भिंत नव्हे कॅनव्हास ! वारली चित्रकलाशैली जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


भिंत नव्हे कॅनव्हास !

    आदिवासी वारली चित्रकला प्रामुख्याने झोपडीच्या भिंतीवर रेखाटली जाते. ही परंपरा ११०० वर्षे जीवंत आहे. झोपडीतील भिंत हाच त्यांचा कॅनव्हास ! शेणाने सारवलेल्या भिंतीवर गेरुच्या गडद रंगाने चौकोन आखला जातो. त्यावर तांदळाच्या पिठाने चित्रे रेखाटली जातात.बांबूच्या काडीचा ब्रश तयार केला जातो. पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी ही चित्रशैली निसर्गस्नेही आहे. झोपडीची भिंत पुन्हा पुन्हा सारवावी लागते. भिंत सारवल्यावर त्यावर परत नवी चित्रे काढली जातात. त्यामुळेच या कलेचे स्वरुप नीत्यनूतन असे आहे. चित्राखेरीज भिंत म्हणजे कपड्याविना मनुष्य अशी वारली जमातीची समजूत आहे. त्यांच्या झोपड्याही अतिशय कलात्मक असतात. अनेक वारली चित्रांमध्येही त्यांचे सुंदर दर्शन घडते.
      वारली जमातीत शेतांजवळ घरे बांधून राहण्याची पद्धत आहे.एखादी मोठी विहीर, ओढा, नदी जवळ आहे असे बघूनच पाडा वसविला जातो. पंधरा -वीस झोपड्यांच्या वस्तीला पाडा असे म्हणतात. तीनचार ते दहा-बारा पाडे मिळून एक गाव तयार होते.सर्वसाधारणपणे खेड्यांत रस्त्यांवर व घरांजवळ जी अस्वच्छता दिसते तशी ती वारल्यांच्या पाड्यांवर नसते.घर व पाडा ते अतिशय स्वच्छ ठेवतात. त्यांच्या झोपड्या चौकोनी किंवा लांबट आकाराच्या असतात.झोपडीची दारे बहूधा पूर्व दिशेला ठेवतात. खिडक्या सहसा नसतातच. दारापुढे ओटा व पडवी असते.बाजूला बकऱ्या, कोंबड्या राखण्यासाठी व्यवस्था केलेली असते.झोपड्यांच्या भिंती कोवळ्या बांबूच्या केल्या जातात.त्यांना बुंधी असे म्हणतात.कारवी नावाच्या बारीक अंगठ्याएवढ्या रुंद व सुमारे ८ फूट उंचीच्या कारणांचाही भिंतीसाठी उपयोग होतो.कारवी ही वनस्पती आजुबाजुला डोंगरावर, रानावनात मुबलक प्रमाणात आढळते.घराभोवती सुबक कुंपण केलेले दिसते. बाहेरील भिंतीवर तांदळाच्या पिठाने लक्क्ष्मीची पावले रेखाटण्याचीही प्रथा आहे.
   शेण व माती कालवून त्या मिश्रणाने भिंती लिंपण्यात येतात. त्याला कूड लिंपणे असे म्हणतात. झोपडीचे छप्परही बुंधी किंवा कारवीने बांधून काढतात.काही ठिकाणी छपरासाठी बांबूच्या काड्यांचा वापर केला जातो.जंगलातील झाडांच्या वाखांचा दोरीप्रमाणे उपयोग होतो.छपरावर भाताचा पेंढा पसरतात. पावसाळ्यात झोपडी गळू नये यासाठी छपरावर सागाची किंवा पळसाची पाने पसरली जातात.वारली घरात खोल्या बांधल्या जात नाहीत. फक्त स्वयंपाकघराची स्वतंत्र खोली असते. तिला वारली बोलीभाषेत ओवारा असे म्हणतात.स्वयंपाकासाठी मातीची चूल मांडली जाते. मडकी,पातेली,डाव,कालथा, जेवणासाठी पितळेची थाळी व वाडगा, बसण्यासाठी लाकडी पाट असतात.त्यांना दडी म्हणतात.झोपडीत भात साठवण्यासाठी भली मोठी कणगी असते. कमीतकमी गरजा हे आदिवासींचे वैशिष्ट्य आहे. त्यांचेच प्रतिबिंब वारली चित्रशैलीतही दिसते.कमीतकमी साहित्य वापरून त्यांची कलानिर्मिती होते.झोपडीची भिंत सुरेख चित्रांनी सजते.चित्राशिवाय असणाऱ्या भिंतीला नागडी भिंत असे म्हणतात.
  वारली जमातीत प्रत्येकजण आपली झोपडी स्वत:च बांधतो.पाड्यातील इतरांना ते  झोपड्या उभ्या करण्यासाठी मदत करतात.प्रथम जाडजूड बांबू जमिनीत रोवतात. तेच झोपडीचे मुख्यतः आधारस्तंभ असतात. दोन बांबूच्या मध्ये सारख्या जाडीच्या काडया बांधतात. ते करण्यात कलात्मक दृष्टीकोन असतो. त्यामुळे वेगवेगळे नैसर्गीक पॅटर्न निर्माण होतात व झोपडीचे सौंदर्य वाढते. उभ्या काठ्यांमधून वेताची आडवी लवचिक काठी आरपार जाते व भिंत चक्क विणली जाते,बळकट होते.घर उभारणीतही जीवनासाठी कला हेच तत्व दिसून येते. पारंपरिक पद्धतीने घर बांधणीत दिसून येते. आदिवासी समाजाची घर बांधणे ही एक जीवननिष्ठ कला आहे. ती जीवसृष्टीचा व पर्यावरणाचा नाश करीत नाही. परिसराचा एक अविभाज्य भाग बनते. आजूबाजूच्या जैवविविधतेशी ती सुसंवाद साधते. घरबांधणीत आजुबाजूच्या नैसर्गिक साहित्याचाच कटाक्षाने वापर केला जातो. झोपडीच्या भिंती सच्छिद्र असल्यामुळे हवेतील दमटपणा व तापमान नियंत्रित राहते. ऊर्जेची बचत होते. जीवसृष्टीचा विनाश टळतो. झोपडीच्या भिंती कुजल्या की नवीन झोपडी बांधण्यापूर्वी आधीचे सर्व साहित्य निसर्गालाच परत केले जाते. त्यामागे पुढील पिढ्यांसाठी जंगल राखण्याची भावना असते.
                                          संजय देवधर
(जेष्ठ पत्रकार आणि वारलीचित्रशैलीतज्ञ)
*********************

दुर्दैवाने आदिवासी घरांचे चित्र बदलते आहे !

    आदिवासी वारली कलेचे संशोधन, अभ्यास करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागात तसेच गुजरातच्या सीमारेषेपर्यंत मी अनेकदा फिरलो. जव्हार, मोखाडा, डहाणू,तलासरी, पालघर,पेठ,सुरगाणा परिसरात आणि सिल्वासा,खानवेल, दुधनी या केंद्रशासित भागात गेलो. पाड्यापाड्यांंवर जाऊन तेथील कलाकारांशी सुसंवाद साधला.अजूनही मी जात असतो. कालौघात या सर्वच ठिकाणी घरांचे चित्र बदलते आहे. घरे बांधण्यासाठी शासकीय अनुदान मिळते. त्यामुळे पारंपरिक सुंदर झोपड्यांऐवजी सिमेंट काँँक्रिटची विसंगत अशी घरे उभी रहात आहेत. त्यावर दर्शनी भागात चकचकीत टाईल्स लावण्याची टूम निघाली आहे. त्यामुळे हल्ली भिंतीवर तांदळाच्या पिठाने चित्र रेखाटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. काही ठिकाणी ऑईलपेंटचा वापर करून चित्रे काढलेली मी बघीतली आहेत. आदिवासींमधील जी नवसाक्षर तरुण पिढी आहे, त्यांना आपण सुधारलो, प्रगती केली असे वाटते. पण खरे म्हणजे शहरी लोकांचे अंधानुकरण करुन ते बिघडत आहेत. त्यांनी झोपडीतच खितपत पडावे असे बिलकुल म्हणणे नाही. पण आपले जे चांगले आहे ते सोडू नये अशी अपेक्षा आहे. हे वेळीच थांबले नाही तर आदिवासींच्या सुंदर घरांचे वर्णन केवळ पुस्तकात वाचावे लागेल किंवा म्युझियममध्ये केवळ मॉडेल्स, प्रतिमा बघाव्या लागतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !