गोदावरी उत्सवाला वारसाफेरीने सुरूवात ! १५ ते २१ डिसेंबर कालावधीत साजरा होणारा गोदावरी उत्सवाची रुपरेषा जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





गोदावरी उत्सवाला वारसाफेरीने सुरूवात

     नासिक ( जिमाका वृत्तसेवा)::- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नासिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नासिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी उत्सव १५ ते २१ डिसेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. या उत्सवाची सुरूवात बुधवारी सकाळी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून झाली. यावेळी पूजा निलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला.
गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सौ. मयुरा मांढरे,  पोलिस आयुक्त दिपक पांडे, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नासिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासारपाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट उपस्थित होते. पंचवटी वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलिस निरिक्षक राजन सोनवणे यावेळी उपस्थित होते.
सकाळी साडेसात वाजता सुलेखनकार पुजा निलेश यांनी नदी सूक्त हा विषय घेत. सुलेखन केला नमुना सादर केला. त्यांनी केलेल्या सुलेखनाची माहीत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी घेतली. त्यांच्या सुलेखनातून साकारलेल्या विविध नद्यांची नावे यावेळी त्यांनी मांडली. यानंतर प्रा. सुरेखा बोर्हाडे यांनी यावेळी गोदावरी नदी याविषयी एकपात्री नाटक सादर करील उपस्थितांची मने जिंकली. यानंतर गजानन महाराज गुप्ते मंदिरात चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी या विषयावर साकारलेली दीडशेहून अधिक चित्रांच्या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी भेट दिली. नाशिककरांनी या चित्र प्रदर्शनाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी चित्रकार रमेश जाधव यांच्या चित्रांचे कौतुक करीत त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांवर काढलेल्या चित्रांचे पुस्तक जिल्हाप्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी श्री. मांढरे म्हणाले,‘गोदावरी नदी व त्याकाठची वारसास्थळे नासिकची मोलाची संपत्ती आहे. ती जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. हा वारसा जपत आपल्याला विकास साधायला आहे.’यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी वारसाफेरीनिमित्त आयोजित उपक्रमाचे कौतुक केले. गोदावरी विषयी असलेल्या विशेष प्रेमामुळे नासिकशी आपले नाते घट्ट झाले आहे. गोदावरी नदी बद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदरभाव निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केले.
सकाळी आठ वाजता वारसाफेरीला सुरूवात झाली. यावेळी कुंडांचे अभ्यासक देवांग जानी यांनी गोदाकाठावरील कुंड आणि त्यांचा इतिहास यावेळी सांगितला. गोदावरी काठावरील कुंडांची माहिती देताना त्यांनी नकाशाच्य माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी जानी म्हणाले,‘गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदी पात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू शकतो. त्यामुळे यापुढील काळात ही सर्व कुंड पुन्हा निर्माण करता येतील का याचा अभ्यास व्हायला हवा. 
तर नासिकचे अभ्यासक रमेश पडवळ अश्मयुगीन इतिहास, नदीचे महत्त्व, नदी संस्कृत आणि नदीभवतीची वारसास्थळांची माहिती दिली. पडवळ म्हणाले,‘आपली संस्कृती समजून घेण्यासाठी नासिक शहराचा इतिहास समजून घेणे खूप गरजेचे आहे. अश्मयुगापासून नासिकच्या गोदाकाठावर लोकसंस्कृती नांदते आहे. ही संस्कृती निर्माण होण्यासाठी गोदावरी नदी पोषक ठरते आहे. आजही नासिककर गोदावरीशिवाय राहू शकत नाही. गोदाकाठची मंदिरे, वाडे, गढ्या आणि समाधी ही नासिकची ओळख आहेत. हे विसरायला नकोत.   
गजानन महाराज गुप्ते मंदिरात झालेल्या कार्यक्रमानंतर वारसाफेरीला सुरूवात झाली. सकाळी ८.३० ते १०.३० या दोन तास चाललेल्या वारसाफेरीत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त सहभागी झाले होते. देवमामलेदार मंदिर, दुतोंड्या मारूती, अहिल्याराम मंदिर, कुष्ण मंदिर व नारोशंकर मंदिर अशी वारसाफेरी पार पडली. यादरम्यान नासिकचा इतिहास व शक्ती, भक्तीस्थळांची माहिती करून देण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क :
महेश शिरसाट : 99703 59934

००००००००००००००००००
१६ ते २१ डिसेंबर : नदी महोत्सव व्याख्यानमाला

गुरुवार, १६ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान: नदी संस्कृती : डॉ. प्राजक्ता बस्ते, नदीच्या अभ्यासक व तज्ज्ञ
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : गोदाघाटावरचे नाशिक : चेतन राजापूरकर.
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

शनिवार, १८ डिसेंबर २०२१
सकाळी : ७.०० वाजता : गोदाकाठचे पक्षी जीवन :  संयोजन व मार्गदर्शन : प्रा. आनंद बोरा
ठिकाण : गाडगे महाराज धर्मशाळा, गोदाघाट
सायं : ५.३० ते ७.०० : व्याख्यान : जल प्रदूषण :  डॉ. व्ही. बी. गायकवाड
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

रविवार, १९ डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : प्राचीन नाण्यांमधील नदी : डॉ. कैलास कमोद
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

सोमवार, २० डिसेंबर २०२१, सायं : ५.३० ते ७.००
व्याख्यान : नासिकची गोदावरी : डॉ. शिल्पा डहाके, गोदावरी अभ्यासक व तज्ज्ञ
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक

मंगळवार, २१ डिसेंबर २०२१, ५.३० ते ७.००
व्याख्यान : ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम : प्रा. डॉ. प्रमोद हिरे.
ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नासिक
--------
अधिक माहितीसाठी संपर्क : महेश शिरसाट : 99703 59934

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।