पेट्रोलची शंभरी मध्यमवर्गाला पडतेय भारी ! लेखक उद्धव भयवाळ यांनी केलेले उपहासात्मक तथा विनोदी लेखन !! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!पेट्रोलची शंभरी मध्यमवर्गाला पडतेय भारी !

अलीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली तेव्हा पेट्रोलला उद्देशून म्हणावेसे वाटले की,
"बा पेट्रोल राजा ! तू शेवटी शंभरी गाठलीच. तुझे अभिनंदन.
एखाद्या क्रिकेट खेळाडूने नव्वद, पंचाण्णव धावा कराव्यात. परंतु त्याला शतक गाठता येऊ नये, तेव्हा त्याला जे दु:ख होत असेल, तसेच दु:ख मागच्या वर्षभर तुझ्या वाट्याला आले ना? नव्वद, पंचाण्णव, शहाण्णव, एवढ्या किमतीतच खेळलास वर्षभर. शंभरी गाठायला तुला बराच संघर्ष करावा लागला. शेवटी शंभरी गाठण्याचा आनंद वेगळाच असतो. नाही का? शतायुषी माणसाला किती आनंद होत असेल!
तू शंभरी गाठल्यामुळे तुला तर आनंद झाला असेल पण आता सामान्य माणसाचे काय होईल ते सामान्य माणसालाच माहित!"
पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या तरी श्रीमंतांना काहीच फरक पडत नाही. गरिबांकडे तर पेट्रोलवर चालणारे वाहनच नसते. त्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही. प्रश्न असतो तो फक्त मध्यम वर्गाचा. आधी गरिबी बघितलेल्या, पण हळू हळू श्रीमंत होण्याची इच्छा धरणाऱ्या या मध्यमवर्गीय माणसाला अनेकानेक समस्यांनी ग्रासलेले असते. किमतीचे शतक झळकावून पेट्रोलने तर आपले हेल्मेट काढून आकाशाकडे पाहून आभार व्यक्त केले असतील. पण सामान्य माणूस मात्र आपल्या दुचाकीच्या टाकीत किती पेट्रोल राहिले, याचा हिशोब करीत बसला. त्याने कुणाचे आभार मानावे? एक लिटर पेट्रोलसाठी शंभरची नोट दिल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. कदाचित आजच्या तरूण पिढीला पेट्रोलच्या या शंभरीचा काही खेद होणार नाही. परंतु ज्येष्ठांची हालत बघा. ज्यांनी दहा रुपये लिटरचे, वीस रुपये लिटरचे पेट्रोल कधी काळी आपल्या दुचाकीत टाकलेले असते, त्यांना पेट्रोलचे हे शतक पाहून नक्कीच हुडहुडी भरली असेल. पेट्रोलने शतक गाठल्यापासून अक्षरश: अनेकांच्या चेहऱ्यांचा रंग उडून गेला.

आमच्या शेजारचे नाडकर्णी पूर्वीपासून त्यांच्या स्कुटीमध्ये पन्नास रुपयांचेच पेट्रोल टाकतात. त्यांचे म्हणणे असे की, "जेवढी गरज असेल, तेवढेच पेट्रोल टाका. गाडीच्या टाकीत जास्त पेट्रोल असेल तर जास्त खर्च होतो."

त्यांचे एक घोषवाक्य आहे. "पेट्रोलचे दर काहीही असोत, मी पन्नासचेच भरणार!" त्यामुळे त्यांना आता वारंवार पेट्रोल भरावे लागते. बरेच मनन, चिंतन केल्यानंतर त्यांनी सायकल विकत घेतली. तेव्हा ते म्हणाले, "अहो एक लिटर पेट्रोलच्या किमतीमध्ये दोन लिटर दूध येते. मस्त दूध प्या अन् सायकल चालवा."

पण नव्याचे नऊ दिवस संपले आणि त्यांनी पुन्हा आपली स्कूटी सुरु केली. कारण सायकल चालवून त्यांच्या पोटऱ्या भरून आल्या. हात दुखू लागले. म्हणतात ना, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे."

गेली अनेक वर्षे पेट्रोलच्या वाहनावर स्वार होऊन आरामात सफर करणाऱ्यांना सायकल कशी मानवणार? पायी चालण्याचा नुसता विचार केला तरी गरगरायला लागते!

नाडकर्णी यांचा मुलगा आणि मुलगी अगोदर पेट्रोलसाठी त्यांच्याकडे पंधरा दिवसांनी पैसे मागायचे. ते आता आठ दिवसांनीच पैशांसाठी तगादा लावू लागले.

मागे काही वर्षांपूर्वी नाडकर्णी यांनी आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रेमाने आणि हौसेने सौभाग्यवतीला स्कुटी घेऊन दिली होती. याचा त्यांना आता चांगलाच पश्चाताप होतोय असे त्यांनी एक दिवस मला सांगितले. ते म्हणाले,

"घरात प्रत्येकाकडे गाडी आहे. पेट्रोलबद्दल कोणाला काय बोलावे? गाडी ही आजच्या काळात गरजेची वस्तू झालेली आहे. त्यामुळे पेट्रोल म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. एका घरात चार वाहने. पेट्रोल तर टाकावेच लागेल ना! वर्षानुवर्षे मध्यमवर्गीय म्हणून जे स्टेटस सांभाळले, त्याला जपायलाच हवे ना? नाही का?" मी फक्त होकारार्थी मान हलवली. मी तरी काय म्हणणार होतो?

नाडकर्ण्यांची ही व्यथा तर भालेकरांची दुसरीच कथा. आमच्या ऑफिसमधील हे गृहस्थ कंजूष म्हणून पूर्ण ऑफिसमध्ये प्रसिद्ध आहेत. दुपारच्या सुटीत गटागटाने आमच्या ऑफिसमधील कर्मचारी जेव्हा चहा प्यायला शेजारच्या टपरीवर जातात, तेव्हा एखाद्या गटामध्ये घुसून भालेकरसुद्धा टपरीवर उपस्थित होतात. आतापर्यंत वेगवेगळ्या गटामध्ये घुसून अनेक वेळा चहा पिऊन झाला पण पट्ठ्याने कधी स्वत:च्या खिशात हात घातला नाही. ऑफिसचे त्यांच्या टेबलवरचे काम संपले तरी ज्याच्याकडे दुचाकी आहे, त्याचे काम संपेपर्यंत तिथेच थांबून त्याला गयावया करून त्याच्यासोबत आपल्या घरापर्यंत डबलसीट जाण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांना एकदा मी विचारले की, "रोज रोज इतरांच्या गाडीची आशा धरण्यापेक्षा भालेकर तुम्ही स्वत:ची दुचाकी का घेत नाही?" तर मलाच त्यांनी प्रतिप्रश्न केला. "मला कुठे गाडी चालवता येते.?" मी म्हणालो," त्यात काय एवढं अवघड आहे? आजकाल तर छोटी मुले देखील गाडी चालवतात. तुम्हीही शिकले तर तुम्हालाही येईल ना चालवता?" तेव्हा त्यांनी अगदी बिनतोड उत्तर दिले. ते म्हणाले, " प्रत्येकजण स्वत:च्या दुचाकीवर एकटाच म्हणजे सिंगल सीट जाऊ लागला तर किती पेट्रोल खर्च होईल! एका गाडीवर दोघे गेले तर पेट्रोलचा अर्धा खर्च कमी होतो. शेवटी पेट्रोल हीसुद्धा राष्ट्राची संपत्ती आहे. तिला आपण जपले पाहिजे. नाही का?" त्यांच्या या प्रश्नावर मला त्यांना सांगावेसे वाटले की, "मग तुम्ही असे का करीत नाही? रोज रोज दुसऱ्याच्या गाडीवर डबल सीट जाण्यापेक्षा तुम्ही गाडी विकत घ्या आणि कधीतरी दुसऱ्यांनासुद्धा तुमच्या गाडीवर डबल सीट न्या".

पण त्यांच्याशी वाद न घालता "हो, खरंय तुमचं म्हणणं" एवढे बोलून मी तिथून काढता पाय घेतला.
                           उद्धव भयवाळ
                              औरंगाबाद

टिप्पण्या

  1. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर लिहिताना नाडकर्णी काकाचे छान उदाहरण दिले पण खरच विचार केला तर त्यांचे बरोबर आहे. बाईक तर सोडा पण चारचाकीतही एकटे जाणारे खूपजण आहेत. शेअरींग करणे त्यांना अपमान वाटतो. स्वतःचा, राष्ट्रीय संपत्ती चाच नाही तर नैसर्गिक साधनसंपत्ती ची ही आपण उधळण करतो.

    उत्तर द्याहटवा
  2. पेट्रोलची शंभरी वरचं वर्णन मार्मिक वाटत असलं तरी महागाईने मध्यम वर्ग कसा होरपळत आहे हे विदारक/ वास्तव छान सांगितलं आहे. सामाजिक भान जपलं आहे. एकंदर लेख उत्तम .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !