जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !
संपादकीय
जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !
राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे खूप काटेकोर नियोजन करणे जलसंपदा विभागासाठी डोकेदुखी ठरू नये यासाठी पारदर्शक प्रयत्न व्हावेत. केवळ बैठका, आश्वासने आणि कागदोपत्री नियोजन पुरेसे नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीत पाणी सोडण्याची तयारी करताना जलसंपदा विभागाने जनतेसमोर पाण्याचा संपूर्ण ताळेबंद मांडला पाहिजे. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करताना त्यासाठी जिल्ह्यातील धरणांचा यथोचित आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. यासाठी जनसामान्यांच्या पुढील काही ठोस मागण्या आहेत.
धरणनिहाय जलसाठ्याचा ताळेबंद जाहीर करा! गंगापूर, मुकणे, दारणा, आणि दिंडोरी तालुक्यातील संबंधित धरणांतील उपयुक्त जलसाठा, मंजूर पाणीआरक्षण, अपेक्षित वापर आणि कुंभमेळ्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी.
कुंभमेळ्यातील प्रत्येक प्रमुख स्नानपर्वणीसाठी किती पाणी आवश्यक आहे, ते कुठून उपलब्ध होणार, कधी सोडले जाणार आणि नदीतील अपेक्षित पातळी कशी राखली जाणार, याची माहिती स्पष्ट करावी.
कुंभमेळ्याच्या वाढीव पाणीमागणीचा नाशिक शहर, ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांच्या पाणीवाटपावर काय परिणाम होऊ शकतो, याचे मूल्यमापन करून पर्यायी नियोजन जाहीर व्हायला हवे. गोदावरीतील प्रमुख स्नानघाटांवरील पाण्याचे नमुने तपासून त्यांचे निष्कर्ष सार्वजनिक करावेत. प्रदूषण आढळल्यास त्याचे स्रोत शोधून जबाबदार यंत्रणांवर नियमानुसार कारवाई करावी. मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, कामांची सद्यस्थिती, पूर्णत्वाची मुदत आणि अपेक्षित लाभ यांचा नियमित अहवाल प्रसिद्ध करावा. विलंब किंवा अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. कालव्यांमधील गळती, वितरणातील त्रुटी आणि जलसाठ्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्त्यांचे वेळापत्रक जाहीर करावे. कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांचा पुढील काळात कसा उपयोग होईल, त्यांची देखभाल कोण करणार आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याची माहिती द्यावी.
या मागण्या कोणत्याही विभागाविरुद्ध पूर्वग्रहातून केलेल्या नाहीत. त्या सार्वजनिक हितासाठी आणि जलसंपत्तीच्या जबाबदार व्यवस्थापनासाठी आहेत. कुंभमेळा यशस्वी व्हावा, गोदावरी स्वच्छ राहावी आणि नाशिककरांच्या पाण्याच्या गरजांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, हीच या मागण्यांमागची भूमिका आहे.
जलसंपदा विभागाने या प्रश्नांची उत्तरे आकडेवारीसह द्यावीत. नियोजनात त्रुटी नसतील, तर पारदर्शक माहितीमधून ते सिद्ध करावे, त्रुटी असतील, तर त्या वेळेत दूर कराव्यात.
कारण गोदावरी ही केवळ कुंभमेळ्यातील स्नानासाठीची नदी नाही. ती नाशिकच्या जीवनाचा, शेतीचा आणि पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. तिच्या पाण्याचे नियोजन करताना आजच्या धार्मिक गरजांसोबत उद्याच्या पिढ्यांचाही विचार झाला पाहिजे.
कुंभमेळ्यासाठी पाणी सोडणे अपरिहार्य असेल पण नियोजनातील त्रुटींमुळे पाण्याचे संकट निर्माण होणे अपरिहार्य नाही. जलसंपदा विभागाने हे कृतीतून सिद्ध करावे. पाण्याचा हिशेब, नियोजनाची पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणारी ठोस कृती हवी अशी माफक अपेक्षा नासिक जिल्हा वासियांकडून व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा