रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !
रक्तातही भ्रष्टाचार? रक्तपेढी व्यवस्थेसमोरील वाढते प्रश्न आणि विश्वास पुनर्स्थापनेची गरज एक चिंतनात्मक अभ्यासलेख लेखक : डॉ. दिलीप के. कोठावदे, नाशिक चांगोदर (गुजरात) येथे कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. परंतु या घटनेने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे—भारतातील रक्त संक्रमण व्यवस्था किती सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी आहे? रक्तदान हा व्यवहार नसतो; तो विश्वासाचा करार असतो. एक रक्तदाता कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या शरीरातील रक्ताचा अंश एका अनोळखी व्यक्तीच्या जीवनासाठी अर्पण करतो. तो विश्वास ठेवतो की त्याचे रक्त योग्य पद्धतीने संकलित होईल, वैज्ञानिक निकषांनुसार तपासले जाईल, सुरक्षितरीत्या साठवले जाईल आणि ज्या रुग्णाला त्याची गरज आहे त्याच्यापर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचेल. हा विश्वास तुटला तर त्याची किंमत केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित राहत नाही; त...