अनिल चैत्या वांगड एक प्रतिभावान शिष्योत्तम ! वारली चित्रशैली म्हणजे मातीचा सन्मान !!






प्रतिभावान  शिष्योत्तम

               "आदिवासी वारली चित्रशैलीला ११०० वर्षांची ज्ञात परंपरा आहे. या कलेला समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी, वारसा आणि स्थानिक भौगोलिक संदर्भ आहेत. माझे गुरू पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्यामुळेच वारली कलेला नाव आणि वैभव प्राप्त झाले. ते टिकवून अधिक उंचीवर नेण्याचे काम माझ्यासह नव्या पिढीने करायचे आहे. सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेतून मी त्यांच्याकडे शिकलो. सध्याची व्यावसायिकता व अर्थकारणाच्या रेट्यामुळे एकूणच कलाविश्वात परिवर्तन अपरिहार्य आहे. मात्र तरीही विचारात सुस्पष्टता असेल तर वारली चित्रशैली विशुद्ध स्वरुपात टिकवणे शक्य होईल", असा अभिप्राय मशे यांचे प्रतिभावान शिष्योत्तम अनिल वांगड व्यक्त करतात.

               अनिल चैत्या वांगड यांचा जन्म १९८३ साली डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या वांगडपाडा येथे झाला. नववीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण झाल्यावर परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडले. पुढे सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेत जिव्या सोमा मशे यांच्याकडे अनिल यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. आत्मसात केलेल्या कलेला त्यांनी आपल्या प्रतिभेने अधिक आकर्षक स्वरूप दिले. अनिल म्हणतात की, जिव्या मशे डाव्या हाताने सहजपणे चित्रे रेखाटायचे. वारली चित्रावर आपली सही करणारे ते पहिले पारंपरिक कलाकार. त्यांनी कलेची तांत्रिक बाजू व मर्यादा सांभाळून अनेक यशस्वी प्रयोग केले. नव्या प्रतीकांना व प्रतिमांना चित्रात स्थान दिले. वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर नेऊन तिला प्रतिष्ठा मिळवून दिली.जातीभेद, भाषाभेद, प्रांतभेद पार करून या कलेने सगळ्यांना आपलेसे केले. हल्ली महाराष्ट्राच्या लोककलेचे प्रतीक म्हणजे लावणीनृत्य आणि दृश्यकलेचा सारांश म्हणजे वारली चित्रे, अशी एक समजूत झालेली आहे. ती चुकीची असून त्यामुळे कलेची मोडतोड होते असे त्यांचे मत आहे. वारली चित्रशैली हे मनोगत व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहे. आपल्या मनातील भावनांना त्याद्वारे मोकळी वाट करून देता येते. पण हल्ली वारली कलेचे स्वरूप 'मेड टू ऑर्डर' असे झाले आहे. ग्राहक तारपा नृत्याचे चित्र पाहिजे, देवचौक काढून द्या, मोराचे रेखाटन हवे असे सांगतात. मग कलाकारही 'मागणी तसा पुरवठा' करतात, त्यामुळे कलेचे सत्त्व आणि स्वत्व हरवते अशी खंत अनिल यांना वाटते. केवळ नेटवर बघून वारली चित्रे रेखाटणे, आदिवासी संस्कृती, परंपरा जाणून न घेता चुकीची माहिती देणे गैर आहे असे त्यांना वाटते.

                  भारतीय सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अनिल यांनी आत्तापर्यंत चारवेळा फ्रान्सचा दौरा केला असून अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर येथेही वारली चित्र प्रदर्शन, प्रशिक्षण यासाठी ते जाऊन आले आहेत. याशिवाय मशे यांनी जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझिल, पोर्तुगाल, तैवान, दक्षिण कोरिया येथे झालेल्या त्यांच्या वारली चित्रप्रदर्शनात अनिल यांची चित्रे मांडली होती. कलापंढरी पॅरिसमध्ये त्यांच्या वारली चित्रांचे एक महिना प्रदर्शन भरले होते.त्यातून त्यांनी मशे यांचे ते शिष्योत्तम आहेत हे सिद्ध केले. परदेशातील रसिकांना भारतीय चित्रांविषयी उत्सुकता असते व चित्रे खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो, असे निरीक्षण ते नोंदवतात. गुरू-शिष्य परंपरा कायम ठेवण्यासाठी अनिल यांनी अमित डोंबरे, आपले चुलतभाऊ गणेश वांगड, नितीन बालशी तसेच त्याची पत्नी रऊ यांसह सरिता वंजारा, अरुणा ईरीम यांना वारली कलेचे धडे दिले आहेत. त्यातील काहींची चित्रे परदेशात पोहोचली आहेत. अनिल यांची चित्रे बघितली की, त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटते. त्यात आदिवासी संस्कृती, परंपरा, चालीरीती यांचे सुरेख दर्शन तर घडतेच; त्याचबरोबर समकालीन विषय - आशयही  प्रकटतात. संवेदनशील अनिल यांनी कोरोनाच्या उद्रेकानंतर या दुरवस्थेचे वारली चित्रशैलीत चित्रण केले. वारली चित्रकला हे सामाजिक प्रबोधनासाठी उत्तम माध्यम असल्याने, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा समकालीन विषयांवर प्रबोधनात्मक चित्रे ते रेखाटतात. त्यांची पत्नी संगीता तसेच कृषिका आणि यामिनी या मुली चित्रे रेखाटतात. छोटी अपर्णा अजून लहान आहे. अनिल यांचा भाऊ राजेश हा देखील उत्तम वारली कलाकार आहे. अनिल यांना युनेस्कोचे वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल अवार्ड मिळाले आहे. राष्ट्रीय कलारत्न गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. याशिवाय अनेक छोटेमोठे  पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

                                          -संजय देवधर

( ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ज्ञ )

*********************************
वारली कला म्हणजे मातीचा सन्मान...


    माणूस आणि जमीन (पृथ्वीतत्त्व) यांच्यात दैवी नाते आहे. आदिवासी वारली कला जमिनीचा, मातीचा सन्मान करते. निसर्गाचा, पंचमहाभूतांचा आदर करते. सण- उत्सव, लग्नसोहळे व आनंदाच्या प्रसंगी वारली महिला भिंतीवर चित्रे रेखाटत. त्याद्वारे ईश्वराची आराधना करून आशीर्वाद घेत.नवीन धान्य आल्यावर सुगीच्या प्रसंगी सारे आदिवासी पाडे चित्रांनी सजत. अलीकडे हे चित्र बदलले आहे. पूर्वी चित्रे रेखाटण्यात महिला आघाडीवर असायच्या. पुरुष त्यांना हातभार लावायचे. अलीकडे मात्र महिला मागेमागेच राहतात. पुरुष झोपडीच्या भिंतीऐवजी कागद, मांजरपाट, कॅनव्हास यांवर आधुनिक रंगांचा वापर करून वारली चित्रे रंगवितात. शिक्षणामुळे अनेकजण आपला पाडा सोडून इतरत्र नोकरीसाठी जातात व आपली संस्कृती, चित्रशैली विसरतात. शहरी भूलभुलय्याचा पगडा त्यांच्यावर बसतो. मातीशी असणारी नाळ तुटते. असे होऊ नये अशी अनिल यांची तळमळ आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।