कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर
कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर
जनशिक्षण संस्थानतर्फे महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप
नाशिक (न्यूज मसाला सर्विसेस) : महिलांनी कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. कौशल्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. ब्युटी पार्लर प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराची तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, या किटचा उपयोग करून महिलांनी व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन डांग सेवा मंडळ अध्यक्षा हेमलता बिडकर यांनी केले.
अखिल भारतीय महिला परिषद, नवी दिल्ली, सिन्नर महिला मंडळ, सिन्नर आणि जनशिक्षण संस्थान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वावी, ता. सिन्नर येथे महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून हेमलता बिडकर बोलत होत्या. जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातून महिलांसह विविध वंचित घटकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराला चालना देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे बिडकर म्हणाल्या.
जन शिक्षण संस्थानचे संचालक राहुल ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी जनशिक्षण संस्थान तसेच आदिवासी कौशल्य विकास केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच वावी येथील महिलांना प्रशिक्षण देण्यासोबतच प्रत्यक्ष कामाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना ड्रेस शिवण्याचे काम देण्यात आले असून, यामध्ये २० महिलांनी सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर स्वतःबरोबर कुटुंबास हातभार लावावा, तसेच या महिलांनी २००० शालेय गणवेश शिवण्याची ऑर्डर मिळवली हि बाब कौतुकास्पद आहे.
कीर्ती आंकर यांनी सिन्नर महिला मंडळ व अखिल भारतीय महिला परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला खालकर, सहचिटणीस लता पवार, चिटणीस कीर्ती आंकर, खजिनदार वैशाली कुलकर्णी, जन शिक्षण संस्थानचे संचालक राहुल ठाकरे तसेच आदिवासी कौशल्य विकास केंद्राचे प्रोग्राम ऑफिसर शुभम जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. जन शिक्षण संस्थानचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय भोकनळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पूजा गालांडे, मार्गदर्शक शिक्षिका यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयश्री कांदळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा