' ट्रेंडिंग ' वारलीला ' ब्रँडिंग ' ची गरज ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!

NEWS MASALA SERVICES,

NASHIK, 7387333801
**********************************

' ट्रेंडिंग ' वारलीला ' ब्रँडिंग ' ची गरज !


             शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या आदिवासी वारली चित्रकलेला अलीकडे भरपूर मागणी वाढली आहे. पूर्वी आदिवासी पाड्यांवरील झोपड्यांच्या भिंतीपुरत्या मर्यादित  स्वरूपातील या कलेने, आता मोठेच फॅशनेबल रूप धारण केले आहे. वारली चित्रे विविध वस्त्रप्रावरणांवर अधिराज्य गाजवताना दिसतात. सध्या वारली प्रिंट असलेले ड्रेस मटेरियल, साड्या, कुर्ती, लेगिंग्ज तसेच लहान मुलांचे, तरुणांचे टी शर्टस् मार्केटमध्ये हिट आहेत. याशिवाय बेडशीट्स, स्कार्फ, पडदे आणि हँडबॅग्स, पर्सेस, फोल्डर्स, पाऊच देखील वारली चित्रांनी सजतात. मागणी तसा पुरवठा या न्यायाने बाजारपेठेत वारली डिझाईन्सचा मोठा ट्रेंड  निर्माण झाला आहे. मात्र बऱ्याचदा अशी वारली डिझाईन्स जाणकार आणि मूळ शैलीशी बांधिलकी असणाऱ्या कलाकारांकडून करून न घेतल्याने, वारलीच्या नावाखाली काहीही खपवले जाते. कलेला येणारे हे विकृत स्वरूप मारक ठरते. रेखाटनाचे असले भलतेच 'फ्युजन'  केवळ  'कन्फ्युजन' निर्माण करते! म्हणूनच यासाठी मूळ विशुद्ध कलेचे योग्य 'ब्रँडिंग' करणे आवश्यक झाले आहे.


    सध्या बाजारात वारली पेंटिंग्स व डिझाईन्स असलेल्या साड्यांना चोखंदळ, कलाप्रेमी महिलांकडून भरपूर मागणी आहे. साडीच्या काठावर मानवी आकृत्या तसेच पदरावर मोर, तारपा नृत्य ही चित्रे खुलून दिसतात. कॉटन, रेशीम, ज्यूट व शिफॉन तसेच इतरही कापडांवरील वैशिष्ट्यपूर्ण वारली चित्रांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढतो आहे. हँड एम्ब्रॉयडरी केलेल्या वारली चित्रांच्या साड्या फॅशनमध्ये 'इन' आहेत. फक्त साड्याच नव्हे, तर वारली चित्रांनी ब्लाऊज देखील सजलेले दिसतात. ओढण्यांवरही वारली डिझाईन्सनी ताबा मिळवला आहे. गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगातील वारली चित्रे छान दिसतातच; त्याबरोबरच विविध रंगसंगती साधूनही वेधक चित्रे रंगवली जातात. आदिवासी युवा वारली चित्रकारांना अलीकडे हे उत्पन्नाचे उत्तम साधन झाले आहे. ते ऑर्डरनुसार साडीवर वारली पेंटिंग करून देतात. निसर्गप्रेमी ग्राहक, तसेच ज्यांना हटके असे आगळेवेगळे काही आवडते अशांना चादरी, बेडशीट्स, पडदे, पिलो कव्हर्स यांवरही वारली चित्रे हवी असतात. समृद्ध अशा वारली जीवनशैलीतील वेगवेगळ्या थीम्सवर आधारित रेखाटन सुरेख दिसते. मात्र राजस्थानी ब्लॉक प्रिंटिंग करून केलेल्या जयपूर चादरींवरील वारली चित्रे काहीशी बटबटीत दिसतात. कलेतील सौंदर्य त्यात हरवलेले जाणवते. अर्थातच अशी कारागिरी टाळायला पाहिजे.


   कला ही माणसाच्या आयुष्यात नाविन्यपूर्ण रंग भरते. माणसाचे जगणे अधिक रुचिपूर्ण व आनंददायी होण्यासाठी, कलेचे सादरीकरण व कलावस्तूंचा मनःपूर्वक आस्वाद या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक ठरतात. त्यातून समाज सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न होतो. कलासक्त असणे म्हणजे फक्त कलाकार असणे नाही!  कलेचा मनापासून आस्वाद घेता आला तरच ती कला आतपर्यंत झिरपत जाते. जगण्याचा नूर बदलते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचे प्रतिबिंब, पडसाद उमटतात. वारली चित्रशैलीने सर्वसामान्य माणसांमध्ये कलेविषयी आस्था, जागरूकता निर्माण करण्याचे काम अबोलपणे केले आहे. समाजात कलेविषयी साक्षरता वाढविण्यासाठीही वारली कलेचे मूकपणे प्रयत्न सुरु आहेत. संवेदनशील मनांना ही कला भावते. त्यामुळे कलास्वादाचा परीघ विस्तारतो. शहरी रसिकांच्या प्रोत्साहनामुळे आदिवासी कलाकारांचाही हुरूप वाढतो.  त्यातून अर्थार्जन होऊन नवनिर्माण करण्याची त्यांची उर्मी वाढते. आदिवासी परंपरा आणि शहरातील अत्याधुनिक 'स्मार्ट' जीवनशैली यांचा समन्वय त्यातून सहजतेने साधला जातो. हे सारेच अतिशय स्वागतार्ह आहे.

                                              -संजय देवधर

    ( ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ )

***********************************

टी कोस्टर ते ज्वेलरी बॉक्स...


    जव्हार, डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या आदिवासी भागात तरुण वारली कलाकार सतत नाविन्यपूर्ण कलाकृती तयार करण्यात मग्न असतात. लाकूड, प्लायवूड, एमडीएफ यांचा वापर करून दैनंदिन वापरातील उपयोगाच्या अनेक कलात्मक वस्तू ते बनवतात. त्यावर हाताने रंगविलेली वारली चित्रशैलीतील सुंदर चित्रे वस्तूच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. बऱ्याच ठिकाणी महिला बचतगटांनाही त्यातून उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. अल्पदरात मिळणाऱ्या या वस्तूंना शहरी कलाप्रेमी, उद्योगविश्व यांच्याकडून चांगली मागणी असते.कॉर्पोरेट क्षेत्रातून भेटवस्तू म्हणूनही या वस्तूंना प्रतिसाद मिळतो. अगदी सकाळी उठल्यावर चहा पिताना कप ठेवण्यासाठी लागणारे टी कोस्टर, कपबशा ठेवण्याचे ट्रे, टिश्यू पेपर बॉक्स, व्हिजिटिंग कार्ड बॉक्स, मोबाईल स्टँड, वेगवेगळ्या आकारांचे पेन्सिल स्टँड, स्पून स्टँड, नेम प्लेटस, की चेन्स यापासून थेट ज्वेलरी बॉक्स असे विविध प्रकार ते बनवतात. अल्पदरात त्यांची विक्री केली जाते. याशिवाय वॉल फ्रेम्स, वॉल हँगिंग्स, कॉफी पिण्याचे मग, मातीची भांडी, टाईल्स, छत्र्या असे नाना प्रकार सुशोभित केले जातात. मात्र पुरेशा मार्केटिंग, ब्रँडिंगच्या सुविधेअभावी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात त्यांना अडचणी येतात. या कलावस्तूंची अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन जागतिक बाजारपेठेत विक्री झाली, तर अनेकांना मोठ्या संधी उपलब्ध होतील. घरातील दिवाणखान्यात, डायनिंग टेबलवर अशी एखादी जरी दैनंदिन उपयोगाची 

कलात्मक वस्तू असेल तर समाधान मिळतेच शिवाय तुमच्या सौंदर्यदृष्टीला इतरांकडूनही नक्कीच दाद दिली जाते. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !