डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे ! स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये !

डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे ! 
स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये !


न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक

       खासदार भारतीताई पवार यांचा दोन लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत प्रवेश झाला. लोकसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना मराठीतून केलेले भाषण आणि खासदार प्रीतम मुंढे व रक्षा खडसे यांना आलेले हसू याचा व्हायरल झालेला  व्हिडिओ काय दर्शवित होता हे प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळे भाव निर्माण करुन गेला. मात्र नासिक जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मिळालेला मान उल्लेखनीयच म्हणावा लागेल. शिवाय राज्यमंत्री म्हणून शपथ घेणे यासाठी मुंढे आणि खडसे यांचे हसणे, दोन लाखांचे मताधिक्य, पहिल्या महिला खासदार, पाणीदार नेते ए. टी. पवार (दादासाहेब) यांच्या स्नुषा, जिल्हा परिषद सदस्य या कारकिर्दीचा तसेच उच्चशिक्षित यापैकी कशाचा निकष असेल ? काहीही असो, राज्यमंत्री होण्याचा मान प्राप्त होणे अभिनंदनीयच. यामुळे जिल्ह्यातील समस्त हितचिंतकांना आनंद तर होणारच आणि अपेक्षाही वाढणार यांत शंका नाही. या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो, इथेच थोडी गफलत झाली, नेमलेल्या कथित स्विय सहाय्यकानेच उप स्विय सहाय्यक नेमला अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. यांवर अनेक स्तरांवर विविध प्रकारच्या चर्चेचे फड रंगले. 
       दिंडोरी तालुक्यातील पावसाची मनमानी आणि कांदा उत्पादक यांची झालेली अवस्था यांवर लोकसभेत छोटेखानी का होईना वाचून केलेले तत्कालीन भाषण, किमान २०००/- रुपयांचा भाव मिळावा, कांदा उत्पादकांनी लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम माफ करण्याची मागणी व आज केंद्र सरकारने कांदा  निर्यातीवर लागू केलेले ४०% शुल्क. त्यावर तोडगा काढण्यापर्यंत च्या प्रवासादरम्यान "केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री" पद हरविले आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो. 
       नासिक जिल्ह्यातील बागलाण व मालेगाव हे दोन तालुके धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत, तेथून २०१४ व १९ ला  भारतीताईं प्रमाणेच उच्चशिक्षित डॉ. सुभाष भामरे निवडून आलेत. त्यांनाही २०१४-१९ कालावधीत संरक्षण राज्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. त्यांच्या कार्यकाळात संरक्षण क्षेत्राशी निगडित कोणताही प्रकल्प धुळे -नासिक जिल्ह्यासाठी आणता आला नाही. नशीब बलवत्तर म्हणून पुन्हा २०१९ ला निवडून आलेत. त्यांचेही कथित डॉ. स्वीय सहाय्यक यांच्या बाबतीत चर्चांना उधाण आले होते, आजही अधूनमधून होत असते याचा भविष्यात राजकीय भवितव्यावर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा. तद्वतच भारतीताईंना ही जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रकल्प आणता आलेला नाही हे प्रकर्षाने जाणवते. याउलट शिवसेनेचे (सध्या शिंदें गट) "फक्त" खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांना जनसामान्यांच्या लेखी "कार्यसम्राट" उपाधी मिळावी, त्यांनी जनसामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात केलेल्या काही कामांमुळेच हे कौतुकास्पद म्हणावे लागेल. प्रगतीपुस्तक तर सर्वांचेच तयार होते, "खर्चाची आकडेवारी मोठी म्हणजे प्रगती हा निकष भाजपातील वरिष्ठांना मान्य असेल हा मोठा गैरसमजच" अनेकांना लक्षात येत नाही ! 
        २०२४ च्या निवडणूकांची तयारी आजी-माजी नेत्यांसह अनेक इच्छुकांकडून करण्यास सुरुवात झाली आहे, विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत याबाबत वेळोवेळी माध्यमांमधून प्रसिद्धी दिली जात असते, अशातच साडेचार वर्षे ठराविक पत्रकारांच्या सान्निध्यात राहून अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याचा साक्षात्कार झाल्याने अचानक सतत हितचिंतकाच्या भूमिकेतील "दुर्लक्षित" पत्रकारांसाठी "स्नेहभोजनाचं" निमंत्रण ! अनाकलनीय तथा ठळकपणे भविष्यातील राजकीय भवितव्याची काळजी दर्शविते असेच म्हणावे लागेल. उर्वरित  सहा महिने हा कालावधी कमी नाही, असलेल्या पदाचा सदुपयोग करून "तोच रस्ता तेच डांबरीकरण" न करता जनसामान्यांच्या भावनांचा विचार करून सर्वसमावेशक, विकासात्मक, नजरेत येतील अशा प्रकल्पांना सत्यात उतरवा, "स्नेहभोजनाच्या पंक्ती" रोजच उठविता येतील अन्यथा "बाजार उठायची" वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.