नात्यांची परिभाषा आणि भावनांचा प्रवास उलगडणारा "लाईफकोच" म्हणजे "दो गुब्बारे" !

नात्यांची परिभाषा आणि भावनांचा प्रवास उलगडणारा "लाईफकोच" म्हणजे "दो गुब्बारे" ! 

यशवंतराव चव्हाण सेंटरमुळे युवा आणि ज्येष्ठ तसेच कलाकार आणि प्रेक्षक यांची ह्रदयस्पर्शी भेट !!

न्यूज मसाला वृत्तसेवा,
          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कधी कधी काही नाती आपली असूनही दुरावतात, सुखी परिवार हा फक्त भिंतीवर टांगलेल्या छायाचित्रामध्येच दिसतो. पण प्रत्यक्षात त्याची चौकट खिळखिळी झालेली असते, इतकी की जराशा धक्क्याने ती कोसळून पडेल आणि आत असलेल्या माणसांचं नातं तुटून जाईल म्हणून ती जीवापाड जपावी आणि कुणालाही कळू नये हाच प्रयत्न असतो. ही धडपड वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनातून "दोन गुब्बारे" वेबसिरीजच्या स्क्रिनिंग प्रसंगी पाहायला मिळाली. 

             काही नाती नव्याने आपल्याशी जुळवून घेतात. वेगळी भाषा, प्रांत, संस्कृती यासोबतच युवा व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही पिढ्यांचा एकमेकांसोबत होणारा सुखद संवाद हा दुरावल्यामुळे दुखावलेल्या नात्यांवर मायेची फुंकर घालणारा होता. यामुळे नव्याने सुरू झालेल्या या नात्यासोबत पुन्हा आयुष्य उमेदीने जगायला इच्छा होते. हे डॉ. मोहन आगाशे आणि सिद्धार्थ शॉ यांच्या अभिनयातून अधोरेखित होते. 
             यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने पिढीपिढीतील स्नेहसंबंध या उपक्रमांतर्गत "दो गुब्बारे" या वेब सिरीजचे स्क्रिनिंग यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात पार पडले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक व युवा यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्क्रिनिंग झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जमलेल्या दोन्ही पिढ्यांसोबत चर्चा केली. 
        या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शक वरुण नार्वेकर, लेखिका कल्याणी पंडित, अभिनेते सिद्धार्थ शॉ, जिओ सिनेमाचे प्रमुख व्योम, रणजित गुगळे, सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले, कोषाध्यक्ष हेमंत टकले, कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, संयोजक विजय कान्हेकर, युवा विभाग प्रमुख संतोष मेकाले आणि आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग प्रमुख दिपीका शेरखाने आदी मान्यवर उपस्थित होते.
        जिओ सिनेमाची बहुप्रतिक्षित वेब मालिका "दो गुब्बारे" २० जुलै पासून प्रदर्शित झाली आहे. मराठी चित्रपट "मुरांबा" फेम वरुण नार्वेकर हिंदी ओटीटी स्पेसमध्ये दिग्दर्शनात पदार्पण करत आहे आणि त्यांनी कल्याणी पंडित यांच्यासोबत पटकथा लिहिली आहे. डॉ. मोहन आगाशे, सिद्धार्थ शॉ, मल्हार राठोड, मानसी पारेख आणि हेमांगी कवी आदी कलाकारांसह "दो गुब्‍बारे"ने कथेतले बारकावे आणि आपला करिष्मा जोडून, ​​अपवादात्मक कामगिरीसह आपली पात्रे जिवंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 
          ज्याप्रमाणे अनोळखी शहरात येऊन टिकून राहणे, त्या नवीन ठिकाणी आणि वातावरणात येणारा प्रत्येक क्षण अनिश्चिततेने भरलेला असतो. कुठे राहाणार, कसा राहाणार, काय खाणार, ऑफिस कसं असेल, घरमालक कसा असेल, हे सगळे प्रश्न मनात तरळत राहतात. घर सोडून दुसऱ्या ठिकाणी कामाला आल्यावर पाल्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते. त्याचप्रमाणे, जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती असते तेव्हा त्यांच्या एकाकीपणाचा अंदाज लावणे प्रत्येकाच्या कुवतीचे नसते. या धावपळीच्या वातावरणात ते स्वतःला पूर्णपणे एकटं समजत असतात. आता जरा कल्पना करा की, असे दोन अनोळखी लोक एकाच छताखाली राहू लागले तर दोघांच्याही बुडण्याला काठीचा आधार मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दो गुब्बारे या वेब मालिकेची कथा अशीच आहे.
         जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांनी सादर केलेल्या, आयुष्याच्या भागाची, एक हृदयस्पर्शी आनंददायी यात्रा म्हणून गणना केली जात आहे, जी प्रेमळ पात्रे आणि आनंदी प्रसंगांनी भरलेली आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल.
         या मालिकेत रोहितचा इंदूर ते पुणे असा प्रवास दाखवण्यात आला आहे, जिथे तो पेइंग गेस्ट म्हणून येतो. आजोबांसारखे व्यक्तिमत्व ज्यांनी त्यांच्या युवावस्थेत अशीच स्थित्यंतरे अनुभवली आहेत, ते रोहितला मार्गदर्शन करतात, त्याच्या आयुष्याचा प्रवास सुलभ आणि यशस्वी करतात. दोघेही त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आव्हानांशी झुंजत असताना, आजोबांना रोहितमध्ये सांत्वन आणि सहचर्य मिळते आणि त्यांचे नवीन जीवन एकत्र सुरू झाल्यावर त्यांचे बंध अधिक दृढ होतात. त्यांच्या संभाषणात पुणेरी व्यंग आणि विनोदी इंदोरी उत्तरे आहेत, ज्यामुळे कथेला आनंददायी स्पर्श होतो.
         तथापि, ही जोडी त्यांच्या नवीन लयीत स्थिरावत असतानाच, एकामागून एक अनपेक्षित सत्य समोर येत राहातात. आजोबांनी दीर्घकाळ लपविलेल्या रहस्याचा रोहितच्या मनावर खोलवर परिणाम होतो पण, त्यातूनही त्या दोघांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतो. वेब मालिका आनंद, प्रेम आणि कौटुंबिक गतिशीलतेच्या कथानकावर पिढ्यानपिढ्या मधला सेतू बनण्याचा प्रयत्न करते.  
           पुण्यातून दुसर्‍या शहरात गेलेल्या आपल्या मित्राला रोहित जेव्हा सांगतो माझ्यासारखेच एक आजोबा तूही शोध, आयुष्य खूप सोपं होऊन जाईल. तिथेच वेब मालिकेचं यश अधोरेखित होतं. ही गोंडस वेब मालिका सर्व किशोरवयीन मुलांसाठी त्याचबरोबर प्रौढांसाठी देखील आहे. विशेषत: पुण्यातील किंवा पुण्यात स्थायिक झालेल्यांसाठी. पुन्हा एकदा मोहन आगाशेंनी खूप छान काम केलं आहे. त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. सिद्धार्थने सुद्धा त्यांना खूप छान साथ दिली आहे. हेमांगी कवीनेही राधाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. प्रेक्षकांना आशा आहे की लवकरच मालिकेचा दुसरा भागही प्रदर्शित होईल.  
         या वेब मालिकेसाठी प्रतिभाताई शरद पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्यासह चित्रपट उद्योगातील आणि समाजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना वाळिंजकर, सुकेशनी मर्चंडे, विकास, अशोक जाधव, प्रवीण, जयेश गुजराथी, अतुल तांडेल, मीनल सावंत, विप्लव वागदे आणि मनिषा खिल्लारे यांनी परीश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.