'गोष्टीपलीकडचे महाभारत' सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल - दीपक केसरकरमहाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे - प्रा. डॉ.खांडगे

'गोष्टीपलीकडचे महाभारत' सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल - दीपक केसरकर
महाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे - प्रा. डॉ.खांडगे

      मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'गोष्टीपलीकडचे महाभारत' हा स्वाती काळे लिखित ग्रंथ म्हणजे महाभारतातील विविध प्रसंग पात्रे यांची मौलिक मांडणी आहे. हे पुस्तक मराठी भाषेच्या समृद्धीत निश्चितच भर टाकेल. वस्तू व सेवा कर या विभागांमध्ये सहआयुक्त पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना स्वाती काळे यांनी आपल्या चित्रमय शैलीतून महाभारतातील विविध घटनांचे आणि पात्रांचे जे चिंतन मांडले आहे, ते पथदर्शी ठरेल. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' च्या पुढच्या भागाची तयारी स्वाती काळे यांनी करावी, असे मत मुंबईचे पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांनी रवींद्र नाट्य मंदिर मधील मिनी थिएटर मध्ये  व्यक्त केली. स्वाती काळे यांच्या 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या ग्रंथाचे प्रकाशन मंत्री महोदयांच्या हस्ते झाले.

       प्रकाशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाला दिलेल्या शुभेच्छांचे वाचन झाले. तसेच उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन झाले. सरकारी नोकरीत राहूनही महाभारतासारख्या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी लेखिकेचे कौतुक केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे संशोधक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे होते. भरारी प्रकाशन तर्फे या ग्रंथाचे प्रकाशन झाले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लोककला आणि लोक साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. प्राची मोघे, ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक आणि महाभारताचे भाष्यकार अशोक समेळ, भरारी प्रकाशनाच्या प्रमुख लता गुठे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई विभागाच्या अध्यक्ष नमिता कीर तसेच वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त राजीव मित्तल या कार्यक्रमाला उपस्थित होते. 


         संस्कृत मधील व्यासांचे महाभारत हा महाभारताचा एक पैलू आहे, पण हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात अनेक लोक बोलीतील लोकमहाभारत आपणास आढळते. हा आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. स्वाती काळे यांच्या 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या ग्रंथात कल्पित आणि अकल्पिताचा खेळ आहे. मानवी भावभावनांचा कल्लोळ आहे. महाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे. हा मागोवा घेताना कल्पबंध आणि आदीबंध यांचा सुरेख संगम स्वाती काळे यांच्या चिंतनशील प्रतिभेतून साकार झाला आहे असे मत प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केले. महाभारत म्हणजे केवळ सुडाचा प्रवास या धारणेला छेद देणारा हा ग्रंथ असून यातील सर्वच प्रकरणे चिंतनाला वाव देणारी आहेत. स्वाती काळे यांनी यापुढचा 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चा भाग शब्दबद्ध करून महाभारताची रहस्य उलगडून दाखवावीत असे मत ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक आणि महाभारताचे भाष्यकार अशोक समेळ यांनी व्यक्त केले. अश्वत्थाम्यासारखेच महाभारतातील भीष्माचार्यांचे चरित्र अद्वितीय असून, त्याने आपण झपाटून गेलो असल्याचे समेळ यांनी सांगितले. स्वाती काळे यांच्या 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या ग्रंथात अनेक पौराणिक पात्रांचे जणू अभिलेखनच झालेले आहे, असे मत प्रा. डॉ. प्राची मोघे यांनी व्यक्त केले. 
        इरावती कर्वे, दुर्गा भागवत अशा विदुषींनी रामायण महाभारताला वेगळा आयाम आपल्या चिंतनातून आणि लेखनातून दिला. दुर्गा भागवत यांचेच कार्य स्वाती काळे यांनी या ग्रंथाद्वारे पुढे नेले असून महाभारताचा संबंध हा लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोकजीवनाशी आहे. कारण व्यासांची प्रतिभा ही कालातीत होती आणि आहे. काळाची मर्यादा ओलांडून व्यासांची प्रतिभा ही पौराणिक आहे तशीच ती समकालीनही आहे. हे समकालीनत्व अतिशय भावगर्भतेने स्वाती काळे यांनी शब्दबद्ध केले आहे. ते लालीत्य पूर्ण जरी असले तरी त्याची बैठक संशोधनाची असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. 
        पद्मविभूषण तिजन बाई यांना छत्तीसगड मध्ये मी भेटायला गेले या भेटीत त्यांच्याकडून पांडवांनी या कथा गीताचे गायन ऐकताना मला महाभारतातील स्त्रियांच्या प्रतिमेचा आणि प्रतिमेचा ध्यास लागला आणि पंडवानीतून या ग्रंथाचे बीज पेरले गेले असे मत ग्रंथाच्या लेखिका स्वाती काळे यांनी व्यक्त केले. श्रीमती नमिता कीर अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई यांनी श्रीमती स्वाती काळे यांनी रेखाटलेल्या स्त्री व्यक्तिरेखांचे चित्रण अतिशय वास्तववादी व अद्भुत असल्याचे प्रतिपादन केले. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव मित्तल हे देखील उपस्थित होते. 
       ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या वेळी छत्तीसगडच्या प्रख्यात पंडवानी गायिका संप्रिया पूजा निषाद यांचे पंडवानी गायन तसेच डॉक्टर वृषाली दाबके यांच्या संचाचे कथ्थक नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन सह्याद्री वाहिनीवरील प्रख्यात निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. प्रसिद्ध अभिनेता मंगेश सातपुते यांनी 'गोष्टीपलीकडचे महाभारत' च्या एका भागाचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम संयोजन व समन्वयन कामाक्षी क्रिएटिव्ह, मुंबईच्या राकेश तळगावकर आणि सहकार्‍यांनी केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।