदने असून ज्याला साक्षात परमेश्वराने तयार केलेलं आहे म्हणून ते नेहमी हृदयाने ऐकले पाहिजे असे सांगणाऱ्या गुरु रागिणीताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थिनींनी एकाहून एक अशी सदाबहार गाणी सादर केली.

"आजा पिया" ह्या गाण्यापासून मैफिलीची सुरुवात झाली आणि "इत्तीसी हसी…इत्ता सा तुकडा, चांद का" ह्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी नव्या जुन्या गाण्यांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला. गीत सादरीकरणाने विद्यार्थिनींचे मनोबल नक्कीच वाढले आहे. 

कार्यक्रमात प्राजक्ता बागड, स्वाती पाचपांडे, श्रुती वैशंपायन, सुनिता शिरोडे, सोनाली चौधरी,  डॉ.अर्चना वरे, डॉ.आरती चिरमाडे, डॉ.पूनम वराडे, श्रीशा जुनागडे, गायत्री भांडारी, लक्ष्मी अपशंकर, डॉ.सुप्रिया जोशी यांनी आपली गाणी सादर केली आणि रसिकांची वाहवा मिळवली. अमर भोळे ह्यांनी रंगतदार सूत्र संचालन केल्याने कार्यक्रम बहारदार झाला. सचिन तिडके यांनी  ध्वनीव्यवस्था पाहिली. रागिणीताईंसाठी गोदामाईची पत्रवारी साक्षात पोस्टमन बनून दत्तात्रय कोठावदे ह्यांनी सभागृहात सादर केली आणि अतिशय सुंदर प्रेरणादायी पत्रवाचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।