नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन
नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन
नाशिक : कर्मवीरांच्या त्यागातून आणि अनेक समाजधुरीणांच्या अविरत परिश्रमातून ११२ वर्षांपूर्वी उभी राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्था आज राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी म्हणून या संस्थेकडे पहिले जाते. अवघ्या पाच विद्यार्थ्यापासून सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थी, ११ हजारांहून अधिक शिक्षक, मोठा कर्मचारी वर्ग अशा पद्धतीने मविप्रचे एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आज इतका मोठा विस्तार या संस्थेने उभा केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मविप्र संस्थेचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील १२८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरासह अत्याधुनिक सुविधांनीयुक्त कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या आणि मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते.
यावेळी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह आमदार डॉ . राहुल आहेर, दिलीप बनकर, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, गोकुळ गिते, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उद्घाटन सोळ्यासाठी मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मविप्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यावर प्रकाश टाकला. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, आधुनिक अवजारे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करून शेतीला नवी दिशा द्यावी. नाशिक जिल्ह्याने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून देशाच्या द्राक्ष निर्यातीत नाशिकचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने विकसित केलेल्या 'महाविस्तार ॲप'च्या उपयुक्ततेचा त्यांनी पुनरुच्चार केला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टॉलवर प्रदर्शित केलेले अन्नप्रक्रिया पदार्थ आणि नवसंशोधनावरील प्रयोग भावी कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत आशादायक असून, अशा उपक्रमांमुळे आजचा तरुण वर्ग पुन्हा आत्मविश्वासाने शेती व्यवसायाकडे आकर्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मविप्र संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना राज्य सरकारचे नेहमीच पूर्ण सहकार्य राहील, संस्थेला जी काही मदत लागेल, त्यासाठी सरकार बांधील आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मविप्रचे कृषी महाविद्यालय ठरेल संशोधन केंद्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मविप्रच्या कृषी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाधारित आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तरुणांनी शेतीमध्ये एआयचा वापर करायला हवा. कृषीक्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सुमारे 20-25 टक्के उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. मविप्रने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभारलेले कृषी महाविद्यालय येत्या काळात नाशिक जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रमुख व अग्रगण्य शेती संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. . मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या पायाभरणीत आणि उभारणीत अमूल्य योगदान दिलेल्या सर्व कर्मवीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करत संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. डॉ. भास्कर ढोके यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी आभार मानले. दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
मविप्र रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी : पालकमंत्री गिरीश महाजन
कार्यक्रमाचे अध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मविप्र संस्थेचे कौतुक केले. हे कृषी महाविद्यालय म्हणजे शिक्षण चळवळीतील नवा अध्याय आणि कृषी क्षेत्रात नवी भरारी आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शेती, नवनवीन तंत्रज्ञान, आयात-निर्यात शिक्षणाबरोबरच शेतीला नवीन चालना मिळेल. कृषी क्षेत्रासाठी नवीन दालन झाल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले, नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ कोटी भाविक येणार असून, प्रशासनाला मविप्र संस्थेची मोठी मदत लागणार आहे. फायर स्टेशनसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मविप्रने दोन एकर जागा द्यावी, त्यासाठी आवश्यक टीडीआर दिला जाईल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या भाडे कराराच्या मुदतवाढीचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी मार्गी लावला आहे. संस्थेचा करार जुना असून, नवीन आदेश या करारासाठी लागू होत नाही. ती ५० एकर जागा जुन्याच कराराप्रमाणे म्हणजे अवघ्या १ रुपया भाडेप्रमाणे संस्थेला वापरता येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
शासनाने मविप्रला शतकोत्तर प्रोत्साहन निधी द्यावा : ॲड. नितीन ठाकरे
यानंतर संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि विशेषतः कर्मवीर बाबुराव ठाकरे प्लेसमेंट सेलच्या कामगिरीचा आढावा सादर केला. या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आतापर्यंत ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. जिल्हा न्यायालयाच्या भव्य वास्तूच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोलाचे योगदान राहिल्याबद्दल आभार मानले. तसेच कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील व कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या कारकीर्दीचा गौरव करत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विविध मागण्या मांडल्या. यामध्ये रावसाहेब थोरात यांच्यावरील धड्याचा शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात समावेश करणे, भागशाळेसाठी स्वतंत्र शाळा मंजूर करणे, टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारणे, कृषी विज्ञान केंद्र द्यावे, संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्रामीण शाळांच्या इमारतींसाठी १०० कोटी शतकोत्सर प्रोत्साहन निधी मंजूर करणे या मागण्यांचा समावेश होता.
‘मविप्र’तर्फे २५ लाखांचा ‘सीएम रिलिफ फंड’
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मविप्र संस्थेकडून मुख्यमंत्र्यांकडे २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच, मान्यवरांच्या हस्ते मविप्र कर्मवीर पत्रिकेच्या रोजगार या विषयावरील अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.
सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासमवेत साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील.
-----------------------------------------------------------
अतिशय उत्तम
उत्तर द्याहटवा