मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक !


    शालांत परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या एका युवकाने आपली अभ्यासू वृत्ती, हुशारी, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर इंग्लिश व जर्मन भाषेत आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन केले आहे. तो पारंपरिक वारली चित्रकार तर आहेच ; पण वारली जमातीची समृद्ध परंपरा, चालीरीती यांचा अभ्यास करून  त्याने वेळोवेळी विपुल लिहिले देखिल आहे. त्याने ७०० लोककहाण्यांचा संग्रह केला असून त्यावर आधारित १०१ वारली चित्रेही रेखाटली आहेत. सध्या एक २०० पानी पुस्तक इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध करण्याचे काम आणि त्यासाठी चांगल्या प्रकाशकाचा शोध सुरु आहे. याशिवाय कालौघात नष्ट होऊ पहाणाऱ्या १४ पारंपरिक वाद्यांचा अभ्यास तो करतोय. या कलाकार - साहित्यिकाचे नाव आहे मधुकर वाडू. त्याच्या कार्याची व्याप्ती व परीघ मोठा असल्याने, दोन भागांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या लेखाचा हा पूर्वार्ध...


   मधुकर रामभाऊ वाडू यांचा जन्म १९६८ साली जव्हार जवळच्या आपटी पाड्यावर झाला. पालघर तालुक्यातील मनोर जवळच्या कोंढाण या दुर्गम गावात ते राहातात. आई जानकीबाई शेती करायची तर वडील रामभाऊ सामाजिक कार्यकर्ते. शेतमजूर शेतकरी पंचायत संघटनेच्या माध्यमातून ते समाजबांधवांसाठी काम करायचे. बालपणी मधुकरचे शिक्षण वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये राहून झाले. विक्रमगड येथे राहाणाऱ्या मावशी यमुनाबाई भोईर यांनी वारली चित्रकलेचे संस्कार केले. शालांत परीक्षेत आलेल्या अपयशाने खचून न जाता त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचा ध्यास घेतला. प्रयत्नपूर्वक पाठांतर करून एकलव्यासारखी प्रगती केली. त्याचवेळी दुसरीकडे  विविध कल्पना, उपजत प्रतिभा यांच्या स्पर्शाने मधुकर यांची चित्रे वेगळेपण सिद्ध करत होती. देशातील विविध भागांत भरणाऱ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन त्यांनी रसिकांना चित्रे विकली. पुढच्या टप्प्यावर त्यांच्या चित्रांना परदेशातून मागणी यायला लागली. अनेक देशांमध्ये ती निर्यात व्हायला लागली. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये  पारितोषिके मिळवल्याने अनेक शासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचा परिचय झाला. १९९२ साली पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रदर्शनाचे निमंत्रण त्यांना मिळाले. बालगंधर्व कलादालनात झालेल्या या चित्रप्रदर्शनाला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर चित्रविक्री होऊन चांगला नफा झाला. पुढील पाच वर्षांत मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, उदयपूर, भोपाळ येथे अनेकदा त्यांची वारली चित्रप्रदर्शने झाली. त्यामुळे नाव व प्रसिद्धी मिळत गेली. आत्मविश्वास वाढला. विचारांची प्रगल्भता त्यांच्या चित्रांमध्येही प्रकर्षाने जाणवते.


   दरम्यान जर्मनीच्या एका महिलेने थेट मनोर गाठले. मधुकर सफाईदारपणे इंग्रजी, जर्मन भाषा बोलू, लिहू शकतात हे बघून ती थक्कच झाली. चित्रनिर्मिती पासून पॅकिंग व इतर गोष्टींसाठी तिने खूप सहकार्य केले. त्यानंतर जर्मनीत नियमितपणे त्यांची चित्रे निर्यात होऊ लागली. तलासरीच्या ज्ञानमाता सदन या संस्थेने मदतीचा हात दिल्याने परदेशातून वेळेवर पैसे मिळू लागले. १९९७ मध्ये श्रीमती सिग्नी यांनी पारंपरिक आदिवासी वारली लोककथांवर आधारित चित्रे काढून त्यांचे पुस्तक तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यातून मधुकर यांनी 'उंटर दिम रेगन बोगन' (अंडर द रेनबो) हे सात सचित्र कथांचे पुस्तक जर्मन भाषेत लिहिले. एप्रिल २००३ मध्ये ते जर्मनीतील एका प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. या ३६ पानी देखण्या पुस्तकात २१ आकर्षक वारली चित्रांचा समावेश आहे. त्यातून रॉयल्टीपोटी  मिळालेल्या पैशाबरोबरच  मधुकर यांना प्रसिद्धीही मिळाली. जिनिव्हाच्या पब्लिशिंग कंपनीने मधुकर यांच्याकडून  'द स्टोरी ऑफ ह्युमन लाईफ' हे पुस्तक लिहून घेतले. ४५ गोष्टींवर १२० चित्रे रेखाटून हे २०० पानी पुस्तक तयार झाले. नंतर त्याचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला. फ्रेंच भाषेत लिहिलेल्या ' 'ट्रॅडिशन ऑफ द वारलीज् ' या पुस्तकाचे प्रकाशन मधुकर यांच्या फ्रान्स दौऱ्यात पॅरिस येथे त्यांच्याच हस्ते झाले. मधुकर वाडू व त्यांचे सहकारी रमेश काटेला यांनी व्याख्याने व कार्यशाळा घेऊन विविध फ्रेंच विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना वारली चित्रशैलीचे मार्गदर्शन केले. (उत्तरार्ध पुढील अंकात.)       


                                      -संजय देवधर

(ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ज्ञ)

*********************************

पारंपरिक कथेला अनुरूप चित्रनिर्मिती !


आदिवासी वारली जमातीच्या पारंपरिक लोककथा, दंतकथा लिहिण्यासाठी मधुकर जमातीतील जाणकार वयोवृद्धांची मदत घेतात. त्यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग करण्यात येते. एकाने सांगितलेली माहिती आणखी चार जणांकडून तपासून खातरजमा केली जाते. कथेचे पुनर्लेखन करताना चिंतन केले जाते, तसेच माहितीचा सर्व बाजूंनी  तपशीलवार विचार केला जातो. त्यासाठी प्रसंगी तज्ज्ञांची मदत घेतली जाते. नंतर कथेला अनुसरून सुयोग्य वारली चित्रे रेखाटली जातात. २०१९ च्या बोर्डी येथे झालेल्या चिकू महोत्सवात संशोधक मधुकर यांच्या 'मिस्टिकल वर्ल्ड ऑफ वारली' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात वारली जमातीचा इतिहास, जगाच्या निर्मितीविषयक आदिवासींच्या कल्पना, निसर्गाचे सूक्ष्म ज्ञान, वारली लोककथा, त्यांची जीवनशैली, सण-उत्सव, पारंपरिक वाद्ये, वारली चित्रशैली यांचा ऊहापोह केलेला आढळतो. वारल्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व प्रत्यक्षात आचरणात येणाऱ्या रूढी-परंपरांची सांगड त्यात घातलेली दिसते. मधुकर यांची पत्नी वनिता शेती करते. त्यामुळेच आपण कला व लेखनाला पुरेसा वेळ देऊ शकतो, असेही ते अभिमानाने म्हणतात. रीना आणि अस्मिता या मुली व रेनर हा मुलगा आवड, हौस म्हणून वारली चित्रे रेखाटतात. मात्र हे तिघेही वेगवेगळ्या क्षेत्रांत करीअर करीत आहेत. त्यांना कलेची व वडिलांच्या कार्यकर्तृत्वाची जाण तसाच अभिमानही वाटतो


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!