देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान ! देहदान करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान म्हणजे समाजाप्रती कृतज्ञता

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान !
देहदान करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान म्हणजे समाजाप्रती कृतज्ञता : डॉ. हेमांगी पाटील

नाशिक : कर्मवीरांच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवून एका छोट्याशा विचाराचे रूपांतर मराठा विद्या प्रसारक समाजासारख्या क्रांतिकारी वटवृक्षात झाले आहे. आज सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आव्हानात्मक काळात संवेदनशीलता व मूल्ये जपणे अधिक गरजेचे आहे. देहदान करणाऱ्या दात्यांचा सन्मान हा समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. हेमांगी पाटील यांनी केले.
             मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये मविप्र समाजाच्या समाजदिनानिमित्त आयोजित देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
            या सोहळ्याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश जाधव, डॉ. कल्पना देवणे, डॉ. राम पवार आणि विभागप्रमुख डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते. कर्मवीरांना अभिवादन करून समाजगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मनीषा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांनी डॉ. हेमांगी पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला.
                     अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी रुग्णालयातील अवयवदान प्रक्रियेची माहिती देत येथे माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणाऱ्या दात्यांना अभिवादन करून त्यांच्या नातेवाईकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी देहदात्यांच्या नातेवाईकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. कुशल शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संतोष शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,