निरामय वैश्विक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद उपयुक्त - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801.




निरामय वैश्विक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद उपयुक्त


- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत


    निरामय स्वास्थ ही संकल्पना आयुर्वेदाने फार पूर्वीपासून मांडली. आता आयुर्वेद उपचार पद्धत वैश्विक ठरू लागली आहे. केवळ 'इलनेस' दूर करणे नव्हे; तर 'वेलनेस' टिकवून ठेवणे हा आयुर्वेदाचा मूळ पाया आहे. सारे जग त्याच्याकडे आशेने बघते आहे. आयुर्वेदाने इतर पॅथींना एकत्र जोडून समन्वयाची भूमिका पेलावी. 'आयुर्वेद व्यासपीठ ' च्या माध्यमातून अग्रेसर राहून निरामय विश्वासाठी आयुर्वेद चिकित्सा रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या आशयाचे प्रतिपादन केले.


    नाशिकमध्ये  बुधवारी ( दि.१४ जुलै )आयुर्वेद व्यासपीठच्या  'चरक सदन' या वास्तूचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. ऑनलाईन पद्धतीने कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य संकुलातील सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय चिकित्सा पध्दती आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी होते. त्यांच्या समवेत आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर, भूतपूर्व अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, केंद्रीय कार्याध्यक्ष वैद्य रजनी गोखले, उपाध्यक्ष वैद्य शिरीष पेंडसे, कार्यवाह वैद्य विलास जाधव तसेच रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, विभाग संघचालक कैलास साळुंके आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉ.भागवत म्हणाले की, देशभरात स्वस्त व प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी आयुर्वेदाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वच पॅथींनी एकत्र येऊन उपचार करण्याची आवश्यकता आहे. सर्वांचे नेतृत्व आयुर्वेदाने केले पाहिजे कारण आयुर्वेदाला प्राचीन ऋषीमुनींपासून प्रदीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे.ती सर्वमान्य उपचार पद्धती असून; आयुर्वेदिक औषधांनी रुग्णांना गुण येण्यासाठी वेळ लागतो हा गैरसमज समाजात दृढ झाला आहे. तो कसा चुकीचा आहे,हे समजावून दिले पाहिजे. सर्व पॅथींंनी आपला अहंकार बाजूला सारून एकत्रितपणे रुग्णसेवा करणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आदानप्रदान व्हायलाच हवे असे आग्रही आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.


   सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार स्वस्त, सुलभ होऊन सर्वसामान्य जनतेला उपलब्ध झाले पाहिजेत. कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक औषधे,काढे यांचा वापर करून अनेकांनी या संक्रमणावर मात केली. सर्व पॅथींनी श्रेष्ठत्वासाठी चालणारी आपापसातील स्पर्धा टाळून मानवकल्याणाचे ध्येय गाठावे, असेही ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी इसापनीतीतील एका कथेचा दाखलाही दिला. डॉ.भागवत पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळातील व्यापक परिवर्तनाने आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. प्राचीन ऋषीमुनींनी संशोधन करून आयुर्वेदिक ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवले. आपण मात्र अहंकारात गुरफटून आदानप्रदान करीत नाही. त्यामुळे शास्त्राची हानी होते. ज्ञान अनंत असून समग्र ज्ञानासाठी आयुर्वेदाचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. जग आता आपले अनुकरण करीत आहे. आयुर्वेदिक औषधांचे स्टँडरडायझेशन जसे महत्त्वाचे, तसेच व्यक्तिपरत्वे उपचार हे त्याचे  वैशिष्ट्य देखील लक्षणीय आहे. 'कस्टमाईज्ड' उपचार देण्याची लवचिकता आयुर्वेदात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील १३० कोटी जनतेपर्यंत सुलभ, स्वस्त उपचार पोहोचले तर सारा देश आरोग्यदृष्ट्या स्वस्थ होईल. अशी क्षमता आयुर्वेदात असून त्यासाठी व्रतस्थपणे प्रयत्न करावे लागतील. यासाठी नाव, झेंडा, पॅथी यांचे वाद न उभे करता आयुर्वेद भवनने समायोजनासाठी पुढाकार घ्यावा. त्याकरिता उभारण्यात आलेले सदन हे साध्य नसून साधन म्हणून त्याकडे पाहावे. जुने न विसरता नव्यातील चांगल्याचा स्वीकार व्हायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. आजच्या काळात जनता अधिक चिकित्सक, जिज्ञासू झालेली आहे. रूग्ण प्रत्येक पॅथीचा अनुभव घेतात. कोणत्याही उपचारपद्धतीत गुणवत्ता, दर्जा यांना महत्त्व आहे. रुग्णाला गुण येऊन तो पूर्णपणे बरा होणे त्यावरच अवलंबून असते. आयुर्वेदिक मात्रा व काही उपचार रुग्ण तातडीने बरा होण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे वास्तव देखील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. केवळ आजारी रुग्ण बरे करण्याचे ध्येय न बाळगता सर्वसामान्य जनतेला निरामय आरोग्य लाभावे यासाठी सर्व वैद्यांनी प्रयत्नशील राहावे, असेही डॉ.भागवत यांनी सांगितले.


   प्राचीन काळात घनदाट वने होती. त्यात मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती असत. त्यांच्यावर संशोधन करून आयुर्वेदिक औषधे तयार केली जायची. 'वना'पासून आता 'भवना' पर्यंत आपण पोहोचलो आहोत याकडे निर्देश करून डॉ. भागवत यांनी अन्य पॅथीच्या तज्ज्ञांनी आयुर्वेदाचे ज्ञान घ्यावे; तसेच आयुर्वेद वैद्यांनीही इतर सर्व पॅथींचा तुलनात्मक अभ्यास करावा. आयुर्वेद हे हजारो वर्षांचे सिद्ध शास्त्र असून त्याच्या वैश्विक  प्रचारासाठी तज्ज्ञ व्यक्तींसह प्रशिक्षक व विद्यार्थी यांनीही पुढाकार घ्यावा तसेच योगदान द्यावे असेही सांगितले. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात दर्जेदार औषधोपचाराची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेदाने भारतीयांना विज्ञानाधिष्ठित जीवनशैली शिकवली असेही त्यांनी स्पष्ट केले. वैद्य देवपुजारी म्हणाले की, संघटनात्मक कार्य महत्त्वाचे असून त्याचे दूरगामी व दीर्घकालीन परिणाम होत असतात. सरकार सहकार्य करते, त्यांचे धोरण ५ - १० वर्षे टिकते. वैद्य मात्र ३० वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा करतात. आम्ही आयुर्वेदाला मोठे करीत नाही तर त्याचे बोट धरून चालतो ही भावना  आपल्यात असली पाहिजे. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटन महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले. वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविकात 'चरक भवना' विषयी माहिती दिली. वैद्य स्वाती कर्वे यांनी धन्वंतरी गीत सादर केले. वैद्य मंदार भणगे यांनी वैद्यगीत गायले. पाहुण्यांचा परिचय संतोष नेवपूरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृत्युंजय शर्मा यांनी केले. कार्यवाह वैद्य विलास जाधव यांनी आभार मानले.

                                        -संजय देवधर

                         ( ज्येष्ठ पत्रकार, नाशिक )

**********************************
क्षणचित्रे...!


★ प्रवेशद्वारासमोर स्वागतासाठी भव्य रांगोळी रेखाटण्यात आली. त्यात आयुर्वेद भवनचे बोधचिन्ह रंगविण्यात आले. 

★ आयुर्वेद व्यासपीठतर्फे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना संस्कृत भाषेत लिहिलेले मानपत्र प्रदान करण्यात आले.

★  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सांघिक गीत आणि धन्वंतरी स्तवन करण्यात आले.

★ सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने डॉ. मोहन भागवत यांचे औक्षण केले.

★ भारतमाता पूजन करून डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

★ आयुर्वेद व्यासपीठ च्या कार्याचा अहवाल दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात आला.

★ अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सरकारवाडा पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला.


***********************************

पूर्वसूरींचे विस्मरण 


    नाशिकमध्ये १२५ वर्षांपूर्वी प्राणाचार्य कृष्णशास्त्री  देवधर यांनी आयुर्वेद रुजवला. त्यासाठी त्यांचे गुरू गणेशशास्त्री तरटे यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. परंपरागत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून त्यांनी क्रांतिकारी प्रयोग केले.आयुर्वेदिक औषधनिर्मिती केली. गुरुकुल पद्धतीने अनेक शिष्य घडवले. त्यातील नाशिकमधील वैद्य वामनशास्त्री दातार, वैद्य केळकर, वैद्य दाते यांनी गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचा रुग्णसेवा करण्यासाठी प्रभावीपणे उपयोग केला. कार्यक्रमात वैद्य कृष्णशास्त्री देवधर यांच्याविषयी  संयोजकांनी कृतज्ञता व्यक्त करणे बाजूलाच पण पुसटसा उल्लेख देखील करण्यात आला नाही. ज्यांनी रचलेल्या पायावर सध्याची वाटचाल सुरू आहे अशा पूर्वसूरींचे विस्मरण अनेकांना खटकले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।