शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !
शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !
नाशिक::- सातपूर च्या अशोकनगर भागातील गट क्र. ४९२ व ४९३ संदर्भातील कथित जमीन हडप प्रकरणात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार सुनिता प्रभाकर दोंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी महसूल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तसेच यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्र मनोहरदास ठक्कर, शामसुंदर रामकिसन लाहोटी, लिलाबाई शामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी, कपिल शामसुंदर लाहोटी व इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन १९८० मध्ये फेरफार नोंद क्रमांक २९३५ व २९३६ द्वारे महसूल अभिलेख ७/१२ मध्ये बेकायदेशीररीत्या नावे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोणतेही नोंदणीकृत खरेदीखत किंवा मोबदल्याचा व्यवहार नसताना महसूल नोंदीत फेरफार करून जमीन बळकावल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या नोंदींच्या आधारे त्यांच्या कुटुंबाला मिळकतीवर वहिवाट करण्यास अडथळे व धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी दि. २० जानेवारी २०२५ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तसेच दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारदार सुनिता दोंदे या अनुसूचित जाती प्रवर्गातील असून त्यांच्या कुटुंबाची जमीन बळकावण्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून फेरफार नोंद क्रमांक २९३५ व २९३६ रद्द कराव्यात आणि दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत या घटनेची जबाबदारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रशासनाची राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा