नावातल्या 'मोराचा' डौल चित्रांमध्येही...! जपानी रसिकांची वाहवा मिळवणारा राजेश मोर !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!





नावातल्या 'मोराचा' डौल चित्रांमध्येही... 


  "मी जंगलात राहातो आणि त्याचाच  एक अविभाज्य  भाग आहे. झाडंझुडुपं, वेली, शेती, पशुपक्षी यांच्याशी माझं अतूट नातं आहे. आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. मी त्या साऱ्यांचा प्रतिनिधी असून त्यांच्याच भावना चित्रातून व्यक्त करतो. आडनावाप्रमाणेच मोरासारखा डौल माझ्या कलेत यावा म्हणून मी प्रयत्नशील असतो, सुदैवानं त्यात यशस्वीही होतो. बारीक नक्षीकाम आणि आकारांची सुंदर गुंफण हे इतरांच्या दृष्टीतून जाणवणारं माझ्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे", असं वारली कलाकार राजेश मोर आवर्जून सांगतो. मोरांची चित्रे ही तर त्याची खासियत आहे. त्याने अनेकरंगी वारली चित्रे रेखाटण्याचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.


   डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या दुर्गम पाड्यावर १९८२ साली राजेश लक्ष्मण मोर याचा जन्म झाला. वडील भगताचे काम करायचे. आई बानीबाई झोपडीच्या भिंती वारली चित्रांनी सजवायची. तिला व वडिलांना लग्नघरी चौक लिहायला बोलवायचे. छोटा राजेश आईला मदत करता करता वारली चित्रशैली शिकला. जवळच्या कासा गावातील आश्रमशाळेत राहून त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तो पाचवीत असल्यापासूनच सुवासिनींबरोबर लग्नचौक लिहायला जात असे. यथावकाश डावखुरा असणारा राजेश सरावाने वारली कलेत पारंगत झाला. २००० साली त्याला पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्याकडे वारली कला शिकण्याची संधी मिळाली. तेथे त्याच्यातील कलाकाराच्या पैलूंना आकार मिळाला. मशे काकांमुळे वारली चित्रातील आकर्षक रचना, आकारांची सुयोग्य मांडणी यांची जाण आल्याचे राजेश आवर्जून सांगतो. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पात नावनोंदणी केल्याने त्याला दिल्लीला जाता आले. २००३ साली दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरविण्यात आलेल्या लोककलेच्या प्रदर्शनात पहिल्यांदा त्याची चित्रे प्रदर्शित झाली. त्यामुळे त्याला आत्मविश्वास मिळाला. तेथून परतल्यावर त्याने वारली कलेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले व तो पूर्णवेळ कलाकार झाला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथे त्याची चित्रप्रदर्शने झाली. राजस्थानात जयपूर, गोव्यात पणजी व फोंडा, मध्य प्रदेशात भोपाळ व इंदूर तसेच हैदराबाद, बंगळुरू येथे झालेल्या राजेशच्या वारली चित्रप्रदर्शनांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


   राजेश म्हणतो, "प्रदर्शनात लोकांच्या प्रतिक्रिया थेट समजतात. त्यांच्या आवडीनिवडींचा  अंदाज येतो. प्रत्यक्ष संवाद साधता येतो. रसिक ग्राहक चर्चा करून त्यांची आवड सांगतात. त्यामुळे नवे विषय - आशय चित्रात मांडता येतात. मात्र मी माझ्या कलेशी, परंपरेशी, संस्कृतीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. कधीही प्रतारणा करीत नाही. लोकांनी काहीही मागणी केली तरी मनाला पटतील अशीच चित्रे रंगवतो व ती रसिकांना आवडतात. त्यामुळेच कलेची शुद्धता राखली जाते. वारली चित्रशैली ही लोककला असून आमची परंपरा, संस्कृती, चालीरीती,  निसर्गपूरक जीवनशैली यांचे ते सार आहे." राजेशची आई सुईणीचेही काम करते. अलीकडे वैद्यकीय सुविधा दुर्गम आदिवासी भागात पोहोचल्याने दवाखान्यात प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र असे असले तरी आजही गर्भार महिलांना बानीबाईचा आधार वाटतो. ती योग्य सल्ला देऊन महिलांची काळजी घेते. पतीच्या माघारी ती धवलेरीचेही काम करते. तिला वारली जमातीतील लग्ने लावण्याचा अधिकार व मान आहे. मी आज जो काही आहे तो आईच्याच संस्कारांमुळे, अशी भावनाही राजेश व्यक्त करतो. त्याची पत्नी रसुला हिच्या वारली चित्रांना मुंबईत खूप मागणी आहे. मोठी सायंजली व प्रणेश या मुलाला कलेची फारशी आवड नाही. पण ८ वर्षांचा छोटा रसिक वडिलांना चित्र रेखाटताना मदत करतो. त्याच्या रूपाने नवी पिढी घडते आहे.

                                             -संजय देवधर

  (वरिष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ञ)

**********************************
पाश्चात्य संस्कृतीशी वारली चित्रशैलीचा समन्वय !


   २०१७ साली राजेशला फ्रान्सच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. पॅरिस, लिऑ या शहरांमध्ये एक महिना राहून त्याने स्वतःच्या चित्रांच्या प्रदर्शनाबरोबरच वारली कलेचे प्रशिक्षण देखील दिले. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण त्याच्या कार्यशाळेत सहभागी झाले. फ्रेंच लोकांनी त्यांची संस्कृती, शहरी वातावरण, आयफेल टॉवर यांची चित्रे वारली चित्रशैलीत रेखाटली. त्यामुळे पाश्चात्य संस्कृती व वारली कलेचा समन्वय साधला गेला. लिऑ शहरातील एका सांस्कृतिक केंद्राच्या पाच मजली इमारतीवर जव्हारच्या शांताराम तुंबडा याने भव्य वारली चित्र रंगवले आहे. ते बघून अभिमानाने ऊर भरुन आला, अशी भावना तो व्यक्त करतो. २०१८ साली राजेश महिनाभर जपानला गेला. टोक्यो व इनोव्हासिरो या शहरात त्याचा मुक्काम होता. तेथील एक अनुभव खूपच आगळावेगळा होता. एका ८० वर्षांच्या जपानी आजीबाईंनी राजेशला त्यांच्या परंपरेची माहिती दिली. गौतम बुद्धांच्या गोष्टी सांगितल्या. तिच्या खेड्याचा इतिहास सांगताना तिने खडकावर राहाणाऱ्या बेडकाची व मुले, शेतकरी यांची कहाणी सांगितली. वारली चित्रांना देखील अनेकदा पारंपरिक कथेचा संदर्भ असतो. तोच प्रयोग करून तेथील एका शाळेच्या भिंतीवर बेडकाची कथा त्याने वारली चित्रशैलीत रेखाटून जपानी रसिकांची वाहवा मिळवली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।