'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!

     न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक
7387333801

       कळवण::- कवी अशोक बुरबुरे यांच्या कवितेसह अनेक कविता सादर करत आईच्या आठवणींचा जागर कळवणच्या आप्पाश्री लॉन्समध्ये रंगला. निमित्त होतं सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लीलाबाई दिनकर गरुड यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं. महाराष्ट्राभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत 'मायबाप' च्या १८९ व्या प्रयोगातून मातेच्या स्मृतींना अनोखे अभिवादन करण्यात आले. 

     कवी आणि सादरकर्ते राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले. 
  'नाही घातलीस माळ, नाही लावियेला टिळा
  माझ्या मायमाऊलीचा, भक्तिमार्ग साधाभोळा !' असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी संसारात रमलेल्या पण मुलांच्या संगोपनात घरालाच मंदिर मानणाऱ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आपल्या वडिलांचं मोठेपण मांडताना-
  'श्रीमंती मनाची | मूर्ती चंदनाची |
  कीर्ती मानवाची | बाप माझा ||'
       अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे निवेदन करताना कवी रवींद्र मालुंजकर यांनी आईच्या भावविभोर कविता पेरताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या 'माय अंगुळ करिती, पाणी व्हात-व्हात जाई, थेट पंढरपुरात, त्याची चंद्रभागा होई...' या कवितेसह विविध कविता पेरत मातापित्यांच्या आठवणी जागविल्या.
     कार्यक्रमादरम्यान इंगळे आणि उगले यांनी सादर केलेल्या कविता व कवी प्रशांत केंदळे यांची  'बापलेकीची कहाणी,' कवी राजेश्वर शेळके यांची 'बूट आणि टाय,' कवी कमलाकर देसले यांची 'येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी,' कवी विजयकुमार मिठे यांची 'काय देऊ पोरी तुला,' कवी काशीनाथ वेलदोडे यांची 'झाडाच्या पानापानात,' गझलकार गौरवकुमार आठवले यांची 'दारिद्र्याच्या संसाराचे नंदनवनही करते आई...' अशा एकाहून एक कवितांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले.
     आईवडिलांविषयी कृतज्ञभाव जागवताना राजेंद्र उगले, अरुण इंगळे, रवींद्र मालुंजकर यांनी उपस्थितांना आईवडिलांच्या आठवणींनी भावनाविवश केले. अभिजीत वैद्य (तबला) आणि प्रा.नरेंद्र जाधव (सिंथेसायझर) यांनी साजेशी साथसंगत केली. उपस्थितांनी या आगळ्यावेगळ्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन दिनकर गरुड, विक्रम गरुड, राजेंद्र गरुड, जितेंद्र दिनकर गरुड, बाबुलाल सोनवणे आदींनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!