वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा ! रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा !
रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मालेगाव (उमाका वृत्तसेवा) : मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या वाडिया रुग्णालयामुळे शहरातील नागरिकांना विशेषतः गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य, तज्ज्ञ डॉक्टर तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाडिया रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मालेगाव शहर महापालिकेच्या महापौर शेख नसरीन बानो मो. खालिद, महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव, वैद्यकीय अधीक्षक (वर्ग १) डॉ. जितेंद्र डोलारे, उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद, स्थायी समितीच्या सभापती एजाज बेग, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शेख ताहेरा शेख रशीद, शहर अभियंता कैलास बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शांताराम चौरे, वास्तु विशारद जयश्री आहेर यांच्यासह आारोग्य अधिकारी, कर्मचारी व नगरीक उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, वाडीया रुग्णालयाला मालेगावच्या सामाजिक जीवनात मोठा इतिहास आहे. शहराची लोकसंख्या कमी असतानाच्या काळापासून या रुग्णालयाशी मालेगावकरांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. अनेक कुटुंबांना या रुग्णालयातून आरोग्यसेवा मिळाली आहे. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सुविधांचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच चांगली आरोग्यसेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य तपासणी, उपचार व आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.
चांगला प्रकल्प उभारल्यानंतर त्याची देखभाल व जतन करणे ही मोठी जबाबदारी आहे. वाडीया रुग्णालय स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनासोबतच मालेगावकर नागरिकांचीही आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना रोखणे, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे आणि रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ महानगरपालिका व शासकीय रुग्णालयांमधून नागरिकांना मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी रुग्णालयांच्या सुविधा बळकट करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न राहील. वाडीया रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यासोबतच शिक्षण क्षेत्रालाही सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. महानगरपालिका शाळांमध्ये गरीब व गरजू कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी महानगरपालिका शाळांचा विकास व आधुनिकीकरण करण्यावर भर देण्यात येईल. शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. भिवंडी येथील उर्दू माध्यमाच्या महानगरपालिका शाळांमध्ये करण्यात आलेल्या आधुनिकीकरणाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील शाळांना भेट देऊन माहिती घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
शाळांच्या विकासासाठी केवळ निधीच नव्हे, तर शिक्षकांचे समर्पण आणि समाजाचा सहभागही महत्त्वाचा आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील शिक्षक केशव गावित यांच्या कार्याचा उल्लेख करताना मंत्री भुसे यांनी त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मर्यादित साधनसामग्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. अशा शिक्षकांच्या समर्पणातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच चांगले संस्कार देणेही आवश्यक आहे. शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक व प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.
वाडीया हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मात्र हॉस्पिटलसोबतच अनुभवी डॉक्टर, सर्जन आणि आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणेही गरजेचे आहे. शासन स्तरावरून या हॉस्पिटलला आवश्यक मनुष्यबळ आणि आर्थिक सहकार्य मिळावे अशी विनंती महापौर शेख नसरीन बानो मो. खालिद यांनी यावेळी केली.
सुमारे १५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या रुग्णालयासाठी १ कोटी रुपयांचे फर्निचर व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्सिजन प्लांट व अग्निसुरक्षा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णालयामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील पाणीपुरवठा, भूमिगत जलवाहिनी व एलईडी पथदिवे यांसह विविध विकासकामेही प्रगतिपथावर असून ती लवकरच पूर्ण करण्यात येतील. नागरिकांनी उपलब्ध आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले.
मालेगावकरांच्या विश्वासाचे स्थान असलेल्या ऐतिहासिक वाडीया हॉस्पिटलचे १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्यात आले असून, येथे गरोदर मातांची तपासणी, प्रसूती व सिझेरियन शस्त्रक्रियेसह माता-बाल आरोग्य, बालरोग, मधुमेह, रक्तदाब, दमा आदी विविध आजारांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार असून, नागरिकांना अधिक व्यापक आरोग्यसेवा देण्यासाठी स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग यांसह विविध तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणे आवश्यक आहे, असे डॉ. डोलारे यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद, स्थायी समितीच्या सभापती एजाज बेग, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शेख ताहेरा शेख रशीद यांनीही मनोगत व्यक्त केले.
मंत्री भुसे यांच्या हस्ते फित कापून वाडीया हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. मंत्रीभुसे यांनी मान्यवरांसोबत रूग्णालयाची पाहणी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा