सृजनोत्सवी चित्रसृष्टी ! शिशिरात सुस्त झालेली, गारठलेली सारी सृष्टी वसंताच्या स्पर्शाने रसरशीत होते. चैतन्याने बहरुन जाते. वसंतोत्सवाच्या या धुंदीत,,,,,,,,,,,,. २९ मार्च पुपुल जयकर यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने,,,,,,,,,,,. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
सृजनोत्सवी चित्रसृष्टी !

   फाल्गुन पौर्णिमेनंतर, म्हणजे होळीपौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवसापासूनच वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. वसंतोत्सव हा निसर्गाप्रती तसंच समष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सृजन सोहळा ! निसर्गात रममाण झालेल्या आदिवासी वारली जमातीच्या चित्रशैलीत बहारदार निसर्गाच्या विविधतेचे नेहमीच दर्शन होते. त्यांच्या कलानिर्मितीला वसंतऋतू पोषक ठरतो. म्हणूनच वारल्यांच्या चित्र, संगीत आणि नृत्यामध्ये निसर्ग विविध मोहक रूपं घेऊन सामोरा येतो.

   शिशिरात सुस्त झालेली, गारठलेली सारी सृष्टी वसंताच्या स्पर्शाने रसरशीत होते. चैतन्याने बहरुन जाते. वसंतोत्सवाच्या या धुंदीत सृष्टीशी एकरुप होण्याची प्रेरणा आदिम आहे. वसंतऋतू येताना आपल्याबरोबर नवसृजनाचे सप्तरंग लेवून येतो. सर्वत्र विविधरंगी उधळण होते. सृष्टीतील प्रत्येक सूक्ष्म बदल टिपत असताना, आपण या सृष्टीचाच एक भाग आहोत हे भान आदिवासी बांधवांना जन्मजात असते. कारण ते निसर्गाच्या सान्निध्यात राहून सृष्टीतील प्रत्येक घटकाशी  एकरूप झालेले असतात. मात्र निसर्गातील विविध प्रतिमा ते केवळ पांढऱ्या रंगात रंगवतात. अर्थात हे 'एकरंगी' बंधन त्यांनी स्वखुशीने स्वीकारलेले आहे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी अडसर न ठरता पूरक ठरते. 

गेल्या ११०० वर्षांपासून वारली जमात अव्याहतपणे सारवलेल्या झोपडीच्या भिंतींवर किंवा गेरूच्या गडद पार्श्वभूमीवर तांदळाच्या पिठाने पांढरीशुभ्र चित्रसृष्टी साकारते आहे. खरंतर विविध रंग हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. निसर्गात विविधरंगी उधळण सातत्याने होतच असते. प्रत्येक रंगाचे विशिष्ट भावना प्रकट करण्याचे स्वतःचे एक सामर्थ्य असते. रंगांमध्ये विशिष्ट अशी सुप्त शक्ती अंतर्भूत असतेच. मात्र साऱ्या रंगांची अशी शक्ती जणु निष्प्रभ  करुन चितारलेली; दृष्टीला शुभ्र-निरभ्र असे आवाहन करणारी पांढरी रंगछटा प्रकर्षाने प्रसन्नता, शालीनता व्यक्त करते. म्हणूनच वारली चित्रांमधला चैतन्याचा स्त्रोत अंतरंग व्यापून उरतो. केवळ पांढरा रंग, रेषा, आकार आणि अवकाश विभाजन यांच्या संयोजनातून वारली रचनाचित्रे तयार होतात.नवनवोन्मेष त्यातून प्रत्ययाला येतात.

   वारली चित्रशैली बघणाऱ्यांंच्या मनात सकारात्मक ऊर्जा जागवते. आदिवासी वारली जमात निसर्गासोबत जगताना विविध संसाधनांचा अगदी मर्यादित उपयोग करते. त्यामागे सृष्टीतील सर्व घटकांविषयी आदरभाव असतो. निसर्गरक्षण आणि संवर्धन हा त्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. यातून आपण काही वेगळे करतो आहोत, अशी त्यांची भावनाच नसते. "जमीन माझ्या पोरांसाठी व झाडे नातवंडांसाठी" हा त्यांचा विचार बरंच काही सांगून जातो. तात्कालिक गरजेपुरत्या झाडांच्या फांद्या तोडल्या तरी वारली लोक मुळापासून झाडं कधीच उपटत नाहीत. शाश्वत जीवनमूल्ये त्यांनी अंगिकारली आहेत. आदिवासी बांधव आजच्या क्षणासाठी व उद्याच्या पिढ्यांसाठी निसर्ग, पर्यावरण संरक्षण करण्याची लढाई प्राणपणाने लढताना दिसतात. आपण तथाकथित पुढारलेले शहरी लोक मात्र स्वार्थासाठी निसर्ग ओरबाडून साधनसंपत्तीचा बेछूटपणे नाश करतो. याविषयी अंतर्मुख होऊन वसंतोत्सवात आत्मचिंतन केले पाहिजे. शहरी तेव्हढे पुढारलेले, सुशिक्षित आणि आदिवासी मात्र निरक्षर, अडाणी, मागासलेले अशी सोयीस्कर विभागणी अन्यायकारक आहे! शहरीकरणाच्या प्रभावाखाली आदिवासींचे परिवर्तन होतेय. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या धोरणामधून एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच होतोय. त्यांच्या पारंपरिक जगण्याकडे आपल्या 'नागर' नजरेतून बघून चालणार नाही. सर्जन आणि कला यांच्या सुंदर, कलात्मक समन्वयातूनच मानवी जीवनसंस्कृती समृद्ध होते हे विसरून चालणार नाही, हेच मौलिक सूत्र  वारली चित्रसृष्टी शतकानुशतके मूकपणे अधोरेखित करते आहे.
                                     -संजय देवधर   
********************************** 
लोककलांच्या विकासात मोलाचे योगदान ...

   मुंबईतील 'वीव्हर्स सर्व्हिस सेंटर' आणि दिल्ली येथील 'हँडलूम व हँडीक्राफ्ट कमिशन' या दोन्ही संस्थांंच्या श्रीमती पुपुल जयकर सल्लागार, अध्यक्षा होत्या. त्यांनीच प्रोत्साहन व प्रेरणा दिल्याने भास्कर कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली व बिहारमधील मधुबनी चित्रकला प्रकाशात आणल्या. पुपुल जयकर यांचा गेल्या महिन्यात २९ मार्च रोजी स्मृतिदिन होता, त्यानिमित्ताने हे स्मरण औचित्यपूर्ण ठरावे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इटावा येथे ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील अलाहाबाद येथे आय.पी.एस.अधिकारी होते. त्यामुळे पुपुल यांचे बरेचसे बालपण अलाहाबाद येथे गेले. त्यांना आदिवासी संस्कृती, कला याविषयी कुतूहल, आस्था होती. सत्तरच्या दशकात मधुबनी व वारली कला रसिकांपर्यंत पोहोचल्या. त्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी  त्यांनी अथक परिश्रम घेतले. भारतीय लोककलांंना जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठीही  प्रयत्न केले. मात्र दरम्यान आदिवासींची कला - संस्कृती परदेशात केवळ देखाव्यासाठी वापरली जाते ; कलाकृतींच्या विक्रीत दलाली होते व  आदिवासी कला भ्रष्ट केली जाते ; असेही आरोप त्यांच्यावर झाले ! मात्र त्यावर मात करून त्यांनी जिद्दीने लोककलांच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पुपुल जयकर यांनी इंग्रजीत विपुल लेखन करून अनेक पुस्तके लिहिली. भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या हीच त्यांची खरी ओळख ठरली. तत्पूर्वी १९३० साली त्यांचे नेहरू घराण्याशी स्नेहबंध जुळले. स्व.पंतप्रधान इंदिरा गांधींशी त्यांची गाढ मैत्री झाली. ती अखेरपर्यंत टिकून राहिली. १९७६ साली दिल्लीच्या 'अपना उत्सवा 'त  वारली चित्रकार जिव्या सोमा मशे व चार वारली चित्रकर्तीना त्यांनी सामील करून घेतले. या चमूचे नेतृत्व भास्कर कुलकर्णी यांनी केले. त्यामुळे वारली चित्रशैली लोकांपर्यंत पोहोचली. बिहारमध्ये पडलेल्या दुष्काळातील पुनर्वसन - प्रबोधन कार्यात पुपुल यांच्या संकल्पनेतून मधुबनी चित्रकलेचा खूप उपयोग झाला.२९ मार्च १९९७ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित